Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१८ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.
****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत १५० कोटी मात्रा देण्याचा विक्रम करत देश
या मोहिमेत पुढे वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता
वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व
मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित
राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा
आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण
०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
राज्यात ९३ नगरपंचायतीतल्या ३३६ जागांसाठी आज मतदान
·
ओमायक्रॉनचे राज्यात १२२ नवे रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यातल्या
१४ रुग्णांचा समावेश
·
कोविड संसर्गाचे ३१ हजार १११ नवे रुग्ण, मराठवाड्यात तीन
जणां मृत्यू तर एक हजार ७६२ बाधित
·
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. एन.
डी. पाटील यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार
·
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचा संप बेकायदेशीर असल्याचा
कामगार न्यायालयाचा निर्वाळा
आणि
·
रासायनिक खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करण्याचं कृषीमंत्री
दादाजी भुसे यांचं विक्रेत्यांना आवाहन
****
राज्यात
९३ नगरपंचायतीतल्या ३३६ जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. इतर मागास
वर्गासाठीच्या आरक्षित जागा वगळता, उर्वरित जागांसाठी गेल्या महिन्यात पहिल्या टप्प्यात
मतदान झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे अनारक्षित
झालेल्या या जागांसाठी आज सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत मतदान होणार
आहे.
राज्याच्या
विविध जिल्ह्यांतल्या १९५ ग्रामपंचायतींमधल्या २०९ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी,
भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या १० जागांसाठी, तर सांगली
-मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान होत
आहे. मतमोजणी उद्या १९ तारखेला होणार आहे.
आज
मतदान होत असलेल्या नगरपंचायतींमध्ये मराठवाड्यात जालना जिल्ह्यातल्या बदनापूर, जाफ्राबाद,
मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी, बीड जिल्ह्यातल्या केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, तसंच
आष्टी, लातूर जिल्ह्यातल्या जळकोट, चाकूर, देवणी, आणि शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद -
वाशी आणि लोहारा, नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव, अर्धापूर, तसंच माहूर, हिंगोली जिल्ह्यातल्या
सेनगाव, आणि औंढा-नागनाथ, औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव, तर परभणी जिल्ह्यातल्या पालम
नगर पंचायतीचा समावेश आहे.
नांदेड
जिल्ह्यातल्या नायगाव, अर्धापूर, माहूर नगरपंचायतीतल्या ११ जागांसाठी नऊ हजार ८३२ मतदार
आपला मतदान करतील. सर्व मतदारानी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा,
असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे.
****
राज्यात
काल ओमायक्रॉनचे १२२ रुग्ण आढळले. यापैकी ४१ रुग्ण पुणे जिल्ह्यातले असून, मीरा भाईंदर
२९, नागपूर २६, औरंगाबाद १४, अमरावती सात, मुंबई तीन, तर भंडारा आणि ठाण्यातल्या प्रत्येकी
एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद
मध्ये आढळलेल्या सर्व रुग्णांचे अहवाल आता निगेटिव्ह असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची
माहिती, महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
राज्यातल्या
ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या एक हजार ८६० झाली आहे. यापैकी ९५९ रुग्ण संसर्गमुक्त
झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे ३१ हजार १११ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ७२ लाख ४२ हजार ९२१ झाली आहे. काल २४ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
आठशे ३२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९५ शतांश टक्के झाला आहे. काल २९ हजार ९२
रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६८ लाख २९ हजार ९९२ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ३ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
दोन लाख ६७ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल एक हजार ७६२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन, तर लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा
समावेश आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल ४४३ रुग्ण आढळले. त्यात महानगरपालिका क्षेत्रातले ३३०, तर ग्रामीण भागातले
११३ रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात ४२०, लातूर ४१०, बीड १२९, जालना १०९, परभणी १०४,
उस्मानाबाद ९१, तर हिंगोली जिल्ह्यात काल ५६ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
सध्या
सुरू असलेल्या कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यात आरोग्य यंत्रणा गुंतली असली
तरी मधुमेह, रक्तदाब, कर्करोग आणि तत्सम दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांकडे
या काळात दुर्लक्ष होऊ देऊ नये, गर्भवती महिलांकडेही तेवढ्याच गांभीर्यानं पाहिलं जावं,
असं आवाहन करणारं पत्र केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना
पाठवलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात अन्य आजारी रुग्णांच्या उपचाराची गैरसोय होणार नाही
आणि त्यातून त्यांचा मृत्यू दर वाढणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात
आली आहे.
दरम्यान,
कोविडची बाधा झालेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना क्षयरोग असेल तर अशा नागरिकांची नोंद
अती जोखमींच्या रुग्णांमध्ये करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबतच्या
नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये केली आहे.
****
राज्यातल्या
कोविड रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत
चर्चा होणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांच्या सतत संपर्कात
राहण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यासह शहरात गृह विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांशी महापालिकेच्या नियंत्रण
कक्षातून नियमितपणे संपर्क साधला जात असल्याचं, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
यांनी सांगितलं आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ते काल बोलत होते.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार, सर्व यंत्रणांनी
काम करावं, आणि कोविड लसीची दुसरी मात्रा प्रलंबित असलेल्या नागरिकांनी लसीकरण पूर्ण
करून घ्यावं, असं आवाहनही जिल्हाधिकार्यांनी यावेळी केलं.
****
शेतकरी
कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. एन. डी. पाटील यांचं काल कोल्हापुरात
एका खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज
कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहे. कोविड
नियमांनुसार फक्त २० जणांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्यानं,
सकाळी आठ ते दुपारी दोन दरम्यान गर्दी न करता अंत्यदर्शन घेण्याचं आवाहन त्यांच्या
कुटुंबियांनी केलं आहे.
एन.
डी. पाटील यांच्या निधनानं शेतकरी आणि कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपल्याची प्रतिक्रिया,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. बेळगावसह सीमा भाग अखंड महाराष्ट्रात
यावा हा त्यांचा ध्यास होता, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी एन डी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. शिक्षण, समाजकारण
आणि राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण
मुकलो आहोत, अशा शब्दात राज्यपालांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या शोक संदेशात, राज्यातल्या शेतकरी,
कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ
आणि निस्वार्थी नेता हरपला, असं म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री
अजित पवार, विधानसभेतले विरोधी पक्षनेते, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, यांनीही एन डी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण
केली आहे.
****
राज्य
परिवहन महामंडळ- एसटी कामगारांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा कामगार न्यायालयानं
दिला आहे. या निकालानुसार आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक दंड ठोठावण्याची परवानगी
एसटी प्रशासनाला मिळणार आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आतापर्यंत एसटी प्रशासनानं
केलेल्या सर्व कारवायाही वैध ठरणार असल्याचंही न्यायालयानं म्हटल्याची माहिती, महाराष्ट्र
एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस, श्रीरंग बरगे यांनी दिली.
****
रासायनिक
खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा, असं आवाहन
कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी रासायनिक खत विक्रेत्यांना केलं आहे. सध्या राज्यात रब्बी
आणि ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत. ऊस, फळबागा, भाजीपाला गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून
खताची मागणी वाढत आहे. याबाबत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष ठेवण्याच्या
सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
****
भारतीय
जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं काल
फेटाळला. शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कणकवली
इथल्या सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी
उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयानं मनीष दळवीला अटकपूर्व
जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान,
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी २७ जानेवारीपर्यंत
मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत राणेंवर कारवाई करणार नाही, अशी हमी पोलिसांनी दिली
आहे.
****
राज्यातल्या
शाळा ५० टक्के क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी द्यावी, तसंच आरटीईची थकीत रक्कम तातडीने
वितरीत करावी आदी मागण्यांसाठी, महाराष्ट्र इंग्रजी स्कूल असोसिएशन - मेसा संघटनेतर्फे,
काल औरंगाबाद इथल्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर, काळे कपडे परिधान करुन निदर्शनं
करण्यात आली. या मागण्यांचं निवेदन शिक्षण विभागाला देण्यात आलं. कोविड साथीमुळे ५०
टक्के क्षमतेने उपहारगृह, मॉल, नाट्यगृह, चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आली आहे.
त्याप्रमाणेच ५० टक्के क्षमतेने दिवसाआड किंवा दुबार सत्रात शाळा सुरु करण्याची परवानगी
देवून, विद्यार्थ्यांचं होत असलेलं नुकसान टाळावं, २५ जानेवारीपूर्वी शाळा सुरु करण्यास
शासनाने परवानगी द्यावी, अन्यथा २७ जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात येतील असा इशारा
संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे.
****
औरंगाबाद
शहरात कोविड आणि ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचं निमित्त साधून प्रशासन मनमानी कारवाई करत
असल्याचा आरोप, जिल्हा व्यापारी महासंघानं केला आहे. महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल
यांनी काल महासंघाच्या बैठकीनंतर प्रशासनाच्या या कारवाई विरोधात कठोर पावलं उचलण्याची
गरज व्यक्त केली. कोविड नियम भंग करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून दुकान
सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचं जैस्वाल यांनी सांगितलं.
****
भारतीय
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संत ज्ञानेश्वरांच्या ७२५ व्या संजीवन जन्मशताब्दीच्या
निमित्तानं, काल उस्मानाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं, जिल्हास्तरीय
प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाची प्राथमिक फेरी घेण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक
राजेंद्र अत्रे यांच्या हस्ते या विद्यार्थी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. या साहित्य
संमेलनात, विविध महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी काव्य सादरीकरण, तसंच स्वच्छता
अभियान या विषयावरच्या नाटकांचं सादरीकरण केलं.
****
परभणी
जिल्ह्यात हर घर नल से जल, या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातल्या नागरिकांना नळाद्वारे
५५ लिटर पिण्याचं पाणी मिळावं, म्हणून केंद्र शासनाच्या वतीनं सुरु असलेला जल जीवन
मिशन कार्यक्रम, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी
करण्यासाठी, जिल्ह्यातले सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीमधल्या कर्मचाऱ्यांसाठी
प्रशिक्षण शिबीराचं उद्घाटन करताना ते बोलत होते. हे शिबीर चार दिवस चालणार आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- पोकरा या योजनेत, एक हजार १७५ नवीन
गावांचा समावेश झाल्याची समाजमाध्यमांवर फिरत असलेली यादी चुकीची असल्याचं, जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकार्यांनी कळवलं आहे. जिल्ह्यात पूर्वी निवडलेल्या ४०६ गावांमध्ये
कोणतीही भर पडली नसल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment