Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रव्यापी
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाअंतर्गत देशभरात आतापर्यंत ९७ कोटी ६५ लाखांहून
अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात काल कोरोना विषाणू संसर्गाचे १४ हजार १४६ नवे रुग्ण आढळले असून १४४ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला आहे.
तर १९ हजार ७८८ रुग्ण यातून बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत या संसर्गाचे ३ कोटी ४० लाख ६७ हजार ७१९ रुग्ण आढळले असून एकूण ३ कोटी ३४ लाख १९ हजार ७४९ रुग्ण बरे झाले
आहेत. सध्या १ लाख ९५ हजार ८४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत ४ लाख ५२ हजार १२ रुग्णांचा
या संसर्गामुळं मृत्यू झाला असल्याची माहीती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब
कल्याण मंत्रालयानं दिली आहे.
****
केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सितारमण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्याअंतर्गत जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी
यावेळी भारतातल्या कोविड लसीकरण मोहिमेची प्रशंसा केली. मालपास यांनी कोविड लसीच्या उत्पादन आणि वितरणातल्या
जागतिक भूमिकेबद्दलही भारताचं आभार मानलं. या
बैठकीत सीतारामन आणि मालपास यांनी हवामान बदलावर
भारतानं केलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली.
****
पंतप्रधान
कृषी सिंचन योजनेअंर्तगत सध्या सुरु असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेच्या मापदंडात केंद्र
सरकारनं बदल केले असून त्यानुसार ठिबक आणि तुषार संचासाठीच्या खर्च मर्यादेतही सुमारे
दहा ते चौदा टक्के वाढ केली आहे. या निर्णयामुळं शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी मिळणाऱ्या
अनुदानात वाढ होणार आहे. सिंचनासाठीची खर्च मर्यादा यापूर्वी २०१६ मध्ये निश्चित करण्यात आली होती. मात्र, बदलत्या परिस्थितीत ही मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकरी तसंच
ठिबक सिंचन उत्पादकांकडूनही केली जात होती. नव्या बदलामुळं शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रति हेक्टर सुमारे
पंधरा हजार रुपये जादा अनुदान मिळणार आहे.
****
जागतिक दारिद्र्य निर्मूनल दिन आज पाळण्यात येत आहे. गरीबी
हे हिंसेचं सर्वात विकृत रुप आहे, असं महात्मा गांधीजींनी
म्हटलं होतं, याचं स्मरण उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी या दिनानिमित्त केलं आहे. जागतिक गरीबी निर्मूलन
दिनानिमित्त सर्वांच्या जीविकेसाठी स्थायी स्रोत उपलब्ध करण्यासाठी एकत्रित प्रयत्न
करूया असं आवाहन उपराष्ट्रपतींनी या संदर्भातल्या आपल्या संदेशाद्वारे केलं
आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार
पावसामुळे कयाधू नदीला पूर आल्यानं अनेक शेतकऱ्यांनी सोयाबिन पिक जमा करून मारलेल्या
ढीगाला पुराच्या पाण्यानं वेढा दिला आहे. कळमनुरी
तालुक्यातल्या नांदापूर परिसरातले अनेक शेतकरी सुडी वाहून जाऊ नये म्हणून धडपड करताना
दिसत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, ओडिशाच्या किनाऱ्याकडून आलेल्या वाऱ्यांमुळे आणखी तीन
दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक सरींचा अंदाज हवामान विभागानं
वर्तवला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचंही
विभागानं म्हटलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असताना जिल्ह्याचे पालकमंत्री
नवाब मलिक हे त्याकडे दूर्लक्ष करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राम
कुलकर्णी यांनी केला आहे. मलिक हे मुंबईत बसून अंमली पदार्थ प्रकरणी राजकारण करत असल्याचा
आरोपही त्यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.
****
आवाजाच्या
वेगानं अवकाशात भरारी घेत रेडिओवरुन एकमेकांशी संवाद साधत वायु दलाच्या सांरग हेलिकॉप्टर
आणि सुर्यकिरण विमानांनी चित्तथराराक कसरतींचं सादरीकरण काल पुण्यात केलं. १९७१ साली
भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्वर्णीम वर्षाचा अभिमान दाखवत या विमानांनी
`डायमंड`, `क्युपिड`, `सुखोई` आणि `तेजस` या रचना सादर केल्या. याचबरोबर भारतीयवायु
दलाच्या लढाऊ सामर्थ्यांचे प्रदर्शनही भारतीय वैमानिकांनी यावेळी सादर केलं. वायु दलाचे
माजी प्रमुख एअर चिफ मार्शल प्रदीप वसंत नाईक प्रमुख पाहुणे म्हणुन यावेळी उपस्थित
होते.
//************//
No comments:
Post a Comment