Wednesday, 4 August 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 August 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित; राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींचा कारवाईचा इशारा

** प्रसिद्ध डोगरी कवयित्री पद्मश्री पद्मा सचदेव यांचं मुंबईत निधन

** टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मुष्टियोद्धा लवलिना बोर्गोहेनला कांस्यपदक; कुस्तीत रविकुमार दहिया तर भालाफेकीत नीरज चोप्रा अंतिम फेरीत दाखल; महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीत पराभव

आणि

** नरसी नामदेव इथली परतवारी यंदा भाविकांविना साजरी

****

विरोधी पक्षांनी पेगासेस आणि अन्य मागण्यांसाठी केलेल्या गदारोळामुळं संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय आला. या गदारोळातच राज्यसेनभेनंभेनं आज विमानतळ आर्थिक नियमन प्राधिकरण विधेयक मंजूर केलं. त्यापूर्वी सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सरकार शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चेला तयार असल्याचं सांगितलं, मात्र विरोधकांनी पेगासस आणि अन्य मुद्यावर विरोधकांनी दिलेले स्थगन प्रस्ताव फेटाळून लावत, गदारोळ करणाऱ्या सदस्यांना निलंबनाचा इशारा दिला. राज्यसभेच्या महासचिवांना त्यांनी गदारोळ घालणाऱ्या सदस्यांची नावं देण्याची सूचना केली. त्यानंतर सदनाचं कामकाज दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर पावणे तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानतळ आर्थिक नियमन प्राधिकरण विधेयक सदनासमोर मांडून, सर्वांना चर्चेत सहभागी होऊन विधेयक संमत करण्याचं आवाहन केलं. काही सदस्यांनी यावर सुचवलेल्या सुधारणा अमान्य करत सदनानं विरोधकांच्या गदारोळातच विधेयक संमत केलं, त्यानंतर उपसभापती हरिवंश यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. हे विधेयक लोकसभेनं आधीच संमत केलेलं आहे. एका वर्षात किमान ३५ लाख प्रवासी वाहतुकीसह विमानतळांना प्रमुख विमानतळ म्हणून नियुक्त करण्याची तरतूद या विधेयकात आहे.

 

लोकसभेचं कामकाजही सकाळच्या सत्रात दोन वेळा तहकूब झाल्यावर बारा वाजता पुन्हा सुरू झालं, त्यावेळी विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात येऊन गदारोळ सुरू केला. त्यामुळे कामकाज पुन्हा दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर साडे तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. कामकाज सुरू झाल्यावर सदनानं विरोधकांच्या गदारोळातच नारळ विकास मंडळ सुधारणा विधेयक चर्चेविना संमत केलं. हे विधेयक राज्यसभेनं यापूर्वीच संमत केलं आहे. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

रम्यान, सायबर धोके कमी करण्यासाठी सरकारने संरक्षण सायबर एजन्सी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचं आज लोकसभेत एका लेखी उत्तरात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी सांगितलं.

****

लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’या दुर्मिळ आजारावरील महागडी उपचाराची सुविधा मुंबईच्या नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्यामुळे या आजाराच्या मुलांना नवजीवन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. अमेरिकेतील संस्थेच्या माध्यमातून या आजारावरील महागडे इंजेक्शन रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून सध्या नायर रुग्णालयातील १७ रुग्णांना त्याचा फायदा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

****

प्रसिद्ध डोगरी कवयित्री पद्मश्री पद्मा सचदेव यांच आज मुंबई इथं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. पद्मा सचदेव या डोगरी भाषेतल्या पहिल्या आधुनिक कवयित्री होत्या. त्याच्या ‘मेरी कविता मेरे गीत’ या कवितासंग्रहाला १९७१ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी १९६१ पासून जम्मू इथंल्या आकाशवाणी केंद्रात निवेदक म्हणून तर मुंबई आकाशवाणी केंद्रातही कार्य केले होते. त्यांनी प्रेम पर्वत, आंखिन देखी आणि साहस अशा अनेक चित्रपटांमधील गाणी लिहीली होती.

****

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या लढतीत भारताच्या लवलिना बोर्गोहेनचा तुर्कीच्या खेळाडूनने पराभव केला, मात्र लवलिनाने पराभवानंतरही कांस्य पदकाची कमाई केली. या ऑलिम्पिक स्पर्धेतलं हे तिसरं पदक आहे. याआधी मीराबाई चानूने भारोत्तोलनात रौप्य, पीव्ही सिंधूने बॅटमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  क्रीडा आणि युवा कल्याणमंत्री  अनुराग ठाकूर ,राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.

पुरुषांच्या कुस्ती स्पर्धेत रविकुमार दहियाने आपल्या गटाच्या उपांत्य फेरीत इराणच्या मल्लाचा ९-४ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दीपक पुनियाचा मात्र उपांत्य फेरीत पराभव झाला, आता त्याचा कांस्यपदकासाठी सामना होईल.

भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा अंतिम फेरीत दाखल झाला आहे. भाला फेकीच्या पात्रता फेरीत नीरजने ८६ पूर्णांक ६५ मीटर अंतरावर भाला फेकला. गट अ तसंच गट ब मधल्या सर्वच खेळाडूंपेक्षा हे अंतर अधिक आहे.

महिला हॉकीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा अर्जेंटिना संघाने दोन एकने पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता भारतीय महिला संघाची ग्रेटब्रिटन संघासोबत कांस्य पदकासाठी लढत होईल. भारतीय पुरुष संघाचाही उद्या जर्मनीसोबत कांस्य पदकासाठी सामना होणार आहे.

****

मुंबईतल्या एका विठ्ठल भक्त महिलेने पंढरपूर इथल्या विठ्ठल मंदिरातील दान पेटीत एक कोटी रुपयांचं दान केलं आहे. या महिलेच्या पतीचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी विठ्ठल मंदिराला देणगी देण्याबाबतची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. मृत्यूनंतर विमा कंपनीकडून मिळालेले सर्व पैसे या मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी विठ्ठलाच्या दान पेटीत अर्पण केले. या भाविकांनं आपलं नाव गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर समितीला केली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातलं प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं, संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान श्रीक्षेत्र नरसी नामदेव इथं कामिका एकादशी निमित्त होणारी परतवारी यंदा भाविकांविना साजरी झाली. या परतवारीला भाविकांची मोठी गर्दी होत असते, परतवारी निमित्त मोठा यात्रोत्सव साजरा होत असतो. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे परतवारीला प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत नाहीये. त्यामुळे वैष्णवांच्या मांदियाळीविनाच आज महापूजा झाली. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…

कोरोनाच्या संसर्गामुळे परतवारीला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे वैष्णवांच्या मांदियाळीविनाच श्री संत नामदेव महाराज यांच्या वस्त्र समाधीची संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार मधुकर खंडागळे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. भाविक भिकाजी कदम, ओमप्रकाश हेडा यांच्या हस्ते सपत्नीक श्रींच्या वस्त्र समाधीस अभिषेक करण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून भक्तांच्या गर्दी विनाच पार पडत असलेल्या या कामिका एकादशी निमित्त होणारी परतवारी यावर्षीही सूनीसुनीच होती. त्यामुळे कोरोनाचे संकट जाऊदे,  भक्तांचे आणि देवातले अंतर संपू दे अशी याचना भाविकांनी केली आहे.

आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.

****

अंगणवाडीतील लहान बालकांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित गावातील नागरिकांची मदत घ्यावी असं आवाहन परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे. ते आज आढावा बैठकीत बोलत होते. बालकांच्या खाऊबाबत कुठलाही गैरप्रकार आढळ्यास कडक कारवाईचा इशारा टाकसाळे यांनी दिला आहे. अंगणवाडीत भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी पंचायत विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ग्रामस्तरावर समन्वय साधणार असल्याची माहिती टाकसाळे यांनी यावेळी दिली.

//********//

 

No comments: