Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी
विमानतळाचं उद्धाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
असणार आहेत.
**
उपमुख्यमंत्री अजित पवार आज
दुपारनंतर औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्ती तसंच कोविड १९ परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत.
**
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत
भारतानं ९३ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ७९ लाख बारा हजार नागरीकांचं लसीकरण
झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ९३ कोटी ९९ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या १९
हजार कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २४८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. देशात या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख
५० हजार ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल २३ हजार रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत
तीन कोटी ३२ लाख ४८ हजार २९१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख
३६ हजार ६४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत ५८ कोटी १३ लाख नमुन्यांची
कोविड तपासणी करण्यात आली आहे.
**
जम्मू काश्मीरच्या श्रीनगर
इथल्या नातिपोरा भागात काल सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत लश्कर ए तैय्यबाचा एक दहशतवादी
मारला गेला. आकिब बशीर असं त्याचं नावं असून सुरक्षा दलाच्या सैनिकांनी दहशतवादी असलेल्या
नातिपोरा भागात गोळीबार सुरु केल्यानंतर उडालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेला असून
एकाचा शोध सुरु आहे. दहशतवाद्यांकडून ए के ४७ रायफल आणि तीन मॅगजीन तसंच काही काडतूस
पोलिसांनी जप्त केलं आहे.
**
करआकारणी व्यतिरिक्त इतर अडचणींवर
उपाययोजना करण्याचं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आशियाई समुहाला
केलं आहे. भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या इंडो-आशियाई प्रदेशातल्या वाणिज्य
मंत्र्यांच्या अधिवेशनाला संबोधित करताना ते बोलत होते. आशियाई समुहाबाहेरच्या इतर
काही देशांकडून बऱ्याचदा मुक्त व्यापार करायचा गैरवापर होतो, त्यालाही आळा घालावा असं
आवाहन त्यांनी यावेळी केलं.
**
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८
लाख ८६ हजार ६९२ तरुणांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. तर ५१ पूर्णांक ८३ टक्के लाभार्थ्यांनी
पहिला डोस घेतला आहे. जिल्ह्यात १४ ऑक्टोबरपर्यंत 'मिशन कवच कुंडल मोहीम राबवण्यात
येत असून नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी
केलं आहे.
**
अहमदनगर जिल्ह्यात १८ वर्षावरील
३६ लाख ३ हजार ६०० लाभार्थ्यांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे.
आत्तापर्यंत साधारणपणे ६० टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस आणि २१ टक्के लाभार्थ्यांना
दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात मिशन कवच
कुंडल कोविड १९ विशेष लसीकरण मोहिम राबवण्यात येत असून ग्रामिण भागात प्रत्येक
उपजिल्हा, ग्रामिण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येकी ४ लसीकरण सत्र,
तसंच महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ४० लसीकरण सत्र असे एकूण ६५० लसीकरण सत्रांचे
नियोजन करण्यात आलं आहे.
**
दसरा सणानिमित्त प्रवाशांची
गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा ते तिरुपती दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा
निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे गाडी चालू महिन्याच्या प्रत्येक सोमवारी पूर्णा
इथून दुपारी एक वाजता सुटेल, तर तिरुपती इथं मंगळवारी सकाळी आठ वाजता पोहचेल. परतीच्या
प्रवासात ही गाडी तिरुपती इथून दर मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता निघून बुधवारी दुपारी
तीन वाजून २५ मिनिटांनी पूर्णा इथं पोहचेल.
**
इंडियन प्रिमियर लीग- आयपीएलमध्ये
दिल्ली कॅपिटल संघ १४ सामन्यांमध्ये २० गुणांसह गुण तालिकेत सर्वप्रथम स्थानावर आहे.
चेन्नई सुपर किंग्स १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरूदेखील १८ गुणांसह तिसऱ्या
स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स संघ सरासरी धावसंख्येत
मागे राहिल्यानं तो तिसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता नाइट राइडर्स चौथ्या स्थानावर आहे.
दुबई इथं उद्या दिल्ली कॅपिटलचा सामना चेन्नई सुपर किंग्स सोबत होणार आहे.
**
भारतीय टपाल विभागातर्फे आजपासून
‘राष्ट्रीय डाक सप्ताह’ साजरा केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण
झाल्याच्या अनुषंगानं यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताहाअंतर्गत “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”
साजरा केला जात आहे. १६ ऑक्टोबर पर्यंत हा सप्ताह चालणार आहे. डाक विभागामार्फत राबवल्या
जाणाऱ्या कल्याणकारी तसंच बचत योजनांचा या सप्ताहात प्रचार - प्रसार केला जाणार आहे.
**
No comments:
Post a Comment