Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 August 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.
****
टोक्या
ऑलिम्पिक मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघावर १-० नी मात करत भारताच्या महिला हॉकी संघानं
पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टोक्योत आज सकाळी उपांत्यपूर्व फेरीचा
सामना खेळला गेला, या सामन्यात भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या
गोलमुळे १-० नं मिळवलेली आघाडी भारतानं शेवटपर्यंत कायम ठेवत उपांत्य फेरीतील प्रवेश
निश्चित केला.
या
विजयानंतर क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी भारतीय महिला हॉकी संघाचं अभिनंदन
केलं आहे. भारतीय संघ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचत असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात
म्हटलं आहे. १३० कोटी भारतीयांच्या शुभेच्छा महिला खेळाडूंना असल्याचं ठाकूर म्हणाले.
****
पेगासससह
अन्य मुद्यांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ
केला. त्यामुळे दोन्ही सदनाचं कामकाज सुरूवातीला १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं,
१२ वाजेनंतरही दोन्ही सभागृहात गदारोळ कायम राहिल्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत दोन्ही
सदनांचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
दरम्यान,
लवाद सुधारणा विधेयक २०२१ लोकसभेत सादर करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रीय
लसीकरण अभियानाअंतर्गत देशभरात आतापर्यंत ४७ कोटी २ लाख लोकांना कोविड प्रतिबंधात्मक
लस देण्यात आली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे लसीच्या ३ कोटींहून अधिक मात्रा
उपलब्ध असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांकडे ४९ कोटी ४९ लाख लसीच्या मात्रा दिल्या असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयानं
दिली आहे.
****
कोविड
प्रतिबंधक लस घेतलेल्या सर्वांना उपनगरीय रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत
विचार करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. वकिलांना उपनगरीय
रेल्वेनं प्रवास करण्यास परवानगी देण्याबाबतची याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं
ही सूचना केली. वकिलांच्या संघटनेनं ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाचं प्रत्यक्ष
कामकाज सुरू झालं आहे, मात्र सध्या उपनगरीय रेल्वेनं प्रवासाची परवानगी नसल्यामुळे
वकिलांना न्यायालयात वेळेत पोहोचणं शक्य नाही त्यामुळे त्यांना उपनगरीय रेल्वेनं प्रवासाची
मुभा द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली. वकिलांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांकडून
अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी सरकारनं दिली. मात्र अजून त्यावर मुख्यमंत्र्यांची
स्वाक्षरी झालेली नाही अशी माहिती यावेळी देण्यात आली. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी
होणार आहे.
****
देशात
काल दिवसभरात कोरोना विषाणू बाधित ४० हजार १३४ नवे रुग्ण आढळून आले, तर ४२२ रुग्ण मरण
पावले. आतापर्यंत ३ कोटी १६ लाख ९५ हजार ९५८ जण या आजारातून बरे झाले आहेत अशी माहिती
आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
आपत्कालीन
परिस्थितीमध्ये नागरिकांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज सकाळी
सांगली जिल्ह्यात पोहचले असून, त्यांनी भिलवडी इथं संकटग्रस्तांशी संवाद साधला. सरकार
कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे, तुमच्या
हिताचेच निर्णय घेतले जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. सर्वांची निवेदने
मी घेत आहे, सर्वांच्या सूचनांचा स्वीकार केला जाईल आणि उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत
यावर चर्चा करू असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पावसाळ्या नंतर येणारे आजार होणार
नाहीत यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या. अतिवृष्टीचा इशारा
येताच सखल भागातील लोकांचं प्रशासनानं लगेच स्थलांतर करावं, जेणेकरून जीवित हानी होणार
नाही असं सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
सोलापूर
जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत ६१३ मुलं कोरोना विषाणू बाधित झाल्याचं समोर आलं आहे.
यापूर्वीही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील सुमारे १२ हजार मुलांना बाधा
झाली होती. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असण्याची
शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने विविध पातळीवर उपाययोजना केली जात आहेत, असं
सूत्रांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या तुळजापूरचे माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांच्या निधनाबद्दल
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. गुरुजींनी त्यांच्या राजकीय, सामाजिक,
शैक्षणिक, अध्यात्मिक कार्यातून समाजासमोर ध्येयनिष्ट आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठेवला.
त्यांनी घडवलेले विद्यार्थीच त्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढे घेऊन जातील
अशा शब्दात पवार यांनी आलुरे गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली.
****
नाशिक
जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यानं अनेक पाणी प्रकल्प ५० टक्क्यांहून अधिक भरले आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने १७ गावे आणि ३५ वाड्यांना
पाणी पुरवठा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment