आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ ऑगस्ट २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
ऑलिम्पिक मध्ये भारताचा महिला हॉकी संघ पहिल्यांदाच
उपांत्य फेरीत पोहचला आहे. आज टोकियो इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या
संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला १-० नी हरवत हा दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, ऑलम्पिक
स्पर्धेत पदतालिकेत चीन अव्वल स्थानावर आहे. चीननं आतापर्यंत २४ सुवर्ण पदकांसह ५१
पदकं जिंकली आहेत. त्याखालोखाल अमेरिका २० सुवर्ण पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर
तिसऱ्या स्थानावर असलेल्या जपाननं आतापर्यंत १७ सुवर्ण पदकं मिळवली आहेत.
****
संसदेत आज कोविड-19 आणि त्या संदर्भातल्या विविध
मुद्द्यांवर चर्चा प्रस्तावित आहे. लोकसभेत आदिवासी सुधारणा विधेयक-२०२१ आणि सामान्य
विमा व्यवसाय - राष्ट्रीयीकरण सुधारणा विधेयक २०२१ यावर चर्चा होईल. तर राज्यसभेत अनुसूचित
जाती आदेश सुधारणा विधेयक २०२१ आणि आंतरदेशीय जहाज विधेयक २०२१ वर चर्चा नियोजित आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्यातल्या
पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी काही वेळापूर्वीच कोल्हापूर विमानतळावर पोहचले
असून तिथून ते सांगलीला जाणार आहेत. पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ते दुपारी
१ वाजता प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय लसीकरण अभियानाअंतर्गत देशभरात आतापर्यंत
४७ कोटी २ लाख लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांकडे लसीच्या ३ कोटींहून अधिक मात्रा उपलब्ध असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं
आहे. आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे ४९ कोटी ४९ लाख लसीच्या मात्रा दिल्या
असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण
देवाजी आदमाने पाटील यांचं काल निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव
देहावर काल पैठण तालुक्यातल्या शेकटा या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात
आले.
****
No comments:
Post a Comment