Thursday, 23 December 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.12.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 December 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र दुरुस्ती विधेयकासंदर्भातील संयुक्त समितीचा अहवाल विधानसभेत सादर

·      विविध विभागांच्या नोकर भरती परीक्षा घोटाळ्यासह इतर मुद्यांवर विधीमंडळात खडाजंगी चर्चा, तीन निवृत्त सचिवांमार्फत चौकशी करण्याची सरकारची घोषणा

·      संसदेचं हिवाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित

·      राज्यात कोविडचे नवे एक हजार २०१ रुग्ण, मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू तर ३० नवे बाधित

·      स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडी तर राज्याच्या इतर भागात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी

आणि

·      आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला कांस्य पदक

****

शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र दुरुस्ती विधेयक-२०२० संदर्भात नेमलेल्या संयुक्त समितीचा अहवाल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत सादर केला. आंध्र प्रदेशातल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर तयार केलेलं हे विधेयक, विधीमंडळाच्या गेल्या हिवाळी अधिवेशनात मांडलं होतं. मात्र, ते संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं.

महिलांवरील अन्याय - अत्याचारांच्या प्रकरणांमधे पोलिसांनी ३० दिवसाच्या आत तपास पूर्ण करावा, आणि तो या मुदतीत झाला नाही, तर त्याची कारणं देऊन, विशेष पोलिस महानिरिक्षक किंवा पोलिस आयुक्तांकडून आणखी ३० दिवसांची मुदत घेता येईल, अशी शिफारस संयुक्त समितीनं केली आहे. अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणांमधे किमान १५ वर्ष ते आजन्म कारावास, तसंच रोख दंडाची तरतूद करणारी दुरुस्ती करण्याची शिफारसही, समितीनं केली आहे, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. 

****

विविध विभागांच्या नोकर भरती परीक्षा घोटाळा आणि इतर मुद्यांवर विधीमंडळात काल अधिवेशनाचा पहिल्या दिवशी खडाजंगी चर्चा झाली.

विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पध्दती ऐवजी आवाजी मतदानानं घेण्याचा प्रस्ताव काल सरकारी पक्षानं बहुमतानं संमत करून घेतला. या बदलाबाबत हरकती सूचना देण्याची मुदत १० दिवसांवरून एक दिवस करण्याचा निर्णय यावेळी बहुमतानं घेण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बदलाला कडाडून विरोध केला. सदस्यांचा वैधानिक अधिकार नाकारला जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर सभात्याग केला.

दरम्यान, शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोकर भरती परीक्षा घोटाळ्यांकडे लक्ष वेधत, या प्रकरणावर चर्चेची मागणी केली. या मागणीला काँग्रेसचे नाना पटोले यांनी पाठिंबा दिला. राज्याच्या जनतेला माहिती मिळावी म्हणून या घोटाळ्यांवर चर्चा होणं गरजेचं आहे, असं पटोले म्हणाले.

विविध विभागात झालेल्या नोकर भरती परीक्षा घोटाळ्याबाबत तीन निवृत्त सचिवांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत जाहीर केलं. सदर विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्याव्यात यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, तसंच या विद्यार्थ्यांकडून कोणतंही परीक्षा शुल्क घेतलं जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भातल्या पोलीस चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून, यात मंत्र्यांच्या सहभागाबद्दल पोलिसांचा सायबर विभाग तपास करत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

सत्ताधारी पक्षाचे सदस्य भास्कर जाधव यांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंगविक्षेप करत नक्कल केल्याच्या कारणावरून, विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले. या अंगविक्षेपाबद्दल जाधव यांनी माफी मागावी किंवा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मांडलेल्या मतानंतर जाधव यांनी सदनाची बिनशर्त माफी मागितली.

अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्र सरकारनं दिलेल्या निधीचं पात्र शेतकऱ्यांना पूर्ण वाटप झालेलं नसल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं. विविध गावांमधल्या वीज भारनियमनाचा मुद्दाही त्यांनी मांडला.

हिवाळी अधिवेशनात काल पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरचे आर.एम.वाणी, तुळजापूरचे सिद्रामप्पा नागप्पा आलुरे, नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडचे नागनाथराव रावणगावकर, भोकरदन - जाफ्राबाद मतदार संघाचे आमदार संतोष दसपुते यांचा समावेश आहे.

राज्य विधान परिषदेचे काँग्रेस सदस्य हेमंत रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर, सदस्य पदी निवड झालेल्या डॉ प्रज्ञा राजीव सातव यांनी, काल विधान परिषदेत सदस्य पदाची शपथ घेतली.

दरम्यान, अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि इतर मुद्यांवरुन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं. निर्धारित मुदतीच्या एक दिवस आधी संपवण्यात आलेल्या या अधिवेशनादरम्यान, शेतकऱ्यांचे प्रश्न, लखीमपूर खेरी प्रकरण, १२ खासदारांचं निलंबन, यासह अन्य मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे, दोन्ही सदनांचं कामकाज वारंवार बाधित झालं. लोकसभेत ८२ टक्के काम झालं असून, नऊ विधेयकं पारित झाल्याची माहिती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.

राज्यसभेत तुलनेनं अत्यंत कमी काम झाल्याचं, सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. सदनाचं कामकाज चांगल्या पद्धतीने आणि सुरळीत चालण्यासंदर्भात सदस्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज, नायडू यांनी व्यक्त केली.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार २०१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ५२ हजार १६६ झाली आहे. काल आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ३७५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ९५३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९९ हजार ७६० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार ३५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात नऊ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात आठ, नांदेड सहा, लातूर तीन, तर उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात दोन नवे रुग्ण आढळले. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.  

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर इथल्या तीन कोविडग्रस्तांचे नमुने ओमायक्रॉन तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. हे तिघे दक्षिण आफ्रिकेवरून परतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. मराठवाड्यातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली तर राज्याच्या इतर भागात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री नगरपंचायत पोटनिवडणुकीत दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पूजा ढोके या २७९ मतं घेऊन विजयी झाल्या, तर शिवसेनेच्या उमेदवार अर्चना दुतोंडे या ४३४ मतं घेऊन विजयी झाल्या. सिल्लोड नगरपरिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत, शिवसेनेच्या फातमाबी जब्बार खान या दोन हजार १९ मतं घेऊन विजयी झाल्या.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या मुस्काना सय्यद वाजिद विजयी झाल्या. त्यांनी एम आय एमच्या उमेदवार रेशमा बेग यांना पराभूत केलं. भाजपच्या उमेदवार लक्ष्मी जोंधळे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

 

अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी ५१७ मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार सुरेश तिवारी यांचा त्यांनी पराभव केला. भाजप मधून हकालपट्टी झालेल्या वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची निवड रद्द करण्यात आल्यानंतर ,रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली.

 

धुळे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या आरती अरुण पवार विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या अनिता देवरे यांचा दोन हजार ७९४ मतांनी पराभव केला. यवतमाळ जिल्ह्यातल्या धाणकी नगर पंचायत पोटनिवडणुकीत भाजपनं दोन्ही जागा जिंकल्या.

****

औरंगाबाद शहरात कचरा उचलण्यास दिरंगाई केल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी, रेड्डी कंपनीला १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. शहरात काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला तसंच पडीक जागेवर कचरा आढळून आल्यानं, आणि सदरील कचरा उचलण्यात अनियमितता आणि दिरंगाई तसंच बेजबाबदारपणा आढळून आल्यानं, ही कारवाई केली आहे. यापुढं रस्त्यावर कचरा आढळून आल्यास ते खपवून घेणार नसल्याचं, पाण्डेय यांनी म्हटलं आहे.

****

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला हरवत, कांस्य पदक पटकावलं. बांग्लादेशात ढाका इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार-तीन असा पराभव केला. याआधी भारतानं २०१६ मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद, तर २०१८ मध्ये संयुक्त विजेतेपद मिळवलं होतं.

****

राज्य सरकारच्या पाठपुराव्यानं बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी मिळाली असून, त्या आयोजित करताना न्यायालयानं घातलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन, पशुसंवर्धन, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे. या नियमांचा भंग झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमांत, नांदेड जिल्ह्यात गोदावरी आणि आसना नदीच्या त्रिकुट इथल्या संगमावर, गेला आठवडाभर लोकसहभागातून स्वच्छतेसह विविध उपक्रम राबवण्यात आले. काल नदीपात्रात दिवे सोडून या उपक्रमाची सांगता करण्यात आली.

****

कर्नाटकात बंगळुरू इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ, परभणीत नागरिकांनी काल बंद पुकारला, या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

****

औरंगाबाद महानगरपालिका पुढच्या तीन वर्षात शहराचा हवामान कृती आराखडा तयार करणार आहे. महाराष्ट्र शासन आणि चिल्ड्रेन इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन ह्यांचा सहकार्यानं, काल हा करार करण्यात आला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 19 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...