Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 August 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०३ ऑगस्ट २०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना
आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी.
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी
घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर
मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड
-१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय
मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
बीडसह ११ जिल्हे वगळता राज्यात कोविड संसर्ग निर्बंधांमध्ये
काही प्रमाणात सूट, सर्व दुकानं रात्री आठ वाजेपर्यंत तर शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत
सुरू राहणार, रविवारी मात्र जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकानं आणि मॉल्स बंद राहणार.
·
वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार,
मिरवणुका, निदर्शनांवरील निर्बंध कायम.
·
राज्यात चार हजार ८७९ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ४ जणांचा
मृत्यू तर ३२१ नवीन बाधित.
·
संपर्क विरहीत डिजिटल अर्थव्यवहार ‘ई रुपी’ सुविधेचा पंतप्रधानांच्या
हस्ते शुभारंभ.
·
राज्यात जातनिहाय जनगणना करण्याचा राज्य मागासवर्गीय आयोगाचा
ठराव.
·
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार.
आणि
·
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पुरूष संघाचा हॉकीच्या उपांत्यफेरीचा सामना
गतविजेत्या बेल्जियम सोबत काही वेळापूर्वी सुरू, महिला हॉकीचा संघही ऑस्टेलियाला पराभूत
करून उपांत्यफेरीत दाखल.
****
राज्यात
कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेले ११ जिल्हे वगळता, उर्वरीत जिल्ह्यांमध्ये कोविड
निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने काल
यासंदर्भात साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ब्रेक दि चेनचे आदेश
जारी केले.
निर्बंध
कायम असलेल्या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यासह, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर,
सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, रायगड, आणि पालघर जिल्ह्याचा समावेश
आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांतल्या निर्बंधाबाबत स्थानिक आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेणार आहे.
मराठवाड्यात
औरंगाबाद, नांदेड, लातूर, जालना, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात निर्बंध
शिथील करण्यात आले आहेत. यानुसार, सर्व दुकानं आता दररोज रात्री आठ वाजेपर्यंत तर शनिवारी
दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकानं
आणि मॉल्स बंद राहतील.
सर्व
सार्वजनिक उद्यानं तसंच मैदानं व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंग आदींसाठी खुली करण्यात
आली आहेत. जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालयं सोमवार ते
शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु
राहतील, आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.
सर्व
उपाहारगृहं ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. सर्व शासकीय
तसंच खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेने सुरु राहतील, मात्र प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी
कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची तसंच जी कार्यालयं वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु
ठेवता येऊ शकतात, ती तशी सुरु ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
शेतीविषयक
कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. तर चित्रपटगृहे,
नाट्यगृहे, मॉल्समधील मल्टीप्लेक्स तसंच सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं बंदच राहतील.
शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल.
रात्री
९ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
वाढदिवस समारंभ, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका,
निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
****
राज्यात
काल चार हजार ८७९ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या ६३ लाख १५ हजार ६३ झाली आहे. काल ९० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३३ हजार ३८ झाली असून, मृत्यूदर
दोन पूर्णांक १ दशांश टक्के झाला आहे. काल आठ
हजार ४२९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६१ लाख ०३ हजार ३२५ रुग्ण, कोरोना
विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला
आहे. सध्या राज्यभरात ७५ हजार ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल ३२१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये
औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन तर बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड
जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १६७ रुग्ण आढळले तर उस्मानाबाद जिल्ह्यात ९६
नव्या रुग्णांची भर पडली. औरंगाबाद २०, लातूर १८, जालना ११, नांदेड ७, परभणी इथं २
तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविडचा एकही रूग्ण आढळला नाही.
****
ई रुपी
या सुविधेचा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. मुंबईतल्या
एका खासगी रुग्णालयात कोविड लसीची मात्रा घेण्यासाठी एका नागरिकानं या ई रुपी सेवेचा
वापर करून या सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. ई-रूपी ही रोख आणि संपर्क विरहीत डिजिटल
म्हणजेच अंकिकृत अर्थव्यवहार सुविधा आहे. राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं,
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण तसंच वित्तीय सेवा
विभागाच्या मदतीनं, आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर ही सुविधा विकसित केली आहे. या सुविधेच्या
माध्यमातून पैसे दिल्यास, ते ज्या कारणासाठी दिले आहेत, त्याच कारणासाठी ते वापरले
जाणार आहेत. ही सुविधा डिजिटल व्यवहारांना अधिक सक्षम करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी
व्यक्त केला.
****
विद्यार्थ्यांसाठी
दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केली
आहे. नॅब आणि अनाम प्रेम या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी यासंदर्भात
दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं ही विचारणा
केली. सिनेमांच्या शेकडो वाहिन्या असतांना शिक्षणासाठी एखादी २४ तास चालणारी वाहिनी
का नाही? असं न्यायालयानं विचारलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेची स्वतंत्र दूरचित्रवाहिनी
आहे, तशीच शिक्षणासाठीही असायला हवी. याचा
केंद्र आणि राज्य सरकारांनी विचार करावा, अशी सूचना न्यायालयानं केली. याबाबत माहिती
आणि प्रसारण मंत्रालयाशी चर्चा करून येत्या गुरुवारी भूमिका स्पष्ट करावी, अशी सूचनाही
मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे.
****
राज्यात
जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव राज्य मागासवर्गीय आयोगानं केला आहे. इतर मागासवर्गीय
प्रवर्गाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेला इम्पेरिकल डेटा गोळा
करण्यासंदर्भात काल पुण्यात झालेल्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. या बैठकीला आयोगाचे
अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्यासह १० सदस्य उपस्थित होते. जातनिहाय जनगणनेचा
इम्पेरिकल डेटा राज्याकडे उपलब्ध नसल्यानं ही जनगणना करण्यात यावी. असं या ठरावात म्हटलं
आहे. सदरील जनगणना ही सरकारी यंत्रणेच्या मदतीनंच करण्याची शिफारसही आयोगानं राज्य
सरकारला केली आहे.
****
मराठा
समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात २३ ठिकाणी वसतीगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी
१४ ठिकाणी वसतीगृहांच्या इमारती तयार असून त्याचं लवकरच उद्घाटन करण्याच्या सूचना देण्यात
आल्या आहेत. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही
महिती दिली. काल मुंबईत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बीड
आणि लातूर सह दहा जिल्ह्यात प्रत्येकी एक तर औरंगाबाद आणि नाशिक इथं प्रत्येकी दोन
वसतीगृहं उभारण्यात आली आहेत. उर्वरित ठिकाणी वसतीगृह सुरू करण्यासंदर्भात जागा उपलब्धतेसाठी
महसूल मंत्री हे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याचं
चव्हाण यांनी सांगितलं. छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्था- सारथीचं
विभागीय केंद्र तसंच जिल्हा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतीमान
करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल आज जाहीर होणार
आहे. दुपारी ४ वाजता हा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने
पत्रकाद्वारे दिली आहे. Hscresult.mkcl.in, Mahresult.nic.in या संकेत स्थळावर हे निकाल
उपलब्ध होतील आणि तिथून त्याची प्रिंट घेता येईल.
यंदा
बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहावीच्या
परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांची सरासरी, ११ वी चा निकाल आणि १२ वीच्या
वर्षात झालेल्या तोंडी, प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षांच्या आधारे हा निकाल लावण्यात
आला आहे.
****
ग्राम
कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी काल दिले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती
स्थापन करून अंमलबजावणी करण्याबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल विशेष बैठक घेण्यात
आली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. विशेषत:
अकोला, अमरावती, बुलडाणा, जालना तसंच जळगाव जिल्ह्यातल्या समित्या गठित करण्याची प्रक्रिया
तातडीनं गतिमान करावी, ग्रामसेवकांनी या समितीच्या कामकाजात सदस्य सचिव म्हणून जबाबदारी
स्वीकारून कामकाज सुरू करावं, असं पवार यांनी सांगितलं. ग्रामसेवकांची रिक्त पदं प्राधान्यानं
भरण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
औरंगाबाद,
बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातल्या
उर्वरित समित्यांचं गठन करावं. समित्या गठित करण्याचं काम प्राध्यान्यानं करून गावातली
कामं मार्गी लावावीत अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केल्या.
****
परभणी
जिल्ह्यातल्या सोनपेठ इथला तहसीलदार आशिषकुमार बिरादार ला ५५ हजार रुपयांची लाच घेताना
लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहाथ पकडलं. हिंगोली इथल्या पोलीस उपाधीक्षक यांच्या
पथकानं ही कारवाई केली. वाळूचा ट्रक कारवाई न करता सुरू ठेवण्यासाठी मासिक हप्ता म्हणून
बिरादार यानं ५५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
****
सामाजिक
न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत लातूर इथल्या वैशाली सार्वजनिक बौद्ध विहाराच्या
सुशोभीकरणासाठी सुमारे ५३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या बौद्ध विहाराच्या
कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.
या विहाराच्या सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी
ते बोलत होते.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
नागनाथराव रावणगावकर यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन बाऱ्हाळी इथं निधन झालं.
ते ७२ वर्षांचे होते. १९८० मध्ये समाजवादी काँग्रेस पक्षाकडून मुखेड विधानसभेची निवडणूक
लढवून ते आमदार झाले होते. १९७४ ते १९८१ पर्यंत त्यांनी नांदेड जिल्हा परीषदेत समाजकल्याण
सभापती म्हणूनही काम केलं होतं. १९८० ते १९८५ या काळात राज्य महात्मा फुले विकास महामंडळाचे
अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांच्या पार्थिवावर काल रात्री नांदेडमध्ये अंत्यसंस्कार
करण्यात आले.
****
टोक्यो
ऑलिम्पिकमध्ये पुरूष संघाचा हॉकीच्या उपांत्यफेरीचा सामना गतविजेत्या बेल्जियम सोबत
काही वेळापूर्वी सुरू झाला आहे. भारत दोन – एक नं आघाडीवर आहे. दोन्ही संघ एकमेकांवर
मात करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.
दरम्यान,
काल हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाचा एक शून्य असा पराभव करत, उपांत्यफेरीत
प्रवेश केला. उद्या बुधवारी महिला संघाचा उपांत्यफेरीचा सामना अर्जेंटिना संघासोबत
होणार आहे.
घोडेस्वारीच्या
अंतिम फेरीत भारताच्या फवाद मिर्जा ने प्रवेश केला आहे.
काल
थाळीफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची कमलप्रीत कौर सहाव्या स्थानावर राहिली. ५०
मीटर रायफल नेमबाजीच्या पात्रता फेरीत भारताचे एपीएस तोमर आणि संजीव राजपुत अनुक्रमे
२१ व्या आणि ३२ व्या क्रमांकावर राहिले. धावपटू द्युतीचंदही २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत
उपांत्यफेरीत पोहोचू शकली नाही.
****
प्रशासकीय
आधिकारी आँचल गोयल यांना परभणीच्या जिल्हाधिकारी पदी रुजू करून घेतलंच पाहिजे अशी मागणी
"जागरूक नागरिक आघाडी"च्या वतीनं करण्यात आली आहे. आघाडीच्या वतीनं काल राज्य
शासनाविरोधात निदर्शनं करण्यात आली.
****
औरंगाबादच्या
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी खुलताबाद
तालुक्यातल्या विविध गावांमधल्या नागरिकांनी मदत म्हणून अन्नधान्य, मसाले, वापरायचे
कपडे असं साहित्य जमा केलं आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून जमा झालेली सुमारे चार
ट्रक मदत काल पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आली.
****
नांदेड
शहर कृती समितीच्या वतीने माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वाखाली मदत
निधी संकलन फेरी काढण्यात आली होती. या मदत निधी फेरीत एक लाख चौतीस हजार २०० रूपये
मदत जमा झाली. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नांदेडचे जिल्हाधिकारी
डॉ विपीन ईटनकर यांच्याकडे काल सुपूर्द करण्यात आला
****
औरंगाबाद
इथलं प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याऐवजी औरंगाबाद इथचं व्हावं या
मागणीसाठी योग्य ती कार्यवाही करून पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी एम.आय.एम. पक्षाच्या
वतीनं विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे
क्रीडा विद्यापीठ राजकीय हेतूपोटी जाणून बुजून पुणे इथं हलवण्यात आलं असल्याचा आरोप
करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा विकास आणि खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करून
जिल्हा प्रशासनानं योग्य ती कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
****
भारतीय
स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड
जिल्ह्यातील कर्ज वसुलीसाठी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांना पैकी १ हजार
८५ प्रकरणात काल राष्ट्रीय लोक आदलतीत तडजोड करण्यात आली. या तडजोडीतून बँकेची १० कोटी
४४ लाख रुपये वसुली झाली असल्याची माहिती भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय मुख्य व्यवस्थापक
शंकर येरावार यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment