Monday, 11 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      औष्णिक ऊर्जा केंद्रांची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाचा पुरेसा साठा, वीज तुटवड्याची भीती पूर्णपणे अयोग्य असल्याचा केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा खुलासा

·      राज्यात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतले १३ संच बंद, ३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प, विजेचा काटकसरीनं वापर करण्याचं महावितरणचं आवाहन

·      उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरी इथल्या हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा आज राज्यात बंद

·      राज्यात दोन हजार २९४ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात पाच जणांचा मृत्यू तर ७१ बाधि

आणि

·      बीड जिल्ह्यातील वक्फ मंडळाच्या ५७ एकर जमिन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉ, एन आर शेळकेला पाच दिवसांची पोलिस कोठडी

****

देशातल्या औष्णिक ऊर्जा केंद्रांची मागणी पूर्ण करण्याइतका कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असून वीज तुटवड्याची भीती पूर्णपणे अयोग्य असल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यंदा देशात कोळशावर आधारित ऊर्जा उत्पादन जवळजवळ २४ टक्के वाढल्यामुळे कोळशाची मागणी देखील वाढली. तसंच  मान्सून अधिक काळ लांबल्यामुळे कोळशाच्या पुरवठ्यावर विपरीत  परिणाम झाला. मात्र ऊर्जा केंद्रांना कोळसा कंपन्यांकडून रोज कोळसा पुरवला जात आहे. त्यामुळे ऊर्जा कंपन्यांकडंचा कोळशाचा साठा संपण्याची भीती पूर्णपणे चुकीची असल्याचं यात म्हटलं आहे.

केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल देशातल्या कोळसा उत्पादन आणि पुरवठ्याबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला. कोल इंडिया कंपनीकडे सध्या ४३ दशलक्ष टन कोळशाचा साठा असून तो ऊर्जा क्षेत्राची २४ दिवसांची गरज भागवण्यासाठी पुरेसा असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर दिलेल्याला संदेशात म्हटलं आहे.

****

दरम्यान, राज्यातील महावितरण कंपनीनं प्रसिद्धी पत्रक जारी करून कोळशाच्या टंचाईमुळे राज्यात कंपनीला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतले १३ संच, सद्य:स्थितीत बंद असल्याचं, कळवलं आहे. त्यामुळे तब्बल तीन हजार ३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाल्याचं म्हटलं आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह, जलविद्युत आणि अन्य स्त्रोतांकडून वीज उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे. राज्यात विजेचं भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून, वीज ग्राहकांनी मागणी आणि उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी, दररोज सकाळी सहा ते १० आणि सायंकाळी सहा ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन, महावितरणकडून करण्यात आलं आहे.

****

उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरी इथल्या हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीनं आज राज्यात बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये, सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावं, आणि शेतकरी विरोधी कायदे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय संदर्भात जागृती करावी, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. या संदर्भाने त्यांनी काल एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं. अत्यावश्यक सेवांना बंद मधून वगळण्यात आलं आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, सर्व व्यापारी संघटना, सर्व अंगिकृत संघटना, सामाजिक संघटना बंद मध्ये सहभागी होणार आहेत.

दरम्यान, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं या बंदला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राजकीय बंदला व्यापारी महासंघाचा विरोध असल्याचं यापूर्वीच प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. लखीमपूरची घटना दुःखद आहे. मात्र, यापूर्वी घेतलेल्या निर्णयामुळे बंदला पाठिंबा देणार नाही, असं व्यापारी महासंघानं म्हटलं आहे. जर कोणी व्यापारी स्वेच्छेनं बंद पाळणार असेल, तर त्याला महासंघाचा विरोध नसेल, असं व्यापारी महासंघानं स्पष्ट केलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दुपारी एक वाजेपर्यंतच या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी दिली.

****

लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीनं पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी, काँग्रेस पक्षानं देशभरातल्या काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांना, आज तीन तास मौन पाळण्यास सांगितलं आहे. सकाळी १० ते दुपारी एक या वेळेदरम्यान राजभवन किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयाबाहेर हे मौन आंदोलन केलं जाणार आहे. पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भात प्रदेश काँग्रेस समित्यांना पत्र पाठवलं आहे.

****

राज्य सरकार स्वतःच राज्यात बंद कसा पुकारू शकतं, असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीनं आज पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी काल एक पत्रक प्रसिद्ध केलं. विरोधाचं राजकारण करण्यात महाविकास आघाडी इतकीशगुझाली आहे की, आपण राज्यात सरकार चालवत आहोत, याचं त्यांना भान राहिलं नाही, अशी टीका त्यांनी केली. बंद पुकारण्याची महाविकास आघाडीची भूमिका चुकीची असून, या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची मागणी आठवले यांनी केली आहे.

****

राज्यात काल दोन हजार २९४ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ७ हजार, ८७२ झाली आहे. काल २८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ५४२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल एक हजार ८२३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६ लाख एक हजार २८७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३३ हजार ४४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ७१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन, तर बीड आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

बीड जिल्ह्यात काल २० नवे रुग्ण आढळले, उस्मानाबाद जिल्ह्यात १९, लातूर १४, औरंगाबाद आठ, नांदेड सहा, जालना तीन, तर परभणी जिल्ह्यात काल एक रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, ही अपेक्षा रास्त असल्याचं, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी जिल्हानिहाय नुकसानाचा एका बैठकीत आढावा घेतला, पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं ८० टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी आपण या बैठकीत केल्याचं, चव्हाण यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज याबाबत चर्चा होणार असून, शेतकऱ्यांना पीक विमा राष्ट्रीय आणि राज्य मदत निधीतून मदत देण्याबाबत निर्णय येत्या आठवड्यात होणं अपेक्षित असल्याचं, चव्हाण यांनी म्हटलं आहे.

****

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल अचानकपणे पूर्णा शहराला भेट दिली. याप्रसंगी लसीकरणाबाबत कडक सूचना देत त्यांनी तब्बल चार तास बाजारपेठतले दुकानदार तसंच नागरिकांना लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं. जिल्हाधिकारी शहरात दाखल होताच लसीकरण न केलेल्या अनेक दुकानदारांनी दुकानं बंद करून पळ काढल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जागतिक मानसिक आरोग्य दिन काल पाळण्यात आला. मानसिक आरोग्य आणि समस्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रतिवर्षी हा दिवस साजरा केला जातो. असमान जगातलं मानसिक आरोग्य’,सा या दिनाचा यंदाचा विषय आहे. औरंगाबाद शहरातल्या मोतीकारंजा परिसरातल्या जीवन आधार बेघर निवारा गृहात, औरंगाबाद महापालिका आणि जीवन आधार केंद्राच्या वतीनं एक कार्यक्रम घेण्यात आला. मनपा उपायुक्त सौरभ जोशी, जीवन आधार केंद्राचे संचालक डॉ. फारुख पटेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

****

दसरा आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर, नांदेड जिल्ह्यातल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक एक, देगांव-येळेगाव लक्ष्मीनगर, तसंच हिंगोली जिल्ह्याच्या डोंगरकडा  इथल्या युनिट क्रमांक दोनच्या उसाची प्रतवारी लक्षात घे, किमान किफायतशीर दर- एफआरपीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी ही माहिती दिली. देगांव-येळेगाव लक्ष्मीनगर युनिटसाठी दोन हजार ४६४ रुपये, तर डोंगरकडा युनिटसाठी दोन हजार ५६६ रुपये प्रतिटन एफआरपी दर निश्‍चित करण्यात आला असून, तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचं तिडके यांनी सांगितलं.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात काल ललिता पंचमी निमित्त देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. देवीच्या या मनमोहक पूजेचे नयनरम्य दृश्य पाण्यासाठी भाविकांनी तुळजापुरात मोठी गर्दी केली होती.

****

राज्य सरकारनं इतर मागसवर्गीय- ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडणं आवश्यक असल्याचं मत, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी व्यक्त केलं आहे. काल नाशिक इथं भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियानांतर्गत, ओबीसी मेळाव्यात त्या बोलत होत्या. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधला विसंवाद आणि मतभेदामुळे, ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडली गेली नाही, असा आरोप पवार यांनी केला.

दरम्यान, ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या विरोधात उद्या १२ ऑक्टोबरला औरंगाबाद इथं ओबीसी मेळावा घेण्यात येणार आहे, असं आमदार अतुल सावे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. 

****

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या चिंचपूर इथल्या वक्फ बोर्डाच्या ५७ एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉ, एन आर शेळके याला न्यायालयानं पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर जमिनीच्या मूळ अभिलेखाची बनावट कागदपत्रं जमा करुन त्याआधारे जमिन परस्पर विकल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात आणखी सात जणांचा शोध सुरु आहे.

****

लातूर शहरातून पोलिसांनी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गुटखा आणि सुगंधीत तंबाखूचा साठा जप्त केला. शहरासह जिल्ह्यात राजरोसपणे गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांनी मिळून गंजगोलाई परिसरातल्या प्रेम एजन्सी या दुकानावर शनिवारी मध्यरात्रीनंतर छापा टाकला. याप्रकरणी प्रेमनाथ तुकराम मोरे, त्याचे सहकारी शिवाजी मोहिते, सावकार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहरानजिक भांगसीमाता गडाजवळच्या खदानीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुणा पाण्यात बुडाले. नितीन गुंडाळे आणि प्रल्हाद चव्हाण अनुक्रमे १९ आणि २४ वर्ष वयाच्या या युवकांचे मृतदेह अग्निशामक दलानं सायंकाळी खदानीतून बाहेर काढले.

अन्य एका घटनेत, वेरूळ लेणी परिसरातल्या धबधब्याखाली पोहण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय युवकाचा काल बुडून मृत्यू झाला. आर्यन विजयप्रताप सहानी असं या युवकाचं नाव असून, तो औरंगाबाद शहरातल्या विजय नगर गारखेडा परिसरातला रहिवासी आहे.

****

हवामान -

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल तर या काळात विदर्भात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

**** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...