Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 August 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.
****
विरोधी
पक्षांनी पेगासेस आणि अन्य मागण्यांसाठी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय आला. यामुळे प्रारंभी दोन्ही
सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
सभागृहाचं
कामकाज आज सकाळी सुरू झाल्यानंतर कॉंग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, अकाली दल आणि
इतर विरोधी पक्षाचे सदस्य हौद्यात आले आणि त्यांनी घोषणा देण्यास सुरूवात केली. अध्यक्ष
ओम बिर्ला यांनी गोंधळातच कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही विरोधी
पक्षांनी गोंधळ सुरूच ठेवला, त्यामुळं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज १२ वाजेपर्यंत
तहकूब केलं. राज्यसभेतही असाच गोंधळ झाला त्यामुळं सभापती व्यंकय्या नायडू यांनीही
सभागृहाचं कामकाज दुपारी बारा पर्यंत तहकूब केलं. १२ वाजेनंतर पुन्हा सभागृह सुरू होताचं
विरोधी पक्षांनी गदारोळ सुरु केला. त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत
तहकूब करण्यात आलं.
****
विरोधी
पक्ष संसद आणि निवडून देणाऱ्या जनतेचा सन्मान करीत नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केला आहे. संसद भवन परीसरात भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक
झाली, या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. संसदेत मांडण्यात येणारी विधेयकं ही
जनहिताची असून विरोधी पक्ष या विधेयकांवर चर्चा करण्यास तयार नसल्याचं त्यांनी म्हटलं
आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पंतप्रधानांचा
संदर्भ देत विरोधी पक्ष संसदेच्या कामकाजात अडथळे आणून जनतेचा पैसा आणि वेळेचं नुकसान
करत असल्याचं म्हटलं आहे.
****
गेल्या
२४ तासात भारतात ३०, हजार ५४९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून ४२२ नागरिकांचा
मृत्यू झाला आहे. ३८ हजार ८८७ नागरिक बरे झाले आहेत.
देशात
आतापर्यंत तीन कोटी १७ लाख २६ हजार ५०७ रुग्ण झाले असून एकूण यापैकी तीन कोटी आठ लाख
९६ हजार ३५४ नागरिक बरे झाले आहेत. सध्या देशात एकूण चार लाख चार हजार ९५८ सक्रीय रुग्ण
आहेत. आतापर्यंत देशात या आजारानं चार लाख २५ हजार १९५ रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.
दरम्यान,
देशात आतापर्यंत ४७ कोटी ८५ लाख ४४ हजार ११४ लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय
आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
****
टोकियो
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज भारताची सुरुवात निराशाजनक झाली. अन्नू राणी भालाफेकमध्ये
अंतिम फेरी गाठू शकली नाही तर महिलांच्या फ्रीस्टाईल ६२ किलो वजनी गटात युवा कुस्तीपटू
सोनम मलिक पहिल्याच सामन्यात पराभूत झाली. शेवटच्या ३० सेकंदांपर्यंत ती २-० अशी आघाडीवर
होती पण मंगोलियन कुस्तीपटू बोलोरतुया खुरेलखूने सामना बरोबरीत आणला. त्यानंतर जास्त
गुणांचा डाव खेळल्यामुळे मंगोलियन कुस्तीपटूला विजेता घोषित करण्यात आले.
हॉकीच्या
उपांत्यफेरीत भारतीय पुरूष संघावर बेल्जियमनं आज सकाळी झालेल्या सामन्यात ५-२ न मात
केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारतीय संघ २-१ नं आघाडीवर
होता. मात्र एलेक्सजेंडर हेंड्रिक्सच्या शानदार खेळामुळं भारताचा पराभव झाला.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. हार-जीत हा खेळाचाच भाग असल्याचं
मोदी यांनी म्हटलं आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनीही या संघाचं अभिनंदन केलं
आहे.
****
सांगोला-मिरज
रस्त्यावर करांडेवाडी फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या एका अपघातात चारचाकीच्या चालकासह
दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले. भरधाव वेगात निघालेल्या मालट्रकने
समोरून येणाऱ्या मोटारीला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला.
दरम्यान,
या अपघातानंतर मालट्रक चालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला. मृत आणि जखमी हे गुलबर्गा
जिल्ह्यातले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळानं जाहीर केलेल्या
पर्यायी मूल्यांकन धोरणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल आज जाहीर
होणार आहे. दुपारी ४ वाजता हा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण
मंडळाने पत्रकाद्वारे दिली आहे. hscresult.mkcl.in, Mahresult.nic.in या संकेत स्थळावर
हे निकाल उपलब्ध होतील, विद्यार्थ्यांना या निकालाची प्रिंट घेता येईल.
यंदा
बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहावीच्या
परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांची सरासरी, ११ वी चा निकाल आणि १२ वीच्या
वर्षात झालेल्या तोंडी, प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षांच्या आधारे हा निकाल लावण्यात
आला आहे.
****
जम्मू
काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्याच्या चंदाजी भागात आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या
चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. सुरक्षा
दलाची शोध मोहिम सुरू असतांना या दहशतवाद्यानं गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली.
****
No comments:
Post a Comment