Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 19 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या
अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं,
आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी
कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा.. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच
चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
**
मराठवाड्यात नगरपंचायत निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांना संमिश्र यश
**
भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात निकाल राखीव
**
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा
आणि
**
औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुलात सुरक्षेच्या दृष्टीनं अत्याधुनिक सुविधा उभारण्याचे
निर्देश
****
राज्यात
विविध जिल्ह्यांमधल्या ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी
झाली. मराठवाड्यात या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाला संमिश्र यश मिळालं आहे.
जालना
जिल्ह्यात मंठा नगरपंचायतीवर शिवसेना, बदनापूर नगरपंचायततीवर भाजप, घनसावंगी आणि तीर्थपुरी
नगरपंचायततीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व राखलं आहे. तर जाफ्राबाद नगरपंचायतीमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला संमिश्र कौल मिळाला आहे.
नांदेड
जिल्ह्यातल्या अर्धापूर नगरपंचायतीवर सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस पक्षानं सत्ता कायम
राखली आहे. नायगाव नगरपंचायतीत १७ पैकी १७ जागांवर काँग्रेस विजयी झाली तर माहुर नगरपंचायतीत
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.
उस्मानाबाद
जिल्ह्यातील वाशी नगर पंचायतीवर भारतीय जनता पक्ष तर लोहारा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला
सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
बीड जिल्ह्यात आष्टी आणि
पाटोदा नगरपंचायतीत भाजपनं विजय मिळवला आहे. वडवणी नगरपंचायतीत एकूण १७ जागांपैकी भाजपनं
आठ, राष्ट्रवादी काँग्रेसनं सहा, तर तीन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या. केज नगरपंचायतीत
एकूण १७ जागांपैकी भाजप पुरस्कृत आघाडीनं आठ, राष्ट्रवादी काँग्रेसनं पाच, काँग्रेसनं
तीन, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एका जागेवर विजय मिळवला.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या औंढा नगर पंचायतीमध्ये शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली आहे. तर सेनगाव
नगरपंचायतीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.
लातूर
जिल्ह्यात देवणी आणि जळकोट नगरपंचायतीत महाविकास आघाडीने तर शिरूर अनंतपाळ नगर पंचायतीवर
भाजपनं विजय मिळवला आहे. चाकूर नगर पंचायतीमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं
नाही.
परभणीच्या
पालम नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बहुमत मिळवलं आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सोयगाव नगरपंचायतीत १७ पैकी ११ जागांवर शिवेसेनेचा विजय झाला आहे. तर
भारतीय जनता पक्षाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.
****
भाजपच्या
१२ आमदारांच्या निलंबन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. आज सर्वोच्च
न्यायालयात न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय पीठासमोर
ही सुनावणी झाली. न्यायमूर्ती खानविलकर यांनी दोन्ही पक्षांना आठवड्याभरात लेखी स्वरुपात
माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांसोबत गैरवर्तन
केल्यानं या आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. प्रदीर्घ निलंबन हे हकालपट्टीपेक्षा
वाईट असून, आमदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारं असल्याचं, आमदारांचे वकील
महेश जेठमलानी, तसंच मुकूल रोहतगी यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय
मंत्रिमंडळाने भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजेन्सी - आयआरईडीए मध्ये दीड हजार कोटी रुपये
गुंतवणुकीला मंजूरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण
मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निर्णयामुळे
आयआरईडीए च्या माध्यमातून नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी १२ हजार कोटी रुपये कर्ज उपलब्ध
होऊ शकणार आहे. या क्षेत्रात दरवर्षी सुमारे दहा हजारापेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होतील,
असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय
सफाई कर्मचारी आयोगाला ३१ मार्च २०२२ नंतर तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णयही
केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला.
निर्दीष्ट
कर्ज खात्यांमध्ये सहा महिन्यांसाठी चक्रवाढ व्याज आणि सामान्य व्याजातल्या फरकाची
रक्कम देणाऱ्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या निर्णयामुळे
वित्तीय संस्थांना अशा दाव्यांसाठी सुमारे ९७३ कोटी रुपये निधी देण्यासही मंत्रिमंडळाने
मंजुरी दिली. कोविड प्रादुर्भावाच्या संदर्भात मंत्रिमंडळाने ऑक्टोबर २०२० मध्ये या
अनुग्रह निधी योजनेला मंजुरी दिली आहे.
****
मराठी
वृत्तपत्रांमधील, विशेषतः पुरवण्यांमधील लेख अतिशय अभ्यासपूर्ण आणि अभिरुचीसंपन्न असल्याचं
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. हे समृद्ध साहित्य आणि लेख हिंदी भाषिकांसाठी
उपलब्ध करण्यासाठी राज्यातील पत्रकार, साहित्यिक तसंच मुंबई हिंदी सभेनं पुढाकार घ्यावा,
असं आवाहन राज्यपालांनी केलं. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेनं १९४४ साली सुरु झालेल्या
मुंबई हिंदी सभा या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या
प्रमुख उपस्थितीत आज राजभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते.
****
नंदुरबार
बस आगारातील दोन संपकरी कर्मचाऱ्यांचा आज एकाच दिवशी ह्रदयविकाराच्या धक्यानं मृत्यू
झाला. ह्या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला एसटी महामंडळाकडून होत असलेला त्रासच जबाबदार
असल्याचा आरोप करत, या दोन्ही मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची
मागणी, आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
****
भारत
आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं भारतासमोर
२९७ धावांचं आव्हान दिलं आहे. यजमान संघानं नाणेफेक जिंकून निर्धारित षटकांत चार बाद
२९६ धावा केल्या. भारताच्या जसप्रित बुमराहनं दोन तर रविचंद्रन अश्विननं एक बळी घेतला.
****
भारताची
आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. चालू वर्षातला टेनिस
स्पर्धांचा हंगाम आपला शेवटचा हंगाम असेल, असं सानियाने म्हटलं आहे. ३५ वर्षीय सानियाने
आतापर्यंत सहा ग्रॅण्डस्लॅम जिंकले असून, जागतिक टेनिस संघटनेच्या दुहेरीच्या क्रमवारीत
अव्वल स्थानही मिळवलेलं आहे.
दरम्यान,
ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत महिला दुहेरीच्या प्राथमिक फेरीतच सानिया आणि तिची युक्रेनियन
जोडीदार नादिया किचेनोक यांना आज पराभवाचा सामना करावा लागला. स्लोवेनियाच्या महिला
जोडीनं सानिया किचेनोक जोडीचा ६-४, ७-६ असा पराभव केला
****
औरंगाबाद
विभागीय क्रीडा संकुलात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रवेशव्दारापासून ते संकुलातील
प्रत्येक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं अत्याधुनिक सुविधा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. आज क्रीडा संकुलाची पाहणी केल्यानंतर
ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment