Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 03 August 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज बाधित; गदारोळातच
अनेक विधेयकं चर्चेविना मंजूर
** पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत
तसंच दुरुस्ती आणि इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चाला राज्य
मंत्रिमंडळाची मान्यता
** जालना इथं ३६५ खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्याचा
निर्णय
** १२वीचा निकाल जाहीर; ९९ पूर्णांक ६३ शतांश टक्के विद्यार्थी
उत्तीर्ण
आणि
** टोक्यो ऑलिम्पिकमध्ये
हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा बेल्जियमकडून पराभव
****
विरोधी पक्षांनी पेगासेस
आणि अन्य मागण्यांसाठी केलेल्या
गदारोळामुळं संसदेच्या कामकाजात
आजही व्यत्यय आला. त्यामुळे प्रारंभी दोन्ही सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर
दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात
आलं.
लोकसभेचं कामकाज दोन वाजता पुन्हा सुरू
झाल्यावरही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवला. अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक सादर
करण्यात आलं. संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांनी या विधेयकातल्या तरतुदींबाबत
माहिती दिली. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी सदनाचं कामकाज सुरळीत नसताना,
विधेयकावर चर्चा घेण्यास विरोध दर्शवत, पेगासस मुद्यावर चर्चा घेण्याची मागणी
केली. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी सर्व सदस्यांना या विधेयकाबाबत आश्वस्त
करत, हे विधेयक एकमतानं संमत करण्याचं आवाहन केलं. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या
गदारोळातच विधेयकावर मतदान घेतलं, सदस्यांनी हात उंचावून विधेयक संमत केलं,
त्यानंतर अध्यक्षांनी सदनाचं कामकाज चार वाजेपर्यंत स्थगित केलं, कामकाज पुन्हा
सुरू झाल्यावरही विरोधकांनी फलक झळकावत घोषणाबाजी सुरूच ठेवली. तालिका सभापती
राजेंद्र अग्रवाल यांनी लवाद सुधारणा विधेयकावर चर्चा पुकारली. अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांनी हे विधेयक एकमतानं संमत करण्यासाठी सर्व सदस्यांना सहकार्याचं
आवाहन केलं. या गदारोळातच हे विधेयक संमत झालं. त्यानंतर सदनाचं कामकाज
दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेचं कामकाज दोन वाजता पुन्हा सुरू
झाल्यावर दिवाळखोरी सुधारणा विधेयकावर चर्चा पुकारण्यात आली.तालिका सभापती
भुवनेश्वर कलिता यांनी विरोधकांच्या गदारोळातच या विधेयकावर मतदान घेतलं, सदनाचं
विधेयक हात उंचावून संमत केलं. सभापतींनी शांततेसाठी वारंवार आवाहन करूनही
विरोधकांचा गदारोळ वाढत गेल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
नुकत्याच झालेल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीपोटी
तातडीची मदत तसंच दुरुस्ती आणि इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चाला
आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पूराचं संकट, दरडी
कोसळण्याच्या घटना यावर तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जालना इथं ३६५ खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यासही
मान्यता देण्यात आली. या मनोरुग्णालयामुळे मराठवाडा तसंच विदर्भातल्या रुग्णांसाठी
आंतररुग्ण उपचार तसंच पुनर्वसन सुविधा उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मनोरुग्णालय
उभारण्यासाठी इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री
रुग्णवाहिका, औषधी, उपकरणं तसंच मनुष्यबळ यासाठी १०४ कोटी ४४ लाख रुपयांचा खर्च
अपेक्षित आहे. राज्यातल्या कृषी विद्यापीठांमधल्या शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना ७ वा
वेतन आयोग लागू करण्यासही आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात
आली.
राज्यातील कृषी विद्यापीठं, संलग्न कृषी महाविद्यालयं यामधील
शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची सुधारित वेतन संरचना १ जानेवारी
२०१६ पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
****
राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता १२वीचा निकाल आज दुपारी जाहीर झाला.
यंदा ९९ पूर्णांक ६३ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य विभागात सर्वाधिक
९९ पूर्णांक ९१ शतांश, त्याखालोखाल कला विभागात ९९ पूर्णांक ८३ शतांश तर विज्ञान विभागातले
९९ पूर्णांक ४५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागात सर्वाधिक
९९ पूर्णांक ८१ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षीच्या निकालातही उत्तीर्ण
होणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण सर्वाधिक आहे. यावर्षी उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचं प्रमाण
९९ पूर्णांक ७३ शतांश तर मुलांचं प्रमाण ९९ पूर्णांक ५४ शतांश टक्के इतकं आहे.
****
सीबीएसई अर्थात केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीचे
निकालही आज जाहीर झाले. यंदा ९९ पूर्णांक ४ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलींचं प्रमाण सर्वाधिक ९९ पूर्णांक २४ टक्के इतकं आहे, तर
एकूण ९८ पूर्णांक ८९ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय १०० टक्के तृतीयपंथी मुलं
उत्तीर्ण झाली आहेत.
***
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये हॉकी स्पर्धेत भारतीय
पुरुष संघाचा आज सकाळी झालेल्या उपांत्य
फेरीच्या सामन्यात बेल्जियमकडून पाच दोन अशा फरकानं पराभव झाला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत
भारतीय संघ २-१ नं आघाडीवर होता. मात्र त्यानंतर बेल्जियमच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी केल्यानं, भारतीय
संघ ही आघाडी अखेरपर्यंत राखू शकला नाही. पेनल्टी कॉर्नरच्या संधीचा बेल्जियम संघानं
योग्य वापर करत, अखेरच्या सुमारे पंधरा मिनिटांत तीन गोल करून, पाच दोन अशा फरकानं
विजय मिळवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन
केलं आहे. जय पराजय हा खेळाचाच भाग असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. क्रीडा
मंत्री अनुराग ठाकूर यांनीही या संघाचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, महिला हॉकी
संघाचा उद्या बुधवारी अर्जेंटिना संघासोबत उपांत्यफेरीचा
सामना होणार आहे.
****
औरंगाबाद शहर भारतातल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये आणण्यासाठी महापालिकेच्या
वतीनं शहरात स्वच्छतेसंदर्भात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून
महापालिका एक अनोखा उपक्रम राबवत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी
रविकुमार कांबळे
महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर जाळीची
भलीमोठी बाटली बसवण्यात आली आहे. नागरिकांनी प्लास्टिकच्या वापरलेल्या रिकाम्या बाटल्या
इतरत्र न फेकता या बाटलीत टाकायच्या आहेत. आकर्षक स्वरुपातली कचरा कुंडी असलेली ही
बाटली नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. नागरिकही या बाटलीत प्लास्टीकच्या रिकाम्या बाटल्या
टाकत आहेत. अशा प्रकारच्या जाळीच्या आणखी दहा महाकाय बाटल्या शहरातल्या गर्दीच्या ठिकाणी
ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी या बाटलीरुपी कचराकुंडीचा वापर करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी
मदत करण्याचं आवाहन महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केलं आहे. रविकुमार
कांबळे आकाशवाणी बातम्यांसाठी औरंगाबाद
****
आंचल गोयल याच परभणीच्या जिल्हाधिकारी असतील, असा खुलासा परभणीचे
पालकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोयल यांच्या नियुक्तीच्या
मुद्द्यावरुन जिल्ह्यातून संतप्त भावना उमटल्यानंतर आता आंचल गोयल याच जिल्हाधिकारीपदी
रुजू होतील असे संकेत आहेत. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी परभणीत आलेल्या
गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. शहरवासीयांनी
निदर्शनं केली. समाजातल्या विविध स्तरातील नागरिक, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी
- कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका कोविड बाधित रुग्णाचा आज मृत्यू
झाला. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ५०५ रुग्ण कोविड संसर्गानं दगावले आहेत. जिल्ह्यातल्या
एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ४५३ झाली असून एक लाख ४३ हजार ६५९ रुग्ण कोरोनामुक्त
झाले आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या अंगणवाडी मध्ये लहान
मुलांसाठी शौचालय, पाण्याची सोय आणि विद्युत सुविधा उपलब्ध नसल्यास अशा अंगणवाडी आणि
संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिला आहे.
//***************//
No comments:
Post a Comment