Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यात
विविध जिल्ह्यांमधल्या ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी
होत आहे.
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या वाशी नगरपंचायतीच्या १७ पैकी दहा जागांवर भारतीय जनता पक्षानं, तर सात
जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला. लोहारा नगरपंचायतीत शिवसेनेनं सहा, काँग्रेसनं तीन,
राष्ट्रवादी काँग्रेसनं एक, तर दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या.
बीड जिल्ह्यात
आष्टी आणि पाटोदा नगरपंचायतीत भाजपनं विजय मिळवला आहे. पाटोदा नगरपंचायतीत एकूण १७
जागांपैकी भाजपनं नऊ, सुरेश धस आघाडीनं सहा, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं
प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. आष्टी नगरपंचायतीत भाजपनं १४, राष्ट्रवादी काँग्रेसनं
दोन, तर काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारानं प्रत्येकी एक जागा जिंकली. वडवणी नगरपंचायतीत
एकूण १७ जागांपैकी भाजपनं आठ, राष्ट्रवादी काँग्रेसनं सहा, तर तीन जागा अपक्ष उमेदवारांनी
जिंकल्या. केज नगरपंचायतीत एकूण १७ जागांपैकी भाजप पुरस्कृत आघाडीनं आठ, राष्ट्रवादी
काँग्रेसनं पाच, काँग्रेसनं तीन, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एका जागेवर विजय मिळवला.
नांदेड जिल्ह्यातल्या
नायगाव नगर पंचायतीत १७ पैकी १७ जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला. अर्धापूर नगरपंचायतीत
१७ पैकी १० जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला. एमआयएमनं तीन, भाजपनं दोन, तर राष्ट्रवादी
काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारानं प्रत्येकी एक जागा जिंकली. माहूर नगरपंचायतीत एकूण १७
जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं सात, काँग्रेसनं सहा, शिवसेनेनं तीन, भाजपनं एका
जागेवर विजय मिळवला.
हिंगोली
जिल्ह्यातल्या औंढा नगर पंचायतीमध्ये नऊ जागा जिंकत शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली
आहे. इथे काँग्रेसला चार, तर वंचित बहुजन आघाडी आणि भाजपला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.
सेनगाव नगरपंचायतीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस,
शिवसेना आणि भाजपनं प्रत्येकी पाच, तर काँग्रेसनं दोन जागा जिंकल्या.
लातूर जिल्ह्यातल्या
जळकोट नगरपंचायतीत एकूण १७ जागांपैकी काँग्रेसनं सात, राष्ट्रवादी काँग्रेसनं चार,
शिवसेनेनं दोन, भाजपनं एक, तर अपक्ष उमेदवारांनी तीन जागा जिंकल्या.
****
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १५८ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ७६ लाख ३५ हजार
२२९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १५८ कोटी ८८ लाख ४७ हजार ५५४
मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
कुष्ठरोग
पीडितांच्या कल्याणासाठी आणि कुष्ठरोग विषयक जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करावे असं
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं सरकारला सांगितलं आहे. देशात ९० पेक्षा जास्त कायद्यातल्या
तरतुदींमधे कुष्ठरोगपीडितांबाबत दुजाभाव केलेला आढळतो, ही त्रुटी कालबद्ध रीतीनं दूर
करावी, कुष्ठरोगाची लागण झालेल्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध करुन
देणारी हेल्पलाईन सुरु करावी अशा सूचना आयोगानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना दिल्या
आहेत.
****
महाराष्ट्रातील
वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय रुग्णालय समुदायानं महाराष्ट्राला
सहकार्य करावं, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. या संदर्भातल्या
बैठकीत ते काल बोलत होते. राज्यात सुपरस्पेशालिटी रुग्णालयं, चांगल्या वैद्यकीय सेवा-सुविधांचे
जाळे विकसित करणं आणि या सेवा सर्वसामान्यांना किफायतशीर दरात उपलब्ध करणं, यावर या
बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
आतापर्यंत
आलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध झाली असल्याचं मत, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ.कैलास अंभुरे यांनी
व्यक्त केलं आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त औरंगाबाद इथल्या श्री सरस्वती
भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित, “मराठी भाषा आणि तंत्रज्ञान”,
या विषयावर व्याख्यान देतांना ते आज बोलत होते. विकिपीडियावर जास्तीत जास्त मराठी मजकूर
उपलब्ध झाला आहे, गुगल प्ले स्टोरवर लाखोंच्या घरात मराठी अप्लीकेशन्स आहेत, यामुळे
भाषेसाठी असणारा अडथळा मोठ्या प्रमाणात दूर होत असल्याचं अंभुरे म्हणाले.
****
औरंगाबाद
नजिक करमाड ते चिकलठाणा सेक्शन मधील रेल्वे रुळांचं नवीनीकरण करण्यासाठी, २६ फेब्रुवारी
पर्यंत आठवड्यातून तीन दिवस तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार,
बुधवार आणि शनिवारी औरंगाबाद - हैदराबाद एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून नियमित
वेळेऐवजी सुमारे दोन तास उशिरा, म्हणजेच सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांनी सुटेल. तर
काचीगुडा - रोटेगाव विशेष गाडी जालना ते करमाड दरम्यान ४० मिनिटं उशिरा धावेल, असं
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
भारत आणि
दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज पार्ल इथं
खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment