Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 04 August 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०४ ऑगस्ट २०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना
आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी.
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी
घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर
मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड
-१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय
मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत, दुरुस्ती आणि इतर दीर्घकालीन
उपायांसाठी, ११ हजार ५०० कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.
·
जालन्यात ३६५ खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास मंजुरी.
·
साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी.
·
राज्य शिक्षण मंडळाच्या १२वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ६३ शतांश
टक्के तर केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाचा १०वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक चार दशांश
टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.
·
राज्यात सहा हजार पाच नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात सहा जणांचा
मृत्यू तर ३१० नवीन बाधित.
आणि
·
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राचा
अंतिम फेरीत प्रवेश, मुष्टीयुद्धमध्ये लवलीना बार्गोहीनची तुर्कीच्या खेळाडूशी लढत
तर महिला हॉकी संघाचा अर्जेंटिनासोबत उपांत्यफेरीचा सामना.
****
पूर
आणि अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसंच दुरुस्ती आणि इतर
दीर्घकालीन उपायांसाठी, ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चाला, राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता
दिली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पूराचं संकट, दरडी कोसळण्याच्या घटना, यावर तातडीनं
कारवाई करण्याच्या सूचना, प्रशासनाला दिल्या आहेत.
आपत्तीग्रस्त
नागरीकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दरानं मदत करण्यात येणार
आहे. या निधीपैकी मदतीसाठी १५०० कोटी रुपये, पुनर्बांधणीसाठी तीन हजार कोटी तर बाधित
क्षेत्रात सौम्यीकरण उपाययोजनांसाठी, सात हजार कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.
कपड्यांच्या
नुकसानाकरता प्रति कुटुंब पाच हजार रुपये, तर भांडी वस्तू यांच्या नुकसानीपोटी पाच
हजार रुपये, दुधाळ जनावरांसाठी ४० हजार रुपये प्रति जनावर, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी
प्रती जनावर ३० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांसाठी प्रती जनावर २० हजार रुपये,
मेंढी/बकरी/वराह प्रती जनावर चार हजार रुपये, तर ५० रुपये प्रती कोंबडी आणि एका कुटुंबाला
कमाल पाच हजार रुपये मदत मिळणार आहे.
पूर्णत:
नष्ट झालेल्या घरांसाठी दीड लाख रुपये, अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी, नुकसानाच्या
प्रमाणात १५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे.
जालना
इथं ३६५ खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या मनोरुग्णालयामुळे मराठवाडा तसंच विदर्भातल्या रुग्णांसाठी आंतररुग्ण उपचार तसंच
पुनर्वसनासाठी उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. मनोरुग्णालय उभारण्यासाठी इमारत
बांधकाम, यंत्रसामुग्री, रुग्णवाहिका, औषधी, उपकरणं तसंच मनुष्यबळ, यासाठी १०४ कोटी
४४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
राज्यातल्या
कृषी विद्यापीठांमधल्या शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासही,
काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. राज्यातील कृषी विद्यापीठं,
संलग्न कृषी महाविद्यालयं यामधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना, विद्यापीठ अनुदान आयोगाची
सुधारित वेतन संरचना, एक जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
साखरेच्या
किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी माजी कृषीमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. सहकारी साखर उद्योगांच्या
समस्यांबाबत पवार यांनी काल दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय सहकारी
साखर कारखाना महासंघाचं पत्रही सहा यांना सुपुर्द करण्यात आलं. सहकारी साखर उद्योग
आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचं, या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सहकारी साखर
कारखान्यांच्या विद्यमान नियमावलीअंतर्गत कारखाना परिसरातच इथेनॉल उत्पादन केंद्र सुरु
करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही शहा यांच्याकडे करण्यात आली.
****
राज्य
शिक्षण मंडळाचा इयत्ता १२वीचा निकाल काल दुपारी जाहीर झाला. यंदा ९९ पूर्णांक ६३ शतांश
टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीच्या निकालातही उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये
मुलींचं प्रमाण सर्वाधिक आहे. यावर्षी उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचं प्रमाण ९९ पूर्णांक
७३ शतांश, तर मुलांचं प्रमाण ९९ पूर्णांक ५४ शतांश टक्के इतकं आहे. कोकण विभागात सर्वाधिक
९९ पूर्णांक ८१ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
औरंगाबाद
विभागाचा निकाल ९९ पूर्णांक ३४ टक्के लागला आहे. विभागात औरंगाबाद जिल्ह्यात ९९ पूर्णांक
५३ शतांश टक्के, बीड जिल्ह्यात ९९ पूर्णांक १७, जालना ९८ पूर्णांक १७, परभणी ९९ पूर्णांक
३८, तर हिंगोली जिल्ह्यात, ९९ पूर्णांक ८१ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
लातूर
विभागीय मंडळाचा निकाल ९९ पूर्णांक ६५ टक्के लागला आहे. विभागात नांदेड जिल्ह्यातून
९९ पूर्णांक ७३ शतांश, उस्मानाबाद ९९ पूर्णांक ३७, तर लातूर जिल्ह्यातून, ९९ पूर्णांक
६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
****
सीबीएसई
अर्थात केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १०वीचा निकालही काल जाहीर झाला. यंदा
९९ पूर्णांक चार दशांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये
मुलींचं प्रमाण सर्वाधिक ९९ पूर्णांक २४ टक्के इतकं आहे, तर एकूण ९८ पूर्णांक ८९ टक्के
मुलं उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय १०० टक्के तृतीयपंथी मुलं उत्तीर्ण झाली आहेत.
****
राज्यात
काल सहा हजार पाच नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या ६३ लाख २१ हजार ६८ झाली आहे. काल १७७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३३ हजार २१५ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १ दशांश टक्के झाला आहे. काल सहा हजार ७९९ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६१ लाख १० हजार १२४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९६ पूर्णांक ६६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७४ हजार ३१८ रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल ३१० नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर जालना, लातूर, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड
जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १२४ रुग्ण आढळले, तर उस्मानाबाद जिल्ह्यात १०५
नव्या रुग्णांची भर पडली. लातूर ३५, औरंगाबाद ३०, जालना १२, नांदेड तीन, तर परभणी जिल्ह्यात
एक नवा रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
टोकियो
ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताचा नीरज चोप्रानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
आज पहाटे झालेल्या पात्रता फेरीत तो प्रथम स्थानावर राहिला. गोल्फमध्ये महिलांच्या
एकेरी प्रकारात भारताच्या दीक्षा डागर आणि अदिती अशोक पहिली फेरी खेळत आहेत. महिलांच्या
मुष्टीयुद्ध स्पर्धेत वेल्टरवेट गटात आज सकाळी उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या
लवलीना बार्गोहीन हिची लढत तुर्कीच्या खेळाडूशी होणार आहे.
महिला
हॉकी संघाचा उपांत्यफेरीचा सामना आज दुपारी अर्जेंटिना संघासोबत होणार आहे.
दरम्यान,
भारतीय पुरुष हॉकी संघाचा काल सकाळी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, बेल्जियमकडून
पाच दोन अशा फरकानं पराभव झाला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारतीय संघ २-१ नं आघाडीवर
होता. मात्र त्यानंतर बेल्जियमच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी केल्यानं, भारतीय संघ ही
आघाडी अखेरपर्यंत राखू शकला नाही. पेनल्टी कॉर्नरच्या संधीचा बेल्जियम संघानं योग्य
वापर करत, अखेरच्या सुमारे पंधरा मिनिटांत तीन गोल करून, पाच दोन अशा फरकानं विजय मिळवला.
काल झालेल्या दुसऱ्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं जर्मनीला तीन-एक असं
हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता भारत आणि जर्मनी यांच्यात येत्या गुरुवारी
हॉकी स्पर्धेच्या कांस्यपदकासाठीची लढत होईल.
महिलांच्या
भालाफेक स्पर्धेत भारताची अन्नु राणी आणि पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत भारताचा तजिंदर
सिंग पात्रता फेरीतच बाद झाले.
महिलांच्या
कुस्ती स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात भारताच्या सोनम मलिकचा मंगोलीयाच्या खेळाडूनं पराभव
केला.
****
आंचल
गोयल यांनी काल परभणीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. राज्याच्या सामान्य
प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी, १३ जुलै रोजी यासंदर्भात आदेश दिले होते.
तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिवांनी काल तीन ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्राच्या
संदर्भानं, आपण जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी परभणी या पदाचा पदभार स्वीकारला
असल्याचं, गोयल यांनी सांगितलं.
****
पैठण
इथले प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी यांनी, कापूस, तूर आणि ज्वारी या पिकांत शून्य नांगरणी
तंत्राचा वापर सुरू केला आहे. गेल्या वर्षी एकूण सुमारे १४ एकरांत केलेल्या या प्रयोगातून,
जोशी यांनी उत्पादन खर्चात एकरी १३ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत बचत साधली, शिवाय
उत्पादनातही वाढ झाली. या प्रयोगाबाबत जोशी यांनी अधिक माहिती दिली, ते म्हणाले –
विनानांगरणीचं तंत्रज्ञान असं
आहे, की आम्ही कापूस आणि तूर पीक हे दोन ओळीतलं अंतर पाच फूट आणि दोन झाडांतलं अंतर
एक फूट अशा पद्धतीने त्याची लागवड करतो. लागवड केल्यानंतर कापूस ओळीवरती आम्ही पेंडामिसिलीन
ही जी तण नाशकं आहेत, ते विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आम्ही त्याचा वापर करतो. येथे
जवळपास दहा ते पंधरा हजार रूपये उत्पन्न व्हायच्या आधीच ही माझी बचत होते. ही मुख्य
बचत महत्वाची आहे. पेरणीच्या वेळेस जो खर्च लागतो तो माझा चांगल्या रीतीने हा वाचलाय.
माझ्या जमिनीतला एक कण सुद्धा जमिनीतून बाहेर पडत नाही. जमिनीचं सेंद्रिय कर्म वाढवण्यास
मोठ्या प्रमाणात बदल होते. त्याचे फायदे अनेक आणि मानसिक स्वास्थ चांगलं राहतयं.
****
नांदेड
जिल्ह्यातले शेत पाणंद रस्ते मोकळे करणं, गाव तिथे स्मशानभूमी, ई-पिक पाहणी यासाठी
काल विशेष कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते
दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. नांदेड जिल्ह्यात
ग्रामीण भागात कृषिक्षेत्राला चालना देणाऱ्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी,
आपण प्राधान्यानं लक्ष केंद्रित केलं आहे. हा प्रश्न येत्या चार ते पाच वर्षांत सोडवण्यासाठी
सर्व संबंधित यंत्रणांचा समन्वय असणं तेवढंच आवश्यक आहे. यासाठी ही विशेष कार्यशाळा
घेऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलं जाणारं प्रशिक्षण हे अधिक महत्वाचं असल्याचं,
पालकमंत्री चव्हाण यावेळी म्हणाले.
****
परभणी
जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या अंगणवाड्यांमध्ये, लहान मुलांसाठी शौचालय, पाण्याची सोय
आणि विद्युत सुविधा उपलब्ध नसल्यास, अशा अंगणवाडी आणि संबंधित जबाबदार अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
शिवानंद टाकसाळे यांनी दिला आहे. महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या
उपस्थितीत, राज्यातल्या अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध असलेल्या आवश्यक सोयी सुविधेबद्दल
ऑनलाईन बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
औरंगाबाद
शहर भारतातल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये आणण्यासाठी, महापालिकेच्या वतीनं शहरात स्वच्छतेसंदर्भात
विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका एक अनोखा उपक्रम
राबवत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रविकुमार कांबळे –
महापालिकेच्या प्रवेशद्वारावर
जाळीची भलीमोठी बाटली बसवली आहे. नागरिकांनी प्लास्टिकच्या वापरलेल्या रिकाम्या बाटल्या
इतरत्र न फेकता या बाटलीत टाकायच्या आहेत. आकर्षक स्वरूपातली कचराकुंडी असलेली ही बाटली
नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. नागरिकही या बाटलीत प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या
टाकत आहेत. अशा प्रकारच्या जाळीच्या आणखी दहा महाकाय बाटल्या शहरातल्या गर्दीच्या ठिकाणी
ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी या बाटलीरूपी कचराकुंडीचा वापर करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी
मदत करण्याचं आवाहन महापालिका प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी केलं आहे.
रविकुमार
कांबळे, आकाशवाणी बातम्यांसाठी, औरंगाबाद.
****
परभणी
महापालिका प्रशासनानं मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या विलंब शास्तीत, अभय योजनेतून शंभर
टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी
काल दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच ते ३१ ऑगस्ट या कालावधीत, नागरीकांनी चालू
वर्षापर्यंतच्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराचा एक रकमी भरणा करावा, असं आवाहनही
त्यांनी केलं आहे. सद्यस्थितीत १७ हजार नळ जोडण्या केल्या गेल्या आहेत. या योजनेत ५५
हजार नवीन जोडण्या व्हाव्यात, असं अपेक्षित असल्याचं आयुक्त पवार म्हणाले.
****
No comments:
Post a Comment