Thursday, 23 December 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.12.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 December 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरण्यास उशीर झाला, तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. शिवसेनेचे विकास पोतनीस यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या. तांत्रिक कारणामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यादृष्टीनं चार मार्च पासून सुरु होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी तीन मार्च पर्यंत, तर १५ मार्चपासून सुरु होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी १४ मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुभा देण्यात येत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.

 

विधान परिषदेत भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याप्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शेतकऱ्यांबाबत चुकीचं विधान केल्यामुळे विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ करत सभात्याग केला. 

 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं, परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानसभेत सांगितलं.

 

बीड जिल्हा पुरवठा विभागातून पाच हजार रेशन कार्ड गहाळ झाल्याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचं, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सांगितलं. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी रेशन कार्ड गहाळ प्रकरण आणि सार्वजनिक वितरण विभागात पदभरती संदर्भात प्रश्न विचारला होता. रेशन कार्ड गहाळ करुन धान्य काळ्या बाजारात जात असेल, तर हा मोठा भ्रष्टाचार असल्याचं, त्यांनी नमूद केलं. याप्रकरणी संबंधित तहसिलदार आणि कारकुनाविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना दिला असून, चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असं भुजबळ यांनी सांगितलं.

 

मंत्र्यांना धमकी येत असल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी मंत्री नवाब मलिक यांनी आज विधानसभेत केली. मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीप्रकरणी झालेल्या चर्चेत ते बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. मंत्र्यांना आलेल्या धमकीचा पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याचा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, पोलिसांनी याप्रकरणी बंगळुरुमधून एकाला अटक केल्याचं सांगितलं. या आरोपीला आज न्यायालयासमोर हजर केलं असता, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याचं, गृहमंत्र्यांनी सांगितलं. मंत्र्यांना धमकी प्रकरणी राज्यस्तरावर चौकशी समिती स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

देशातल्या ६० टक्के पात्र नागरीकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. नागरीकांचं सहकार्य आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशानं हे यश संपादन केल्याचं ते म्हणाले. देशात आतापर्यंत या लसीच्या १३९ कोटी ६९ लाख ७६ हजार ७७४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

देशात काल नव्या सात हजार ४९५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४३४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल सहा हजार ९६० रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४२ लाख आठ हजार ९२६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ७८ हजार २९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.   

****

देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना राज्यांसोबत समन्वय राखत काम करण्याचे निर्देश दिले होते. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जिनोम सिक्वेंसिंगमार्फत आतापर्यंत देशात ओमायक्रॉनच्या २१४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

****

कोविड लसीकरणात हलगर्जीपणा आणि आरोग्य विषयक बैठकांना अनुपस्थित राहिल्याबद्दल, हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आलं आहे. वैद्यकीय अधिकारी यू. टी. हेळकर हे वरिष्ठ आरोग्य अधिकारी असताना कनिष्ठांसह रुग्णांशीही व्यवस्थित वागत नसल्याच्या तक्रारी होत्या, तसंच त्यांच्या कामात अनियमितता आढळून आल्यानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी ही कारवाई केली.  

****

बीड जिल्ह्यात केज - अंबाजोगाई रस्त्यावर गुटखा घेऊन जात असलेला ट्रक चोरांनी लुटला. शेजारील राज्यातून हा गुटखा आणून तो शिरूरला नेण्यात येत होता. पोलिसांनी चोरांचा पाठलाग केला, मात्र सात आरोपी हे फरार झाले, तर ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...