आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ सप्टेंबर २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागानं ग्रामीण स्थानिक स्वराज्य
संस्थांना अनुदान देण्यासाठी २५ राज्यांना १३ हजार ३८५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी जारी
केला आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार हे अनुदान-सहाय्य २०२१-२२ या वर्षातल्या
अनुदानाचा पहिला हप्ता आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छता आणि उघड्यावरील
शौचापासून मुक्त स्थितीची देखभाल आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पावसाचं पाणी साठवणं
आणि पाण्याचा पुनर्वापर यासाठी हे सशर्त अनुदान जारी केलं जातं.
****
प्राप्तीकर विभागानं चालू आर्थिक वर्षात २३ ऑगस्टपर्यंत सुमारे २३ लाख
करदात्यांच्या खात्यात, ५१ हजार ५३१ कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. केंद्रीय
प्रत्यक्ष कर विभागानं काल ट्विट करून ही माहिती दिली.
****
राज्य विधानसभेचे निवृत्त प्रधान सचिव आणि निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण
शेट्ये यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. काही काळ वकिली
केल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी न्यायाधीश म्हणून काम केलं. त्यानंतर महाराष्ट्र राज्य
विधानसभेचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी दहा वर्षं काम पाहिलं. बँकिंग लोकपाल म्हणूनही
त्यांनी तीन वर्षं काम पाहिलं होतं.
****
बीड जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक भागात
शेतकऱ्यांचा कापूस, उडीद, सोयाबीन हे पिकं पाण्याखाली गेले आहेत. महसूल प्रशासनाने
तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तात्काळ
शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करावेत अशी मागणी शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीनं
करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन काल तहसीलदार शेख सय्यद यांना देण्यात आलं.
****
पावसाळ्याच्या कालावधीत होणारा साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता,
अधिकचं मनुष्यबळ वापरून लातूर शहर स्वच्छ करून घेण्याचे निर्देश, महापौर विक्रांत गोजमगुंडे
यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. एक विभाग निश्चित करून संपूर्ण मनुष्यबळ
एकाच ठिकाणी वापरून त्या भागाची पूर्ण स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देश महापौरांनी
दिले.
****
No comments:
Post a Comment