Sunday, 1 August 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 August 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधूला कांस्यपदक

** एमपीएससीमार्फत पदं भरण्यासंदर्भात शासन निर्णय जारी; ३० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठवण्याची संबंधित विभागांना सूचना

** औरंगाबाद इथले प्रसिद्ध नाट्यकर्मी प्राध्यापक त्र्यंबक महाजन यांचं निधन  

आणि

** लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सर्वत्र अभिवादन

****

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधूनं कांस्य पदक पटकावलं आहे. नुकत्याच झालेल्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जियो हिचा २१-१३, २१-१५  असा पराभव केला.

हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुष संघाचा ब्रिटनसोबत सामना सुरू आहे. सामन्यात दोन गोल करून भारतीय संघ आघाडीवर आहे.

मुष्टीयोद्धा सतीशकुमारचा उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला उझबेकिस्तानचा मुष्टीयोद्धा बखोदिर जालोलोवने ५ शून्य असा पराभव केला.

उपउपांत्यफेरीतल्या लढतीत जखमी झालेल्या सतीशकुमारच्या चेहऱ्यावर अनेक टाके असतानाही त्याने दिलेल्या लढतीबद्दल त्याचं कौतुक होत आहे. गोल्फमध्ये अनिर्बान लाहिरी तसंच उदयन माने यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

****

राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध विभागांतल्या रिक्त पदांपैकी उपसमितीनं परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीनं मंजूर केलेली आकृतिबंधातली पदं भरण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. संबंधित विभागांनी बिंदु नामावली तयार करुन, उचित मान्यता घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत याबाबतचे प्रस्ताव ‘एमपीएससी’कडे पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलैला झालेल्या यासंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर वित्त विभागानं याबाबतचा निर्णय जारी केला. ‘कोरोना’च्या संकटामुळे फक्त सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीखेरीज इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरतीप्रक्रीयेवर निर्बंध होते. आता यातील काही पदांसाठीची भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यात पंधरा हजार पाचशेहून जास्त पदांची भरती करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात केली होती, त्या प्रक्रियेला या शासन निर्णयामुळे सुरुवात झाली आहे.

****

केंद्र सरकारनं देशातल्या राज्यांना कोरोनाविरोधात लढ्यासाठी आतापर्यंत १ हजार ८२७ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. हा निधी आपत्कालीन कोविड प्रतिसाद पॅकेजच्या १५ टक्के एवढा आहे. देशभरात कोविड लसीच्या ३ कोटी १० लाख मात्रांचा साठा, सध्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडे असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच देशात लसींच्या ४८ कोटी ७८ लाख मात्रा पुरवण्यात आल्या असून आणखी ६८ लाखांहून अधिक मात्रा पाठवल्या जात आहेत. आतापर्यंत वाया गेलेल्या मात्रांसह ४५ कोटी ८२ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्याची माहिती मांडवीय यांनी दिली.

****

देशातल्या वस्तु आणि सेवा करापोटी संकलित रकमेनं जुलै महिन्यात एकशे सोळा हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. कोरोंना प्रादुर्भावानंतर अर्थव्यवस्था पूर्व पदावर येत असल्याचं हे लक्षण आहे, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत हे संकलन ३३ टक्के जास्त आहे.

****

तिहेरी तलाकविरोधात कायदा अस्तित्वात आल्याबद्दल आज देशभरात मुस्लिम महिला हक्क दिन पाळण्यात आला. केंद्र सरकारनं १ ऑगस्ट २०१९ ला तिहेरी तलाकविरोधात कायदा केल्यामुळे, एकाच वेळी तीन तलाक देणं, हा फौजदारी गुन्हा ठरला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर तिहेरी तलाक प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली असून देशभरातल्या मुस्लिम महिलांनी या कायद्याचं स्वागत केलं आहे. हा कायदा आणून सरकारनं देशातल्या मुस्लिम महिलांचं स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मविश्वास बळकट केला आहे तसंच त्यांच्या घटनात्मक, मूलभूत आणि लोकशाही अधिकारांचंही रक्षण केलं आहे, असं मत अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केलं आहे.

****

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आपत्तीग्रस्तांसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये तातडीनं करण्याच्या तसंच दीर्घकालीन मदत योजनांचा समावेश आहे. दुकानांमधून तसंच घरांमधून गाळ काढण्यासाठी आणि पिकांच्या नुकसानापोटी नागरिकांना रोखीनं किंवा बँक खात्यात तातडीनं भरपाई द्यावी, मोबाईलनं काढलेलं छायाचित्र पंचनाम्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावं, पशुपालक-मच्छिमार-हातगाड्या-टपऱ्याधारक आणि दुकानदारांना मदत देण्यात यावी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिल माफ करावं, इत्यादी मागण्यांचा यात समावेश आहे. कोकणातील जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारणं, राज्यात दरडींचा धोका असलेल्या सगळ्या गावांचं सर्वेक्षण करून पुनर्वसन करणं, यासह अन्य काही दीर्घकालीन योजना राबवण्यास सुरुवात करावी, असंही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद इथले प्रसिद्ध नाट्यकर्मी प्राध्यापक त्र्यंबक महाजन यांचं काल मध्यरात्री निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. 'नाट्यधर्मी मराठवाडा, कृष्णवर्णीय नाट्यत्रयी या पुस्तकांचं लेखन तर 'अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन पाच अध्यक्षीय भाषणे या पुस्तकाचं त्यांनी संपादन केलं होतं. याशिवाय अन्य ग्रंथसंपदाही त्यांच्या नावावर आहे. औरंगाबाद इथं नागसेनवनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं. मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू व्हावा या साठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. आज विधान भवनात विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी लोकमान्यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चेंबूर इथे अण्णाभाऊ साठे उद्यानात अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

नाशिक इथे ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी साठे यांना आदरांजली वाहिली. नाशिकच्या महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच विविध सेवाभावी आणि शिक्षण संस्थांच्या वतीनंही साठे यांना अभिवादन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला आज विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या औरंगाबाद शाखेतर्फेही आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं, तसंच जयंतीच्या कार्यक्रमाचा खर्च टाळून त्यातून पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना मदत पाठवण्यात आली. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात आलं. परभणीचे जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. पुण्यातल्या टिळक वाड्यातून आजपासून या अभियानाची सुरुवात होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीतला काँग्रेसचा सहभाग आणि स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेलं काँग्रेसचं योगदान नव्या पिढीसमोर मांडलं जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं अरण्यऋषी  मारुती चितमपल्ली यांना आज जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या विद्यापीठाच्या सतराव्या वर्धापन दिनी आज विद्यापीठाच्या विविध पुरस्कारांचं वितरण झालं. अहिल्यादेवी होळकर यांचे नाव असलेल्या विद्यापीठाकडून जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्याबाबत चितमपल्ली यांनी आनंद व्यक्त केला.

//********//

 

 

No comments: