Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 August 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.
****
कोरोना विषाणूची तिसरी लाट
सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता असून, ही लाट पहिल्या दोन लाटेपेक्षा अधिक भयावह
असेल, असा अंदाज नीति आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नीती आयोगानं
महत्वपूर्ण शिफाससीही केल्या आहेत. देशात सप्टेंबरमध्ये चार ते पाच लाख दैनंदिन कोरोना
बाधितांची नोंद होऊ शकते. यासाठी आतापासूनच दोन लाख आयसीयू खाटांचं नियोजन करण्याची
शिफारस आयोगानं केंद्र सरकारला केली आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण
मोहीमेनं ५८ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशात सात लाख ९५ हजार ५४३ नागरीकांना
लस देण्यात आली. आतापर्यंत या लसीच्या ५८ कोटी २५ लाख ४९ हजार ५९५ मात्रा देण्यात आल्या
आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या
२५ हजार ७२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३८९ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी २४ लाख ४९ हजार ३०६ झाली
असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ३४ हजार ७५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल
४४ हजार १५७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी १६ लाख ८० हजार ६२६ रुग्ण, कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ३३ हजार ९२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नागरिकांना आपलं प्राप्तीकर
विवरण पत्र सुलभतेनं भरता यावं यासाठी भारतीय प्राप्ती कर विभागासाठी इन्फोसिस कंपनीने
ई फायलिंग पोर्टल विकसित केलं होत, मात्र गेल्या अडीच महिन्यात ते नीट काम करत नसल्याचं
आढळून आल्यानं, सर्वसामान्य करदात्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावं लागत
आहे. काल प्राप्ती कर विभागाच्या वतीनं हे पोर्टल तात्पुरतं बंद करण्यात आल्याची घोषणा
ट्वीटर संदेशाद्वारे करण्यात आली. त्यामुळे याबद्दलचं स्पष्टीकरण देण्यासाठी केंद्रीय
अर्थ मंत्रालयाने इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
सलील पारेख यांना नोटीस बजावली आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचा ६३वा वर्धापन दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठाच्या
प्रशासकिय इमारती समोरील हिरवळीवर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण
झालं. त्यानंतर झालेल्या एका समारंभात विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा जीवनसाधना
पुरस्कार, उस्मानाबाद इथल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.रमेश दापके, आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान
तयार करण्यासाठी कार्यरत राहिलेले, मोहम्मद
अब्दुल रज्जाक मोहम्मद अब्दुल जब्बार, यांना
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
****
शेतकऱ्यांच्या कृषी मालाच्या
वाहतुकीसाठी वरदान ठरलेली किसान रेल्वे आजपासून २३ डब्यांची असणार आहे. नाशिकचे खासदार
हेमंत गोडसे यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या किसान रेल्वेला एकूण
नऊ डबे आहेत, त्यामुळे नाशिकमध्ये शेतमाल वेगवेगळ्या राज्यात पोहोचवला जात आहे. किसान
रेल्वेतून दररोज सुमारे पाचशे टन शेतीमाल पाठवला जात आहे. आता गुवाहाटी, अरबी, कोलकता
इथंही किसान रेल्वेच्या माध्यमातून नाशिकचा शेतमाल पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,
अशी माहिती खासदार गोडसे यांनी दिली.
****
महाडमधील चवदार तळ्याचं पावित्र्य
राखण्यासाठी जे जे करता येईल, ते करणार असल्याची ग्वाही, राज्याचे नगरविकास मंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिली. चवदार तळ्यातील चिखल आणि गाळ काढण्याच्या कामाची विशेष स्वच्छता
मोहिम हाती घेण्यात आली असून, त्या कामाची शिंदे यांनी काल पाहणी केली. ठाण्याचे महापौर
नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या पुढाकारानं ठाणे महानगरपालिकेचं
विशेष पथक चवदार तळ्याच्या स्वच्छतेसाठी कार्यरत आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ
इथल्या ज्योतिर्लिंग नागनाथाची आज तिसर्या श्रावणी सोमवारी, संस्थांनचे अध्यक्ष तथा
सदस्य तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. मंदीर
भाविकांसाठी बंद असल्यानं अनेक नागरीक बाहेरुनच दर्शन घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
जपान मधल्या टोकियो इथं उद्यापासून
पॅराऑलिम्पिक स्पर्धा सुरु होणार आहेत. या स्पर्धेत नऊ क्रीडा प्रकारांसाठी ५४ भारतीय
खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. आतापर्यंच्या या स्पर्धेमधील भारताचा हा सर्वात मोठा
संघ आहे. उद्या होणार्या उद्घाटन समारंभात भारताकडून मरीयप्पन थंगावेलू ध्वजवाहक असेल.
भारत या वर्षी तिरंदाजी, बॅडमिंटन, भारत्तोलन, पोहणे, धावणे आणि मैदानी खेळ, या विभागात
सहभागी होणार आहेत. भावना पटेल आणि सोनलबेन पटेल या दोघी पॅरा टेबल टेनिस व्हीलचेअर
महिला दुहेरी प्रकारात खेळणार आहेत. तायक्वांदो प्रकारात अरुणा तंवर ही ४९ किलो वजनी
गटात, भारत्तोलन प्रकारात ६५ किलो वजनी पुरुष गटात जयदीप, तर ५० किलो वजनी महिला गटात
साकीना खातून हे देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment