Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 December 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ डिसेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत
आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या
सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस
घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी
घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९
शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत
वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
कोरोना विषाणू बाधित आणि ओमायक्रॉनचा वाढत असलेल्या संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लावण्यासाठीची नवी नियमावली राज्य सरकार आज जाहीर करणार
·
राज्यात २३ नविन ओमायक्रॉन बाधित रूग्ण, उस्मानाबाद जिल्ह्यातील
दोन जणांचा समावेश
·
राज्यात एक हजार १७९ तर मराठवाड्यात २३ नवे कोरोना विषाणू बाधित
रुग्ण
·
विधानसभेत मंजुरी मिळालेलं बहुप्रतिक्षित शक्ती विधेयक आज विधानपरिषदेत
मांडणार
·
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या १२७ कोटी
रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी १५ दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं राज्य सरकारचं
विधानपरीषदेत आश्वासन
आणि
·
शासकीय सेवेच्या कालावधीत ३६ लाखाची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी
औरंगाबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यासह त्याच्या पत्नीला दोन वर्ष
सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक लाख रुपयाच्या दंडाची शिक्षा
****
राज्यात
वाढलेली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आणि ओमायक्रॉनचा वाढत असलेला संसर्ग,
या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लावण्यासाठीची नवी नियमावली आज जाहीर केली जाणार आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्य कृती दलाशी चर्चा करणार आहेत.
काल
रात्री उशिरा कोविड संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील याबाबत झालेल्या
कृती दलाच्या सदस्यांच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं.
आगामी
नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसंच विवाह समारंभ,
पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता
येतील यादृष्टीनं आज होणाऱ्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात येऊन नियमावली जाहीर करण्याचा
निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर काल एका उच्चस्तरीय
बैठकीत आढावा घेतला. सर्व लसपात्र नागरिकांचं लवकरात लवकर संपूर्ण लसीकरण करून घ्यावं,
अशी सूचना त्यांनी यावेळी केली. आपण सतर्क आणि सावध राहायला हवे, असं नमूद करत पंतप्रधानांनी,
विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
***
राज्यात
काल २३ नविन ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले. यामुळे आता राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित
रुग्णांची एकूण संख्या ८८ झाली आहे. यापैकी ४२ रुग्ण बरे झाले आहेत. काल आढळलेच्या
रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या १३ रुग्णांचा समावेश असून, यात पिंपरी चिंचवड महापालिका
हद्दीतील सात रुग्ण आहेत. याशिवाय मुंबईत पाच, उस्मानाबाद दोन, तर ठाणे, नागपूर आणि
मिरा भाईंदर शहरात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी १६ जणांनी आंतरराष्ट्रीय
प्रवास केलेला आहे, तर सात जण हे त्यांच्या निकट सहवासातील रुग्ण आहेत.
***
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार १७९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ५३ हजार ३४५ झाली आहे. काल १७ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
३९२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ६१५ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख ३७५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले
असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार
८९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
***
मराठवाड्यात
काल २३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात नऊ, बीड सहा, लातूर
पाच, उस्मानाबाद दोन, तर नांदेड जिल्ह्यात एका नव्या रुग्णांची नोंद झाली. परभणी, हिंगोली
आणि जालना जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही.
***
कोविड
आणि ओमायक्रॉन साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नाताळ सण साध्या पद्धतीनं साजरा
करण्याचं आवाहन केलं आहे. चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या प्रार्थनेच्या वेळी क्षमतेच्या
५० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थितीस परवानगी असणार नाही. चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकानं
कोविड नियमांचं पालन करावं. गर्दीला आकर्षित करणारे कोणतेही धार्मिक आणि सांस्कृतिक
कार्यक्रम तसंच मिरवणुकीस बंदी घालण्यात आली आहे.
***
महिला
आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करता यावी, यासाठी
बहुप्रतिक्षित शक्ती विधेयक आज विधानपरिषदेत मांडण्यात येणार आहे. काल विधानसभेत या
विधेयकाला मंजुरी मिळाली. विधानसभेत विरोधी पक्ष सदस्यांनीही या विधेयकातल्या तरतुदींचं
स्वागत केलं. या विधेयकात बलात्कार, लैंगिक छळ, महिलांवरचे अॅसिड हल्ले यासारख्या गुन्ह्यांसाठी
कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यात समाजमाध्यमांवर
महिलांची बदनामी, अॅसिड हल्ला, विनयभंग आदी गुन्हे अजामीनपात्र करण्याची तरतूद आहे.
तर सर्व खटले एका महिन्यात निकाली काढणं, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र तपास यंत्रणा
आणि विशेष न्यायालयं स्थापन करणं, आदी गोष्टींचा समावेश आहे.
***
जिल्हा
पुरवठा अधिकारी संवर्गातली रिक्त पदं भरण्याची कार्यवाही सुरु असून, याबाबत अधिक पाठपुरावा
करण्यात येईल, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल विधानसभेत सांगितलं.
बीड जिल्हा सार्वजनिक वितरण पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका गहाळ झाल्याबाबतचा तारांकित
प्रश्न, संदीप क्षीरसागर, प्रशांत बंब आणि प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता,
त्याच्या उत्तरात भुजबळ यांनी ही माहिती दिली. बीड तहसील कार्यालयामधून पाच हजार ४९८
शिधापत्रिका, विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता वितरित झाल्याचं निदर्शनास आलं आहे.
याप्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दोषी असलेल्या तत्कालिन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी,
नायब तहसीलदार, तत्कालिन अव्वल कारकून यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्याचा
प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे देण्यात आला आहे.
नांदेड
जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यातल्या स्वजलधारा अभियानाअंतर्गत झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या
कामांची चौकशी करण्यात येईल, चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असं पाणीपुरवठा आणि
स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. सध्या नांदेड जिल्ह्यातल्या
धर्माबाद तालुक्यात एकूण तेरा योजना मंजूर करण्यात आल्या असून, त्यातल्या आठ योजनांची
कामं बंद आहेत. उर्वरित पाच योजनांच्या कामांद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तसंच पाणीपुरवठा
नियमित होत नसलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत त्रिसदस्यीय
चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत येत्या एक महिन्याच्या आत चौकशी केली
जाईल, असं पाटील म्हणाले.
***
लोकप्रतिनिधी,
मंत्र्यांना मिळणाऱ्या धमक्यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक- `एसआयटी`ची स्थापना केली
जाईल, अशी घोषणा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत केली. पर्यटन मंत्री
आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी, बंगळुरूमधून एकाला अटक करण्यात आली
आहे. संबंधित आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचं, त्यांनी सांगितलं.
आरोपीच्या कर्नाटक संबंधावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भारतीय जनता पक्ष
सदस्यांमध्ये खडाजंगी झाली.
***
इतर
मगासवर्गीय - ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत अन्न आणि नागरी
पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच वेळ शाब्दिक
बाचाबाची झाली. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर महाविकास
आघाडी सरकारबं ५० टक्के आरक्षण कायम ठेवत त्यातलं २७ टक्के आरक्षन ओबीसींसाठी असेल,
असा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करणारं विधेयक मंजुरीसाठी
विधानसभेत मांडण्यात आलं. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी
एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. तालिका पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी मध्यस्थी
करत आवाजी मतदानानं हे विधेयक संमत करुन घेतलं.
यानंतर
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी विदर्भ आणि मराठवाडा विभागावर होत असलेला अन्याय तसंच
इतर विषयांवर चर्चा करणारा प्रस्ताव मांडला, यावर चर्चा सुरू करण्यात आली होती.
***
डॉ
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या १२७ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी
१५ दिवसात आरोपपत्र दाखल केलं जाईल, आणि दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च
आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य विक्रम काळे यांनी
यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
***
दहावी
आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर परीक्षा फॉर्म भरण्यासाठी कोणतंही विलंब
शुल्क आकारलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल विधानपरिषदेत
सांगितलं. याबाबत सदस्य विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. चार मार्च
पासून सुरु होणार्या बारावीच्या परिक्षेसाठी तीन मार्च पर्यंत, तर १५ मार्चपासून सुरु
होणार्या दहावीच्या परिक्षेसाठी १४ मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुभा देण्यात
येत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.
***
शासकीय
सेवेच्या कालावधीत भ्रष्टाचार करुन तब्बल ३६ लाखाची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यासह त्याच्या पत्नीला औरंगाबाद जिल्हा आणि सत्र
न्यायालयानं दोन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली
आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सिल्लोड उपविभागाचा उपअभियंता बाळासाहेब देशमुख
याने बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती.
त्यानुसार तपास केला असता देशमुख आणि त्याची पत्नी लक्ष्मीबाई देशमुख यांनी औरंगाबाद
जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचं निदर्शनास आलं .
***
परभणी
जिल्ह्यात पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात साठवणूक केलेल्या शेतमालावर
तारण कर्ज योजने अंतर्गत, गेल्या दोन महिन्यात १०१ शेतकऱ्यांना, सुमारे एक कोटी १२
लाख ६६ हजार ६२६ रूपये तारण कर्ज वितरीत करण्यात आलं आहे. सभापती अनिल नखाते यांनी
ही माहिती दिली. सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यानं सोयाबीनची आवक थांबली होती. योग्य
भाव आल्यास शेतकऱ्यांना सोयाबीनचा माल विक्री करता यावा, यासाठी बाजार समितीच्या गोदामामध्ये
शेतकऱ्यांना सोयाबीन सह शेतमाल साठवणूक करण्याची व्यवस्था केली असल्याचं, त्यांनी सांगितलं.
***
गुड गव्हर्नन्स वीक’ - सुशासन सप्ताहाअंतर्गत काल नांदेडच्या भोकर तालुक्यातल्या
नागापूर इथं, प्रशासन आपल्या गावी, हा उपक्रम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या
अध्यक्षतेखाली पार पडला. गावातील लोकांच्या प्रशासकीय पातळीवर असलेल्या विविध समस्या
आणि कामाचं निराकरण गाव पातळीवरच व्हावं, त्यांना कामांबाबत तालुका आणि जिल्ह्याच्या
पातळीवर जाण्याचं काम पडू नये हा या संकल्पनेचा उद्देश आहे.
***
जालना
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी,
काल आंदोलन केलं. इतर मागास वर्गाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोवर
कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. आंदोलनामुळे
या मार्गावरची वाहतूक काही वेळ विस्कळित झाली होती.
***
No comments:
Post a Comment