Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 December 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन
आजपासून मुंबईत सुरु झालं. कोविडच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच दिवस हे अधिवेशन चालणार
आहे.
राज्यात अनेक भागात वीज पुरवठा
खंडीत केला जात असल्याबद्दल आणि विविध विभागांच्या परीक्षेतल्या घोटाळ्यासंदर्भात विधानसभेत
विरोधकांचा स्थगन प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळून लावला. विविध विभागांच्या परीक्षा
आणि पेपरफुटी प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या सभागृहात चर्चा
घेण्याची मागणी केली. सरकारकडून काँग्रेसचे नाना पटोले यांनी देखील परीक्षेसंदर्भात
सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या
तासात रेतीच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. खनिकर्म महामंडळाच्या वतीनं
वाळूचं धोरण सरकारकडे पाठवण्यात आलं असून, त्यासंदर्भात सरकारनं निर्णय घ्यावा, अशी
मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. रेतीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात
वाढली असून, उत्खनन करणाऱ्यांवर कशी कारवाई करण्यात येते, असा प्रश्न त्यांनी विचारला.
रेती उत्खनन आणि वाहतुकीकडे लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक नेमणार असून, ऑफसेट किंमतीबद्दलही
लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी
शेतकऱ्यांच्या समस्या आणि इतर मुद्यांवरुन विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या
पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आज
एक दिवस आधी संपवण्यात आलं. दोन्ही सदनांचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं.
या अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांचे प्रश्न, लखीमपूर खेरी प्रकरण, १२ खासदारांचं निलंबन
यासह अन्य मुद्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज वारंवार
बाधित झालं. अधिवेशन काळात लोकसभेत ८२ टक्के काम झालं असून, नऊ विधेयकं पारित करण्यात
आली असल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं.
राज्यसभेत तुलनेनं अत्यंत कमी
काम झालं असल्याचं, सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. सदनाचं कामकाज चांगल्या
पद्धतीने आणि सुरळीत चालण्यासंदर्भात सदस्यांनी आत्मपरिक्षण करावं, असं नायडू म्हणाले.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरण मोहिमेनं १३८ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ५७ लाख पाच हजार
३९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १३८ कोटी ९५ लाख ९० हजार ६७०
मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
रविवारी २६ डिसेंबरला आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ८४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
औरंगाबाद शहरात विना मास्क
फिरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त आस्तिक
कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. त्यानुसार काल शहरातल्या हर्सूल टी पॉइंट, बाबा पेट्रोल
पंप, सिडको बस स्थानक चौक इथं विना मास्क फिरणाऱ्या ९० वाहन चालकांचे महानगरपालिका
कर्मचाऱ्यांनी फोटो काढून परिवहन कार्यालयाला पाठवून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई
करण्यास सांगण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात किमान आधारभूत
किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२१-२२ मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी मार्केटिंग
फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी
आवश्यक कागदपत्रे तालुक्यातल्या खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी, असं आवाहन, जिल्हा
पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या नारेगावच्या
सिसोदिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये प्लास्टिक बाटल्या तयार करणाऱ्या हिलाबी इंजिनिअरींग
वर्क्स या कारखान्यात, मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी, सिडको पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे मुख्य तंत्रज्ञ
सतीश दिवे हे वीजबिल वसुलीसाठी या कारखान्यात आले असता त्यांना हा वीज चोरीचा प्रकार
लक्षात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा
तालुक्यातल्या दाळींब आणि जकेकूर शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड
टाकून अवैध विदेशी मद्याचा साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत
सुमारे साडे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध
गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
ढाका इथं सुरू असलेल्या आशियाई
अजिंक्यपद करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात काल भारतीय हॉकी संघाला जपानकडून
तीन-पाच असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताचा कांस्य पदकासाठीचा सामना
पाकिस्तानविरुद्ध होणार असून, हा सामना आज दुपारी साडे तीन वाजता सुरु होईल.
****
No comments:
Post a Comment