Friday, 3 December 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 December 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही. त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाला नाशिक इथं प्रारंभ; मराठी भाषेला अभिजात दर्जाबाबतचा ठराव संमत करावा- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचं आवाहन.

·      केंद्रीय दक्षता आयोग सुधारणा विधेयक लोकसभेत सादर.

·      एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली पगारवाढ कायमस्वरुपी असून, याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये - परिवहन मंत्री अनिल परब.

आणि

·      न्यूझीलंडविरूद्ध दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी भारताच्या चार बाद २२१ धावा.

****

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून नाशिक इथं प्रारंभ झाला. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. गीतकार जावेद अख्तर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि अनेक मान्यवर साहित्यिक यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. लेझीम, मल्लखांब तसंच अनेक खेळांचं प्रदर्शन हे या ग्रंथदिंडीचं वैशिष्ट्य ठरलं,

दरम्यान, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी या संमेलनात ठराव करावा, असं आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. साहित्य संमेलन परिसरात मराठी भाषा दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते आज बोलत होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली असून, राष्ट्रपतींना १२ कोटी पत्रं पाठवण्यात येणार असल्याचं, देसाई यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, या संमेलनाच्या निमित्तानं भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं तर संमेलनामध्ये प्रथमच भरवण्यात आलेल्या चित्र-शिल्प प्रदर्शनाचं उद्घाटन चित्रकार विजयराव बोधनकर यांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रंथ प्रदर्शनात सुमारे दीडशे कक्ष उभारण्यात आले आहेत.

या संमेलनासाठी सर्व प्रकारच्या नियमांची दक्षता घेण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण झालेल्यांना प्रवेश देण्यात येत असून, संमेलनस्थळी कोविड लसीकरणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

****

केंद्रीय दक्षता आयोग सुधारणा विधेयक २०२१ आज पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जीतेंद्र सिंग यांनी लोकसभेत मांडलं. या विधेयकाचं उद्दीष्ट स्पष्ट नसल्याचं सांगत काँग्रेसचे सभागृहातले नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकाला विरोध केला, तर हे विधेयक भारतीय राज्यघटनेतल्या अनेक तरतुदींशी विसंगत असल्याचं मत काँग्रेसचे शशी थरुर आणि रिवोलिशनरी सोशलिस्ट पार्टीचे एन के प्रेमचंद्रन यांनी मांडलं. मात्र विरोध करणारे सदस्य, विधेयक पूर्णपणे वाचण्याआधीच निष्कर्ष काढत आहेत, असं जीतेंद्र सिंग म्हणाले. केंद्रीय दक्षता आयोग आणि सीबीआयच्या संचालकांचा कार्यकाळ एकावेळी एका वर्षापर्यंत वाढवण्याची तरतूद या विधेयकांमधे आहे.

****

कोविडच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सीजनच्या अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला, या आरोपाचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी खंडन केलं आहे. आज लोकसभेत प्रश्नोतराच्या तासात ते बोलत होते. कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान, देशात ऑक्सीजनच्या उत्पादन क्षमतेत चांगलीच वृद्धी झाल्याचं मांडवीय यांनी सांगितलं. सागरी आणि हवाई मार्गानं ऑक्सीजन सिलेंडर्स आणि कंटेनर्स आयात केल्याचं सांगून रुग्णांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवण्यासाठी अनेक सुविधा वाढवण्यात आल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.

****

विरोधी पक्षाच्या अशोभनीय वर्तनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर निषेध करत विरोध दर्शवला. विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना गेल्या अधिवेशनात निलंबित केल्यावरून विरोधी पक्षाचे सदस्य गेल्या काही दिवसांपासून संसदेत धरणं देत आहेत.

****

राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली पगारवाढ कायमस्वरुपी असून, याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे, ते आज मुंबईत एसटी संपासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यानं, राज्य सरकार सध्या त्याबाबत निर्णय घेऊ शकत नसल्याचं, परब यांनी सांगितलं. कामगारांनी सर्वसामान्य जनतेला वेठीस न धरता, संप मागे घेत तत्काळ कामावर रुजू व्हावं, असं आवाहनही परब यांनी केलं.

दरम्यान, एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा ३७ वा दिवस होता. दरम्यान आपल्या मागण्यांसाठी नांदेड इथं उपोषणास बसलेले एस टी वाहक दिलीप वीर हे आज अत्यवस्थ झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं असतां, त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, चार उपोषणार्थीना आजही रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज तोडणी तात्काळ थांबवावी आणि वीज जोडणी तात्काळ पूर्ववत करून द्यावी या मागणीसाठी आज उस्मानाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनी कार्यालया समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. आंदोलनात भाजप लोकप्रतिनिधींसह शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. दरम्यान या रॅली मुळे उस्मानाबाद शहरात मुख्य मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं

****

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आजपासून मुंबईत सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं दमदार सुरवात केली. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं आज २२१ धावा केल्या. आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सलामीवीर मयांक अग्रवाल १२० धावांवर तर वृद्धिमान साहा २५ धावांवर खेळत होते. कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आज शून्यावर बाद झाले. शुभमन गिलनं ४४ तर पहिल्या कसोटीत शतक झळकावलेल्या श्रेयस अय्यरने १८ धावा केल्या.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात मुंबई - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर फुलवाडी इथल्या पथकर नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे आणि नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर नवगिरे यांनी तोडफोड केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या टोलनाक्यावरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून नळदुर्ग, अणदुर, जळकोट, फुलवाडी, धनगरवाडी तसंच इतर अनेक जवळच्या गावातील वाहनधारकांना अपमानित केलं जात असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं. या प्रकरणी जाब विचारत असतांना ही बाचाबाची झाल्याचं समजतं. दरम्यान, टोलकंपनीच्या अधिकाऱ्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात नवगिरे यांच्या विरोधात तक्रार दिली असुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

****

मराठवाड्यात पुढच्या २४ तासांत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 16 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...