Monday, 11 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

                     Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड – १ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** आत्मनिर्भर धोरणामुळे भारत नवोन्मेषाचं वैश्विक केंद्र ठरेल - पंतप्रधानांचा विश्वास

** माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर सीबीआयचा छापा

** देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीसाठी २१ जणांचे उमेदवारी अर्ज वैध

आणि

** लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीच्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद

****

आत्मनिर्भर भारत या आपल्या स्पष्ट दृष्टिकोनामुळे भारतात गतीशील सुधारणा बघायला मिळत असून, हे धोरण भारताच्या तांत्रिक वैशिष्ट्यांच्या आधारावर देशाला नवोन्मेषाचं वैश्विक केंद्र बनवेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून भारतीय अवकाश संघटनेचा आरंभ करताना आज ते बोलत होते. अंतराळ क्षेत्राची संपूर्ण यंत्रणा उपलब्ध असणाऱ्या मोजक्याच देशांमध्ये भारताचा समावेश आहे, भारताकडे उपग्रह, प्रक्षेपण यानं तसंच आंतरग्रहीय मोहिमांशी संबंधित यंत्रणा उपलब्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारतीय अवकाश संघाच्या निर्मितीमुळे या क्षेत्रातलं विकसित तंत्रज्ञान खाजगी क्षेत्राला खुलं होणार असून, संपर्क यंत्रणा गतिमान झाल्यामुळे सर्व स्तरावर लाभ होईल, आजच्या निर्णयाचा फायदा भावी पिढयांना होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

****

नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मीयांनी मन आणि बुद्धीनं एकत्र येणं आवश्यक आहे, असं मत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंह लालपुरा यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत विविध धर्मियांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत बोलत होते. समान न्याय, शिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीतूनच विकास साधला जाऊ शकतो, असं ते म्हणाले. सर्वधर्मीय अल्पसंख्याक नेत्यांनी आणि धर्मगुरूंनी अल्पसंख्याकांसाठीच्या विविध सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. धर्माचा वापर राजकारण करण्यासाठी न होता तो समाजातल्या गरजू व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्हावा, असं आवाहन त्यांनी केलं.

****

केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयने आज सकाळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या निवासस्थानावर छापा घातला. देशमुख गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत. देशमुख यांना वारंवार समन्स बजावल्यानंतरही ते चौकशीसाठी हजर होत नसल्याने त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटिसही काढण्यात आली होती. त्यानंतर आयकर विभागानंही अनिल देशमुखांच्या घरावर धाड टाकली होती. सीबीआयच्या पथकानं सुमारे आठ तास देशमुख कुटुंबाची चौकशी करत, काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले.

देशमुख हे वारंवार समन्स बजावल्यानंतरही चौकशीसाठी हजर होत नसल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असा विनंतीअर्ज सक्तवसुली संचालनालय - ईडीने अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केला होता, न्यायालयाने शुक्रवारी या अर्जाची दखल घेत, देशमुख यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

दरम्यान, नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या घरासमोर एकत्र येत सीबीआय तसंच ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत काही वेळानंतर सोडून दिलं.

****

लखनऊ - मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा आणि एका महिलेवर बलात्कार प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन दिवसांत आठ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आठ ऑक्टोबरच्या संध्याकाळी या आरोपींनी इगतपुरी ते कसारा दरम्यान, पुष्पक रेल्वेत १६ प्रवाशांना मारहाण करत, मोबाईल आणि रोख रक्कम लुटली. तर दोन आरोपींनी एका २० वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कसारा स्थानक परिसरात सहा आरोपी पसार झाले, तर दोघा आरोपींना प्रवाशांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. हे सर्व सराईत गुन्हेगार असल्याचं, पोलिस तपासात समोर आलं आहे.

****

जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये आज दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सैन्यदलातल्या पाच सैनिकांना वीरमरण आलं. पुंछ सेक्टरमध्ये सुरणकोटे परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर सैन्यदलानं या भागात कारवाई सुरू केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत पाच सैनिकांचा मृत्यू झाला. सैन्याने या पूर्ण परिसराची घेराबंदी केली असून, कारवाई अद्याप सुरू आहे.

****

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीसाठी आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीत २१ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले तर विक्रम साबणे आणि शीतल अंतापूरकर या २ दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

****

उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरी इथल्या हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ मराठवाड्यासह राज्यभरात सत्ताधारी महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद इथं बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं. उत्तरप्रदेश लखीमपूर इथल्या मृत शेतकऱ्यांना क्रांती चौक इथं आदरांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात निषेध सभाही घेण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील लोहा इथे बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश दुकानं बंद ठेवण्यात आली. अर्धापूर, भोकर, मुदखेड, लोहा, हिमायतनगर, नायगाव इथंही बंद पाळण्यात आला. नांदेड शहरात बहुतांश व्यापारी संकुलं सुरू असल्याचं दिसून आलं.

परभणी शहरासह जिल्हाभरात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सोनपेठ शहरात तर व्यापाऱ्यांनी बंद पाळला नाही. सकाळपासूनच परभणी शहरातील बाजारपेठा नेहमीप्रमाणे खुल्या झाल्या. वसमत रोड, जिंतूर रोड आदी भागात काही काळ बाजारपेठा बंद होत्या तर शाळा, महाविद्यालयं नेहमीप्रमाणे सुरु होती.

जालना जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी जालना शहरातून फेरी काढून व्यापाऱ्यांना आपली दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं. भोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी, बदनापूर इथं बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर बहुतांश भागातली दुकानं सुरू करण्यात आली.

या बंदला हिंगोलीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचं आवाहन केल्यानंतरही काही व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं सुरूच ठेवल्याचं दिसून आलं. सेनगांव, वसमत, हिंगोलीत दुपार पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला.

//**************//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...