Tuesday, 18 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात ९३ नगरपंचायतीतल्या ३३६ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात आज शांततेत मतदान सुरु आहे. या नगरपंचायतींमध्ये मराठवाड्यात जालना जिल्ह्यातल्या बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी, बीड जिल्ह्यातल्या केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर जिल्ह्यातल्या जळकोट, चाकूर, देवणी, आणि शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी आणि लोहारा, नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव, अर्धापूर, तसंच माहूर, हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव, आणि औंढा-नागनाथ, औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव, तर परभणी जिल्ह्यातल्या पालम नगर पंचायतीचा समावेश आहे.

जालना जिल्ह्यात सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत जवळपास १५ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या १० जागांसाठी, तर सांगली -मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची उद्या मोजणी होणार आहे.

****

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, यांनी एन डी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. पाटील यांचं काल कोल्हापुरात एका खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १५८ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ७९ लाख ९१ हजार २३० नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १५८ कोटी चार लाख ४१ हजार ७७० मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५० लाख ८४ हजार ४१० पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे. 

दरम्यान, देशात काल नव्या दोन लाख ३८ हजार १८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३१० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ७६ लाख १८ हजार २७१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ८६ हजार ७६१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काल एक लाख ५७ हजार ४२१ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ५३ लाख ९४ हजार ८८२ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, १७ लाख ३६ हजार ६२८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

****

देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा विनामूल्य पुरवठा करून केंद्र सरकार सहकार्य करत आहे. केंद्र सरकार कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्यात, देशातल्या लस उत्पादकांकडून ७५ टक्के लसींची खरेदी करून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा मोफत पुरवठा केला जात आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत लसींच्या १५८ कोटी १६ लाखांपेक्षा अधिक मात्रा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. १३ कोटी २५ लाखांपेक्षा अधिक न वापरलेल्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप शिल्लक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या ४०० वर्ष जुन्या मेहमूद दरवाज्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू झालं आहे. यामध्ये दरवाजाची डागडुजी करून त्याला नवीन रूप देण्याचं काम करण्यात येत आहे. यासाठी स्मार्ट सिटी नं एकूण ३८ लाखांची निविदा काढली आहे. चार महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्णत्वास येणार असल्याची माहिती औरंगाबाद स्मार्ट सिटी च्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी दिली. औरंगाबादचं मुख्य आकर्षण बीबी का मकबरा आणि पानचक्की कडे जाण्याचा हा मुख्य मार्ग असल्यानं या दरवाजाचं नूतनीकरण करून त्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं बक्षी यांनी सांगितलं.

****

विनापरवाना ऊस गाळप केल्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या दोन कारखान्यांवर कारवाई करण्यात आली. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही कारवाई करत, शिराळा इथल्या विश्वास कारखान्याला सात कोटी ५७ लाख रुपये, तर वाळवा इथल्या हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याला चार कोटी १३ लाख रुपये दंड ठोठावला.

****

लखनौ इथं आजपासून सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिचा आज पहिल्या फेरीत तान्या हेमंत हिच्याबरोबर सामना होणार आहे. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या सिंधू हिला ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 28 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 28 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...