Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 August 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.
****
बंद पडलेल्या उद्योगांसाठी
राज्य शासनानं विशेष अभय योजना जाहीर केली आहे. बंद पडलेल्या आणि पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या
उद्योगांची शासकीय देणी थकीत असल्यास, त्या देण्यातील मुद्दलाची रक्कम उद्योगानं एकरकमी
भरल्यास त्यावरील व्याज आणि दंड माफ करण्यात येईल, आणि त्या उद्योगाची स्थिर मालमत्ता
अन्य उद्योग घटकाकडे हस्तांतरीत करण्यास, या विशेष अभय योजनेद्वारे मान्यता देण्यात
आली आहे. एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेला किंवा न्यायालयाकडून दिवाळखोर
म्हणून घोषित झालेला उद्योग, किंवा रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुत्रानुसार पुनरुज्जीवनक्षम
नसलेला उद्योग या योजनेसाठी पात्र असेल. हस्तांतरणामुळे या उद्योगाच्या व्यवस्थापनात
बदल होऊन तो उद्योग पुढे यशस्वीरित्या सुरू राहील. मात्र नवीन व्यवस्थापनानं तीन वर्षात
उत्पादन सुरू करणं बंधनकारक आहे.
****
केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि
मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा आज रत्नागिरी जिल्ह्यात दाखल
झाली. त्यापूतर्वी ते चिपळूणमध्ये बहादूर शेख नाका इथं आले असता, भारतीय जनता पक्ष
आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण
झाला होता. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी कथित अनुदगार
काढल्याबद्दल राणे यांच्याविरोधात नाशिक मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी
पत्रकारांशी बोलताना राणे यांनी, आपल्याला कुठलाही गुन्हा दाखल झाल्याबद्दल माहिती
नसल्याचं सांगितलं.
औरंगाबाद इथंही राणे यांच्या
विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांनी
क्रांती चौक पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. मुंबई, सातारा इथंही राणे यांच्या विरोधात
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
****
प्राप्तीकर विभागाच्या कर
विवरण पत्र भरण्यासाठीच्या पोर्टलमध्ये सध्या करदात्यांना आणि सरकारलाही अनेक अडचणी
येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय
संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांच्याबरोबर बैठक घेत याबाबत तीव्र
नाराजी व्यक्त केली. करदात्यांना वारंवार होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी पारेख यांच्याकडून
स्पष्टीकरण मागितलं. पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत ही तांत्रिक अडचण दूर होणं आवश्यक
असल्याचं सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या मन की बात या
कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ८०वा भाग असेल.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेअंतर्गत अनाथ, निराधार, मतिमंद, विकलांग
बालकांचं लसीकरण करण्यात येत आहे. ज्या बालकांकडे कुठलीही कागदपत्रं नाहीत, आधार कार्ड
नाही, रहिवाशी प्रमाणपत्र नाही, अशा अठरा वर्षाच्या पुढील बालकांचं लसीकरण करण्यासाठी अनाथालयात जाऊन विशेष लसीकरण
सत्राचं आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास शंभर बालकांच लसीकरण करण्यात आल्याचं जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर कुलदीप मिटकरी यांनी
सांगितलं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या संजीवनी शिक्षण संस्थेतले शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या
विविध मागण्यांसाठी, कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केलं आहे. या
संस्थेत सन २००३ पासून विश्वस्तांमध्ये वाद असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या संस्थेत
काही व्यक्तींनी शालेय प्रशासनात हस्तक्षेप सुरू केला आहे. या बाबींमुळे संस्थेतलं
शैक्षणिक वातावरण गढूळ होऊ शकतं, असं सांगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी हे उपोषण
पुकारलं आहे.
****
प्रवाशांच्या
सुविधेकरता नांदेड रेल्वे विभागातल्या २० विशेष रेल्वे गाड्यामधले काही डब्बे पूर्णपणे
अनारक्षित करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे. नरसापूर- नगरसोल, तिरुपती
- आदिलाबाद, औरंगाबाद -रेणीगुंठा, काचीगुडा - अकोला, पूर्णा- हैदराबाद, औरंगाबाद -
हैदराबाद, आदिलाबाद- नांदेड, सिकंदराबाद-नांदेड आणि नांदेड - औरंगाबाद या गाड्यांमध्ये
अनारक्षित डबे असतील.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातला रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं, खासदार ओमराजे
निंबाळकर यांनी म्हटलं आहे. शिवसंपर्क अभियानादरम्यान, तुळजापूर तालुक्यात विविध ठिकाणी
शिवसेना पक्ष संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. येत्या
काही वर्षांत तुळजापूर तालुका हा रेल्वेनं जोडला जाईल, असं आश्वासनही त्यांनी स्थानिकांना
दिलं.
विरोधकांना
शब्दाने उत्तर न देता आपल्या पक्षाच्या कार्याने आणि जनसामान्यांच्या अडचणींच्या सोडवणुकीतून
उत्तर द्यावं, असा सल्लाही खासदार निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला.
****
या बरोबरच हे बातमीपत्र संपलं, यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र
आकाशवाणी समाचार औरंगाबाद - AURANGABAD AIR NEWS या युट्युब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.
No comments:
Post a Comment