Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना
खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात
मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित
राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा
आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय
हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·
राज्यात सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय.
·
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे
सर्वाधिक रुग्ण.
·
ब्राम्होस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
आणि
·
औरंगाबाद जिल्ह्यात लग्न समारंभात कोविड नियमांच्या निर्देशांसह
बँड पथकाला परवानगी.
****
येत्या
सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरु करायला परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याच्या
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वच स्तरांतून
मागणी होत होती. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोना विषाणू
संसर्ग प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून सोमवारपासून शाळा सुरू होतील, असं त्यांनी आज प्रसिद्धी
माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्या म्हणाल्या –
पालक वर्ग, स्कूल मॅनेजमेंट
कमिटी, शिक्षक, मुख्यध्यापक असतील आणि तिथलं स्थानिक प्रशासन असेल यांच्या माध्यमातून
स्थानिक लेव्हलला जे आहे ते यासंदर्भामधले निर्णय घेतले जातील. ज्याठिकाणी कोरोनाची
संख्या कमी असेल अशा ठिकाणी पूर्णपणे कोरोनाचा प्रोटोकॉल पाळून आम्ही ज्या एसओपीज ज्या
दिल्या आहेत त्या काटेकोर पद्धतीने पालन करुनच या शाळा २४ तारखेपासून सुरु केल्या जातील.
मग ते पहिली ते बारावी असेल आणि प्री प्रायमरी एज्यूकेशन या दोन्हीच्या बाबतीत सुद्धा
हा निर्णय झालेला आहे. या शाळा आता सुरु करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी
संमती दिली आहे.
दरम्यान,
राज्यातली महाविद्यालयं सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करणार
असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. महाविद्यालयं
सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र,
कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण सध्या सापडत
असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली.
देशात सध्या रुग्ण सापडण्याचं प्रमाण १६ टक्क्यांवर पोहचलं आहे. पाचशे पंधरा जिल्ह्यांमध्ये
रुग्ण सापडण्याचं प्रमाण पाच टक्क्यांहून अधिक आहे. देशात सरासरी दोन लाख ७१ हजार रुग्ण
सध्या सापडत आहेत. सध्या सुरू तिसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचं प्रमाण कमी आहे. प्रतिबंधात्मक
लसीकरणामुळं हे प्रमाण कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात आतापर्यंत १६० कोटींहून
अधिक लस मात्रा देण्यात आल्या असून ८८ कोटींहून अधिक नागरिकांना लसीची पहिली मात्रा
देण्यात आली आहे. देशात या संसर्गाच्या सुमारे १९ लाख रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याचंही
या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
भारतानं
आज `ब्राह्मोस` या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी
घेतली. ओडिशाच्या चांदीपूर इथं ही चाचणी घेण्यात आली. भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या
बनवलेलं हे क्षेपणास्त्र जगातल्या सर्वोत्तमपैकी एक आहे. तिन्ही संरक्षण दलांसाठी या
क्षेपणास्त्रांच्या विविध आवृत्त्यांची निर्मिती करण्यात आली असून या क्षेपणास्त्राला
सातत्यानं अद्यावत केलं जातं. पाणबुडी, जहाज तसंच विमानातून किंवा जमिनीवरून याचा मारा
करता येतो.
****
नागपूर
शहराचा उपराजधानीचा दर्जा लक्षात घेता मागणीप्रमाणे भरीव निधी देण्याचा राज्य शासनाचा
प्रयत्न असेल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
त्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनेची
सभा आज ऑनलाइन पद्धतीनं झाली. या बैठकीत पवार बोलत होते.
****
वीज
देयकाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणार असल्याचे बनावट संदेश पाठवून वीज ग्राहकांची
फसवणूक करणाऱ्यांविरोधात फौजदारी कार्यवाही करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार
दाखल करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिले.
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना यावर कार्यवाहीच्या सूचना त्यांनी
केल्या. अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये, असं आवाहनही त्यांनी ग्राहकांना केलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात लग्न समारंभात कोविड नियमांच्या निर्देशांसह बँड पथकाला परवानगी देण्यात
आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या संदर्भातले निर्देश आज दिले. बँड व्यावसायिक,
वादक, कलाकार यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन ही विशेष परवानगी देण्यात येत आहे.
मात्र, यासाठी बँड पथकाच्या सदस्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असणं बंधनकारक
आहे. बँड पथकानं लग्न समारंभात आंतर राखून बँड वाजवावा, बँड मालकानं पथकासाठी ताप मापक,
निर्जंतुकीकरण सोबत ठेवावे आणि वेळोवेळी कोविड चाचणी करण्यात यावी, असं जिल्हाधिकारी
चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
पाण्याचा
शास्वत स्रोत असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरी म्हणजे पाण्याचं एटीएम असून सदर विहिरींची
कामं तात्काळ पूर्ण करावीत असं आवाहन परभणी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद
टाकसाळे यांनी केलं. जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील गौर या गावात विहिरी आणि सार्वजनिक
शौचालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना नरेगा अंतर्गत
विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत त्यांनी कुठलाही विलंब न करता सदर विहिरींची कामं
तात्काळ पूर्ण करण्या बाबत आवाहन टाकसाळे यांनी केलं.
****
हिंगोली
जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दुर करावा तसंच कयाधू नदीवर बंधारे बांधावे या प्रमुख मागण्यांसाठी
सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी आज सालेगाव इथल्या कयाधू नदीपात्रात
उपोषण सुरु केलं. अनेक गावकऱ्यांनीही या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
****
मध्य
रेल्वेनं हडपसर-नांदेड जलद रेल्वेला एक अतिरिक्त वातानुकुलीत तृतीय श्रेणीचा डबा कायमस्वरूपी
जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हजूर साहिब नांदेड-हडपसर या गाडीमध्ये नांदेडहून येत्या
२३ तारखेपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हडपसर-हजूर साहिब नांदेड गाडीमध्ये
हडपसरहून येत्या २४ तारखेपासून हा डबा कायमस्वरुपी जोडला जाणार असल्याचं मध्य रेल्वेतर्फे
कळवण्यात आलं आहे.
****
भारताची
सानिया मिर्झा तसंच राजीव राम यांच्या जोडीनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मीश्र
दुहेरीमध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.
****
No comments:
Post a Comment