Monday, 23 August 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 August 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, सण - वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

** डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची गुणवत्ता वाढ आणि पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचं आश्वासन

** माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खाजगी सचिवांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

आणि

** राज्यातली कलाकेंद्रं, आठवडे बाजार तसंच यात्रा सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक

****

जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपण सण - वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊन मानवता दाखवू आणि कोरोनाला हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्रानं जगाला द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. येत्या ३१ तारखेला साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या अनुषंगानं, मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनी देखील मुख्यमंत्र्यांच्या या कळकळीच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत दहीहंडी ऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसंच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेणार असल्याचं मत व्यक्त केलं.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची गुणवता वाढ आणि पायाभूतसुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलं आहे. विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापनदिनाच्या अनुषंगानं जीवन साधना पुरस्कार आज प्रदान डॉ कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. उस्मानाबाद इथल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश दापके, आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्यासाठी कार्यरत राहिलेले, मोहम्मद अब्दुल रज्जाक मोहम्मद अब्दुल जब्बार, यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विद्यापीठाचा दर्जा सुधारण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन कार्यरत राहील अशी ग्वाही डॉ. भागवत कराड यांनी यावेळी दिली. ते म्हणाले…

जिथं जिथं आडेल तिथ राजकारण बाजुला ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी, त्यांचं स्टॅण्डर्ड वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी राज्यशासन तर देईलचं आपल्याला, पण केंद्रशासनाचा भरीव निधी या विद्यापीठासाठी देईल.

 

कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी यावेळी केलेल्या भाषणात नामांतर शहीद स्मारक आणि विद्यापीठ प्रवेशद्वाराचं सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली. विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, अॅथलेटिक्ससाठी सिंथेटीक ट्रॅक तयार करणे, मध्य भारताचं सांस्कृतिक संशोधन केंद्र विद्यापीठात व्हावं, आदी मागण्या कुलगुरुंनी डॉ कराड यांच्याकडे केल्या.

****

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी, सक्तवसुली संचालनालयानं आज विशेष न्यायालयात पहिलं आरोपपत्र दाखल केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरोधात हे आरोपपत्र दाखल केलं गेलं आहे. या दोघांविरोधात सापडलेले पुरावे तसंच इतर संशयितांविरोधातलं आपलं म्हणणंही संचालनालयानं न्यायालयात दाखल केलं आहे.

****

मुंबईत मंत्रालयाबाहेर विष प्राशन केलेले शेतकरी सुभाष जाधव यांचा आज मृत्यू झाला. खासगी सावकारी प्रकरणी पीडित असलेले शेतकरी सुभाष जाधव यांनी स्थानिक मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे जाधव हे गेल्या शुक्रवारी २० ऑगस्टला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते. मात्र सुरक्षारक्षकांनी प्रवेश न दिल्यामुळे जाधव यांनी मंत्रालयासमोर विष प्राशन केलं होतं. पोलिसांनी जाधव यांना तत्काळ उपचारासाठी जीटी रुणालयात दाखल केलं होतं, उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात जाधव यांच्या मुलाच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण मंचर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे. 

****

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी राज्यपाल कल्याणसिंह यांच्या पार्थिव देहावर आज उत्तर प्रदेशात बुलंदशहरात गंगा किनारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यांच्यासह अनेकांनी कल्याणसिंह यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गंगाकिनारी अनेक नागरिकांनी उपस्थित राहून, कल्याणसिंह यांना अखेरचा निरोप दिला.

****

राज्यातली कलाकेंद्रं, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांच्यासह शिष्टमंडळाने आज देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन सादर केलं. लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात लावणी महोत्सव आयोजित करावा, वृध्द कलावंतांच्या मानधनामध्ये वाढ करावी, लावणी आणि तमाशा कलावंतांच्या घरसंकुलासाठी पुण्यात पाच एकर जागा मिळावी, आदी मागण्या शिष्टमंडळाने या निवेदनातून केल्या आहेत. कलावंतांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्यशासन सकारात्मक असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं आहे.

****

बीड जिल्ह्यात दोन वर्षा पूर्वीच्या कोट्यवधी रूपयांच्या तूर-हरभरा खरेदी घोटाळ्यातील ६ आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेनं आज अटक केली. या सहा आरोपींना बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातले १५ पेक्षा अधिक आरोपी अजूनही फरार आहेत.

****

नैसर्गिक समस्यांचं निवारण करण्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला सेवा या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी व्यक्त केला आहे. माहिती आणि दळणवळणाच्या साधनांद्वारे हवामानावर आधारित कृषी सल्ला सेवा या विषयावर तीन आठवड्याचा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम कृषी विद्यापीठानं सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या समारोप प्रसंगी कुलगुरु बोलत होते. या अभ्यासक्रमासाठी देशभरातून १०७ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. त्यांना देशभरातील ३५ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलं.       

****

बुलडाणा जिल्ह्यात देउळगांवराजा जवळ आज दुपारी ट्रक आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बसमधील एकाहिला प्रवाशाचा मृत्यू झाला, तर १८ प्रवाशी जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

//********//

 

No comments: