Monday, 2 August 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.08.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 August 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑगस्ट ०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागांतली पदं भरण्यासंदर्भातला शासन निर्णय जारी.

·      स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेस ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबवणार.

·      राज्यात सहा हजार ४७९ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर ३७६ नवीन बाधित.

·      तुळजापूरचे माजी आमदार शिक्षण महर्षी सि. ना. आलुरे गुरूजी आणि औरंगाबादचे प्रसिद्ध नाट्यकर्मी प्राध्यापक त्र्यंबक महाजन यांचं निधन.

·      टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधूला कांस्य पदक.

आणि

·      भारतीय पुरुष हॉकी संघ ४९ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल, थाळीफेकमध्ये कमलप्रित कौरची आज अंतिम लढत.

****

राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध विभागांतल्या रिक्त पदांपैकी उपसमितीनं परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीनं मंजूर केलेली आकृतिबंधातली पदं भरण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. संबंधित विभागांनी बिंदू नामावली तयार करुन, उचित मान्यता घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत याबाबतचे प्रस्ताव ‘एमपीएससी’कडे पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलैला झालेल्या यासंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर वित्त विभागानं याबाबतचा निर्णय जारी केला. ‘कोरोना’च्या संकटामुळे फक्त सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीखेरीज इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरतीप्रक्रीयेवर निर्बंध होते. आता यातील काही पदांसाठीची भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यात पंधरा हजार पाचशेहून जास्त पदांची भरती करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात केली होती, त्या प्रक्रियेला या शासन निर्णयामुळे सुरुवात झाली आहे.

****

संगणीकृत सातबारा कालपासून नव्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात काल महसूल दिनी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार या कार्याक्रमात सिल्लोड इथून दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. डिजीटल स्वाक्षरीत फेरफार वितरण, सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण आणि ई-मिळकत पत्रिका- ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणं, या सुविधांचा शुभारंभही काल करण्यात आला.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. पुण्यातल्या टिळक वाड्यातून कालपासून या अभियानाला सुरुवात झाली. या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीतला काँग्रेसचा सहभाग आणि स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेलं काँग्रेसचं योगदान नव्या पिढीसमोर मांडलं जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

****

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आपत्तीग्रस्तांसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये तातडीनं करण्याच्या तसंच दीर्घकालीन मदत योजनांचा समावेश आहे. दुकानांमधून तसंच घरांमधून गाळ काढण्यासाठी आणि पिकांच्या नुकसानापोटी नागरिकांना रोखीनं किंवा बँक खात्यात तातडीनं भरपाई द्यावी, मोबाईलनं काढलेलं छायाचित्र पंचनाम्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावं, पशुपालक-मच्छिमार-हातगाड्या-टपऱ्याधारक आणि दुकानदारांना मदत देण्यात यावी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिल माफ करावं, इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.

****

राज्यात काल सहा हजार ४७९ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६३ लाख १० हजार १९४ झाली आहे. काल १५७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३२ हजार ९४८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १ दशांश टक्के झाला आहे. काल चार हजार ११० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६० लाख ९४ हजार ८९६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ५९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७८ हजार ९६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३७६ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन आणि परभणी तसंच औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २०० रुग्ण आढळले तर उस्मानाबाद जिल्ह्यात ८३ नव्या रुग्णांची भर पडली. औरंगाबाद ३६, लातूर २७, जालना २४, परभणी पाच तर हिंगोली जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. नांदेड जिल्ह्यात काल एकही रुग्ण आढळला नाही.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. भारतीय जनता युवा मोर्चाच्या औरंगाबाद शाखेतर्फेही अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं, तसंच जयंतीच्या कार्यक्रमाचा खर्च टाळून त्यातून पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना मदत पाठवण्यात आली.

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं.

अण्णाभाऊ साठे यांनी सशक्त आणि समृद्ध साहित्याची निर्मिती केली, तसंच गावकुसाबाहेरच्या शाहिरी आणि तमाशाला त्यांनी प्रतिष्ठाही मिळवून दिली, असं प्रतिपादन लोककला अकादमीचे संचालक डॉ.गणेश चंदनशिवे यांनी केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या अध्यासन केंद्राच्या वतीने काल ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आलं, त्यावेळी चंदनशिवे बोलत होते. औरंगाबादचे खासदार इम्तियाज़ जलील यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाचे उदघाटन खासदार जलील यांच्या हस्ते काल करण्यात आलं.

परभणीचे जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्पण करून अभिवादन केलं. अण्णा भाऊ साठे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाकडून एखादा पुरस्कार अथवा फेलोशिप दिली जावी यासाठी प्रयत्न केले जातील, तसंच अण्णाभाऊ साठे यांचा चरित्रपट तसंच चित्रपट करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असंही सांस्कृतिक कायर्यमंत्री देशमुख यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचे माजी आमदार शिक्षण महर्षी सिद्रामप्पा नागप्‍पा आलुरे - सि. ना. आलुरे गुरूजी यांचं आज पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. १९८० साली तुळजापूर मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले होते. तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक होते. मराठवाड्याचे साने गुरुजी अशी ओळख असलेले आलुरे गुरुजी महात्मा गांधी, साने गुरुजी, विनोबा भावे यांच्या विचारानं प्रभावीत होते. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, सहकार क्षेत्रातही त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे. बाबा आमटे यांच्या 'भारत जोडो' अभियानात ते सहभागी होते. काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख होती. शासनाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, लातूरच्या सिध्देश्वर सहकारी बँकेचे ते संस्थापक होते, तर शिक्षक प्रसारक मडंळ अणदूरची स्थापना करून त्यांनी त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचं जाळं विस्तारलं. तुळजापूरला अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता अणदूर या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

औरंगाबादचे प्रसिद्ध नाट्यकर्मी प्राध्यापक त्र्यंबक महाजन यांचं शनिवारी मध्यरात्री निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते.नाट्यधर्मी, मराठवाडा, कृष्णवर्णीय नाट्यत्रयी या पुस्तकांचं लेखन तर 'अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन पाच अध्यक्षीय भाषणे या पुस्तकाचं त्यांनी संपादन केलं होतं. ‘गाढवाचं लग्न’ या गाजलेल्या विनोदी नाटकाचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला होता. तर दीपस्तंभ,जावईबापू, झुलते मनोरे, वासूकाका ही त्यांनी लिहीलेली नाटकं खूप गाजली होती. नाटक आणि रंगभूमीविषयी अपार प्रेम असलेले महाजन यांनी या विषयांवर केलेलं संशोधन आणि लेखन, नाट्य अभ्यासकांसाठी ठेवा म्हणून ओळखलं जातं. औरंगाबाद इथं नागसेनवनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून महाजन यांनी अनेक वर्ष काम केलं. मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू व्हावा या साठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. २००६ साली त्यांना राज्य सरकारनं जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना काल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. काल या विद्यापीठाच्या सतराव्या वर्धापन दिनी विविध पुरस्कारांचं वितरण झालं. अहिल्यादेवी होळकर यांचे नाव असलेल्या विद्यापीठाकडून जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्याबाबत चितमपल्ली यांनी आनंद व्यक्त केला.

****

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधूनं कांस्य पदक पटकावलं आहे. काल संध्याकाळी झालेल्या या सामन्यात सिंधूने पहिल्यापासूनच आक्रमक खेळी करत, चीनच्या ही बिंग जियो हिचा २१-१३, २१-१५ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. रियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य पदक जिंकलं होतं. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी सिंधू ही भारताची पहिलीच बॅटमिंटनपटू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.व्ही. सिंधूचं अभिनंदन केलं आहे. सिंधू भारताचा गौरव असून आपल्या सर्वोत्तम ऑलिम्पिक खेळाडूंपैकी एक आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. सिंधुनं जिंकलेल्या कांस्यपदकाचा आनंद देशवासियांसाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी तिचं कौतुक केलं आहे.

 

भारतीय पुरुष हॉकी संघ ४९ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला असून, उद्या गतविजेत्या बेल्जियमसोबत भारताचा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. दरम्यान, आज सकाळी साडे आठ वाजता भारतीय महिला हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियासोबत उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे. थाळीफेकमध्ये कमलप्रीत कौरही आज आपला अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे.

 

मुष्टीयोद्धा सतीशकुमारचा काल उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला उझबेकिस्तानचा मुष्टीयोद्धा बखोदिर जालोलोवने ५ शून्य असा पराभव केला. उपउपांत्य फेरीतल्या लढतीत जखमी झालेल्या सतीशकुमारच्या चेहऱ्यावर अनेक टाके असतानाही त्याने दिलेल्या लढतीबद्दल त्याचं कौतुक होत आहे. गोल्फमध्ये अनिर्बान लाहिरी तसंच उदयन माने यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

****

नवीन स्टार्टअपमध्ये येणाऱ्या अडचणी आणि अपेक्षित असणारी मदत या संदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवउद्योजकांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आलं. 'एआयसी-बामु फाउंडेशन' च्या वतीनं एक दिवसीय अवलोकन आणि मार्गदर्शन शिबीर घेऊन, बॅटरी, हेल्थकेयर, फूड सर्व्हिस, रोबोटिक्स, डिजिटल मीडिया आदी प्रकल्पांवर सुरू असलेलं काम, त्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेत, मार्गदर्शन करण्यात आलं. अनेक नव उद्योजकांनी या शिबीरात सहभाग घेतला. नव उद्योजकांच्या कार्याचा आढावा घेऊन, त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

****

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं महाड इथल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून वीस टन गव्हाच्या पिठाचा ट्रक काल रवाना करण्यात आला. संकटात मदतीचा हात देण्याची शिवसेना प्रमुखांची शिकवण असून याच भावनेतून ही मदत देण्यात आल्याचं बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी यावेळी सांगितलं. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावं असं आवाहनही खोतकर यांनी यावेळी केलं.

****

हवामान

येत्या २४ तासात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तावण्यात आली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाच पुणे हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या काळात सर्वत्र आकाश ढगाळ राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

****

No comments: