Friday, 8 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** इंटरनेटशिवाय डिजिटल व्यवहार करण्याची सुविधा रिझर्व्ह बँक लवकरच उपलब्ध करुन देणार

** स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय टपाल विभागाचा उद्यापासून ‘राष्ट्रीय डाक सप्ताह’

** केंद्रातील भाजपा सरकारच्या धोरणाला विरोध केल्यामुळे इन्कमटॅक्सची कारवाई: खासदार शरद पवार यांचा आरोप

आणि

** डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या कथित अनागोंदीबाबत सिनेट सदस्यांचा निषेध

****

इंटरनेटशिवाय डिजिटल व्यवहार करण्याची सुविधा रिझर्व्ह बँक लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. यासंदर्भात देशाच्या विविध भागात चाचण्या घेण्यात आल्या, त्याअंतर्गत गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून यंदा जून महिन्यापर्यंत १ कोटी १६ लाख रुपयांचे सुमारे २ लाख ४१ हजार व्यवहार करण्यात आले. त्यामुळे देशाच्या दुर्गम भागात किंवा ज्या ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नाही अथवा इंटरनेटचा वेग कमी आहे, तिथे डिजिटल व्यवहार करण्याची मुभा मिळणार आहे. या माध्यमातून व्यवहार करण्याची मर्यादा सध्या २ लाख रुपये आहे, ती वाढवून कमाल ५ लाख रुपये केली जाणार आहे. यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना बँक लवकरच उपलब्ध करुन देणार आहे.

****

भारतीय टपाल विभागातर्फे उद्या ९ ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय डाक सप्ताह’ साजरा केला जाणार आहे.  देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगानं यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताहाअंतर्गत “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. १६ ऑक्टोबर पर्यंत हा सप्ताह चालणार आहे, डाक विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी तसंच बचत योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी या सप्ताहात वेगवेगळे दिवस साजरे करून, या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे.

****

रेल्वे तसंच विमान सेवांचं खाजगीकरण करुन त्या विक्रीस काढण्याचा केंद्रातील भाजपा सरकारचा डाव आहे. त्यांच्या धोरणाला विरोध केला म्हणून इन्कमटॅक्स आणि ईडी सारखे सरकारी पाहुणे आमच्या घरी पाठवले, असा आरोप खासदार शरद पवार यांनी केला आहे. ते आज सोलापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

रेल्वे आणि विमान सेवा अशा महत्त्वाच्या आणि नफ्यात असलेल्या खात्यांचं खाजगीकरण करुन उद्योगपतींना जगवण्यासाठी ती विक्रीस काढण्याचा घाट या सरकारने घातला असल्याचा आरोप पवार यांनी केला. लखीमपूर इथल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी येत्या ११ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात बंद पाळण्याचं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं.

 

दरम्यान, जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आज सोलापूर इथं पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ऊसाचा रास्त किफायतशीर दर -एफआरपी तत्काळ द्यावा तसंच शरद पवारांनी ऊस दराच्या बाबतीत हस्तक्षेप करुन तत्काळ तोडगा काढावा अन्यथा त्यांना सोलापुरात फिरकू देणार नाही असा इशारा, देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पवार यांच्या आज सोलापूर दौऱ्यादरम्यान ही कारवाई केली. पवार यांचा कार्यक्रम संपेपर्यंत देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.

या कारवाईमुळे पुढील आंदोलन स्थगित झालं असलं तरी जो पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तो पर्यंत आपला व्यवस्थेच्या विरोधात लढा कायम राहिल असं देशमुख यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद नजिक सातारा गावातल्या पुरातन हेमाडपंथी खंडोबा मंदिराचं पावित्र्य राखून जीर्णोध्दार होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. पालकमंत्री देसाई यांनी आज या मंदिराची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. प्राचीन मंदिर पुनर्विकास योजनेमध्ये शासनाने राज्यातल्या आठ मंदिरांचा जीर्णोध्दार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात खंडोबा मंदिराचा समावेश झाल्याने ग्रामस्थांकरता विशेष आनंदाची बाब असल्याचं देसाई म्हणाले. कडेपठार ते खंडोबा मंदिर असा नऊ किलोमीटरचा रस्ता देखील करावा अशी सूचनाही देसाई यांनी संबंधितांना केली.

****

नागपूर इथं दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी होणार नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाईल. दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे व्यापक आरोग्य हित लक्षात घेऊन भाविकांनी यावर्षी दीक्षाभूमीवरील गर्दी टाळावी, असं आवाहन नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केलं आहे. या संदर्भात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आज त्या बोलत होत्या.

****

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्यानं, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातल्या ६१ गावांमध्ये टाळेबंदी जाहीर केली आहे. येत्या १३ तारखेच्या रात्री १२ वाजेपर्यंत ही टाळेबंदी लागू असेल. सध्या अहमदनगर जिल्ह्यात एकोणसत्तर गावांमध्ये टाळेबंदी लागू आहे. गेल्या ३ तारखेपासून प्रत्येक दिवशी साधारण ४०० जणांना कोरोना विषाणू संसर्ग होतो आहे, त्यामुळे प्रशासनानं हे पाऊल उचललं आहे.

****

आझादी का अमृत महोत्सव निमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा पोलीस ठाण्यात, 'महिलांचे अधिकार' या विषयावर आज कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आलं. महिलांची होणारी कुचंबणा, त्यांना असणारे विविध संवैधानिक अधिकार तसंच इतर कायदे यासंदर्भात विधिज्ञ स्वप्नील मुळे यांनी यावेळी माहिती दिली.

****

औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्या कथित अनागोंदीबाबत सिनेट बैठकीत आज सदस्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून नि:शब्द रित्या निषेध नोंदवला.

विद्यापीठातल्या विविध आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून सेवा मुक्त करण्यात यावं, जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होत नाही, तोपर्यंत पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी, नॅनो टेक्नॉलॉजी, अप्लाइड मॅथेमॅटिक्स यासोबत बंद केलेले इतर विषय सुरू करण्यात यावे या आणि इतर मागण्या या सदस्यांनी यावेळी केल्या.

****

उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं येत्या ११ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये जालना जिल्ह्यातल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलं आहे. ते आज जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते.

//********//

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...