Thursday, 2 September 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 September 2021 Time 18.00 to 18.10 Language Marathi

                             Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 September 2021

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ सप्टेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

**शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

**मराठवाड्यातल्या अतिवृष्टीच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना

**बीड जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसान भरपाई कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

आणि

** इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या तीन बाद ५४ धावा

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातल्या शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संबंधी कृती दलाशी चर्चा करुन घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. गर्दी होणारे उत्सव घरगुती पध्दतीनं साजरे करण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सध्या सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रात आढळत असल्यानं केंद्रसरकारच्या आरोग्य विभागानं राज्याला काही सूचना केल्या असल्याची माहिती त्यांनी या निमित्त दिली. राज्यातल्या सर्व शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीच्या दोन मात्रा पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी नमुद केलं. आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांच्या लसीच्या दोन मात्रा पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असंही उपमुख्यमंत्री म्हणाले.

****

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीनं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं,जमीनी खरवडून निघाल्या तर, काही भागात दरड कोसळून वाहतूक ठप्पही झाली होती. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या असून प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यात नुकसानाची पाहणी करत असल्याचं पवार यांनी नमुद केलं.

****

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पुल आणि रस्त्यांच्या पुनर्बांधणी कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधितांना दिले असल्याची माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असंही त्यांनी आज जिल्ह्यात पाहणी दौरा केल्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधताना सांगितलं. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असून आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पूर्वीप्रमाणे पंचनामे न करता महसुल, कृषी आणि विमा कंपनी असे तिन स्तरावरचे अधिकारी संयुक्तपणे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतील असं मुंडे म्हणाले.

****

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांनी सतर्क राहून आवश्यक असणारी पूर्वतयारी करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज संबंधित अधिष्ठातांना दिल्या. शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयांतल्या सर्व अधिष्ठांताशी त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

****

राज्यातल्या विद्यार्थ्यांना विविध विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचं तात्काळ वितरण करावं असे आदेश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. मुबंई इथं विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात अशा तक्रारी प्राप्त झाल्या असुन शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून विद्यार्थी आणि संस्था अडचणीत येत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

 राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन आणि इतर आवश्यक बाबींसाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात आदेश दिल्यानंतर हा निधी तातडीनं वितरीत करण्यात आल्याचं हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेनं नमुद केलं आहे. चालू आर्थिक वर्षासाठी एक हजार चारशे पन्नास कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी आठशे अडतीस कोटी रुपयांचा निधी राज्य परिवहन महामंडळाला आधीच वितरीत करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्ग संकटाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे.

                                                                               ****

भारतानं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज पहिल्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला तेंव्हा तीन बाद ५४ धावा केल्या आहेत. ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात सलामीवर रोहित शर्मा अकरा, के. एल. राहुल सतरा आणि चेतेश्र्वर पुजारा चार धावांवर बाद झाले. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतानं या सामन्यासाठी इशांत शर्मा  आणि मोहम्मद शमी यांच्या ऐवजी उमेश यादव आणि शार्दुल ठाकूरचा संघात समावेश  केला आहे. 

                                                                                  ****

 मराठा समाज आरक्षण मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेनं आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. मराठा आरक्षण मागणी संदर्भातील आणि मराठा समाजाच्या संघटनांनी राज्यव्यापी बैठक घेऊन त्यात मांडलेल्या ठरावाच्या निवेदनाची प्रत प्रशासनाला यावेळी सादर करण्यात आली. मराठा समाजाला इतर मागास वर्गीय समाजाप्रमाणे सर्व सोयी सवलती आर्थिक तरतूद करुन देण्याचा निर्णय घ्यावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला किमान ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, सारथी संस्था पूर्ण ताकदीनं कार्यान्वित करुन कायमस्वरुपी नियमावली बनविण्यात यावी तसंच सारथी संस्थेचं सर्व विभागांमध्ये कार्यालय ताबडतोब सुरु करावे आदी ठराव याद्वारे मांडण्यात आले.

                                                                                 ****

परभणी इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात शेकडो महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. या आंदोलनात शहरासह जिल्ह्यातल्या विविध राजकीय पक्षांच्या महिला पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना आणि संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

                                                                      ****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी धरणात आज सकाळपर्यंत ८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या या जलाशयातील पाणी पातळी ४६० पूर्णांक ८०० मीटर आहे.मागील चोवीस तासात या जलाशयात पाणलोट क्षेत्रातून सात पूर्णांक ४४४ दशलक्ष घन मीटर पाण्याची आवक होत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या अभियंत्यांनी जिंतूर, औंढा आणि सेनगाव या तालुक्यातल्या पूर्णा नदीच्या काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

//*************//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...