Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना
खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात
मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित
राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा
आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय
हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
** आकांक्षित जिल्हे देशाच्या
विकासाला गती देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
** प्रजासत्ताक दिनानिमित्त
झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक
** राज्यात वैद्यकीय महाविद्यालयातील
अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय
आणि
** उस्मानाबादचे डॉक्टर सुनील
जाधव यांना नॅनो सॅटॅलाइट मधील डिझाईनचे पेटंट
****
आकांक्षित जिल्हे देशाच्या
प्रगतीतले अडथळे दूर करून देशाच्या विकासाला गती देत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या जिल्ह्यांचा गौरव केला आहे. देशभरातल्या आकांक्षित जिल्ह्यांच्या
जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आज संवाद साधला त्यावेळी
ते बोलत होते. आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संपर्क
असणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसहभाग आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त
वापर केलेल्या जिल्ह्यांची कामगिरी उत्तम असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांनी
पुढच्या दोन वर्षांसाठी आपआपल्या जिल्ह्यांकरता एक आराखडा निश्चित करावा तसंच कोणतीही
दहा काम निश्चित करुन ती पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावं, अशी सूचनाही मोदी यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व केंद्रीय मंत्रालयं, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री याचं सहकार्य
घेऊन आपआपल्या जिल्ह्यांचा विकास साधावा असं आवाहनही, मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी
यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. उस्मानाबाद, हिंगोली,
नंदुरबार, गडचिरोली, सिंधुदुर्ग, वाशिम, आणि यवतमाळ या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यावेळी
उपस्थित होते.
****
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली इथं झालेल्या आंतरराज्यीय
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. एकूण
पंधरा संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचं अप्रतिम
सादरीकरण केलं. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी विजयी संघ आणि सांस्कृतिक
कार्य विभागाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या मुख्य
सोहळ्यात,"महाराष्ट्रातील जैवविविधता आणि जैव मानके" या विषयावरचा चित्ररथ
सहभागी होणार आहे.
****
मंत्रिपदाच्या शपथेचा भंग
केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावं आणि मंत्र्यांवर
गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षानं राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी
राज्यपालांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन त्यांना सादर केलं. अवैध बांधकामाबद्दलचा
दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना
वैयक्तिक लाभ करून दिला असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. सरकार स्थापन करताना
मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना कोणाही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक लाभ
करून देणार नाही, अशी शपथ घेतलेली असते, राज्य सरकारने या
शपथेचा भंग केल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
****
वैद्यकीय
शिक्षण विभागामार्फत राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी
प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री
अमित देशमुख यांनी दिली. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत
वाढ करण्यात आलेल्या महाविद्यालयात, मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर
चॅरीटेबल रुग्णालय, यवतमाळ इथल्या श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
अंबाजोगाई इथले स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरच्या
राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरच्या इंदिरा गांधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि
पुण्यातल्या बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवडक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
****
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री
कीर्ती शिलेदार यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
होणार आहेत. त्यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं, त्या ७१ वर्षांच्या होत्या. संगीत रंगभूमीलाच आपला
श्वास, ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड
गेली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कीर्ती
शिलेदार यांच्या निधनाने मराठी रंगभूमीला समर्पित महान कलावंत आपण गमावला असल्याची
भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
****
कोल्हापूर
जिल्ह्यातल्या कागल इथले म्हाकवेतील भारतीय सैन्यदलातील जवान राकेश बाळासाहेब निंगुरे
यांचा चंदीगड इथं हृदयविकारानं मृत्यू झाला. ते ३३ वर्षांचे होते. ते हवालदार या पदावर कार्यरत
होते. उद्या सकाळी त्यांचे पार्थिव बानगे या त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे.
त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.
****
मुंबईत ताडदेव भागातल्या एका
२० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा होरपळून
मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. आज सकाळी ही घटना घडली. अग्निशमन
दलाच्या १३ गाड्यांच्या सहाय्यानं आग विझवण्यात आली. आग
लागलेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकले आहेत का, याचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी
सांगितलं.
****
उस्मानाबादच्या
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुनील जाधव यांना
नॅनो सॅटॅलाइट मधील डिझाईनचे पेटंट मिळालं आहे. प्राध्यापक डॉक्टर सुनील जाधव यांनी
नॅनो सेटलाईट मधील साईड वॉल डिझाईन या विषयातील पेटंट मिळवण्यासाठी भारत सरकारच्या
पेटंट कार्यालयाकडे अर्ज केला होता. नॅनो सॅटॅलाइटचा उपयोग हवामान, शेती आणि इतर संबंधित
विविध सेवांसाठी केला जातो.
****
No comments:
Post a Comment