Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१९ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.
****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं
ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं,
आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा,
दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी चाचण्या वाढवण्याच्या केंद्र
सरकारच्या राज्यांना सूचना
·
राज्यात काल एकही ओमायक्रॉन संसर्ग झालेला रुग्ण आढळला नाही,
कोविड संसर्गाचे ३९ हजार २०७ रुग्ण तर मराठवाड्यात दोन हजार ५८९ बाधित
·
राज्यात ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी सरासरी ८१ टक्के मतदान
·
मुंबईत नौदलाच्या आयएनएस रणवीर युद्धनौकेवर स्फोट झाल्यानं
तीन सैनिकांचा मृत्यू
·
राज्यभर गाजलेल्या बाल हत्याकांडातल्या दोषी गावित भगिनींच्या
फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर
आणि
·
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज पहिला एकदिवसीय क्रिकेट
सामना
****
देशात
करोना प्रादुर्भाव वाढत असताना गेल्या काही दिवसांमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत
चाचण्यांमध्ये घट झाल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे़. कोविड चाचण्या वाढवण्याच्या
सूचना देत बाधितांवर वेळेत उपचाराद्वारे कोविड प्रसार रोखण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं राज्यांना दिले आहे़त. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त
सचिव आरती आहुजा यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवलं आहे़. कोविडची
लागण झाल्याचं सुरुवातीच्या टप्प्यातच समजल्यानंतर रुग्णाचं तात्काळ विलगीकरण आणि उपचार
करणं आवश्यक असतं, शिवाय, चाचण्यांमुळे प्रतिबंधित क्षेत्र निश्चितीकरणाबरोबरच रुग्ण
संपर्कातल्या व्यक्तींना शोधून संभाव्य कोविड प्रसार रोखण्यास मदत होते, असं त्यांनी
या पत्रात म्हटलं आहे.
एखाद्या
रुग्णांमध्ये तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असेल, तर त्याने तातडीने क्षयरोगाची
चाचणी करुन घेणं आवश्यक आहे. नवीन नियमानुसार क्षयरोगाच्या रुग्णांचा देखील अतिजोखमीच्या
रुग्णांमध्ये समावेश करण्यात आला असून, अशा रुग्णांवर लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचंही
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात
काल एकही ओमायक्रॉन संसर्ग झालेला रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची
संख्या एक हजार ८६० असून, यापैकी १ हजार १ रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून
सुटी देण्यात आली.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे ३९ हजार २०७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ७२ लाख ८२ हजार १२८ झाली आहे. काल ५३ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
आठशे ८५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९४ शतांश टक्के झाला आहे. काल ३८ हजार ८२४
रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६८ लाख ६८ हजार ८१६ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या दोन लाख ६७ हजार ६५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल दोन हजार ५८९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात काल ८५६ रुग्णांची
नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ७०१, तर ग्रामीण भागातले १५५ रुग्ण आहेत.
लातूर जिल्ह्यात ५१०, नांदेड ४५१, परभणी २०३, उस्मामाबाद १८२, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात
प्रत्येकी १४४, तर जालना जिल्ह्यात ९९ रुग्णांची नोंद झाली.
****
राज्यात
विविध जिल्ह्यांमधल्या ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी काल सरासरी ८१ टक्के मतदान झालं. इतर मागास वर्गासाठीच्या आरक्षित जागा
वगळता, उर्वरित जागांसाठी गेल्या महिन्यात पहिल्या टप्प्यात मतदान झालं आहे. दोन्ही
टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी आज होणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या
२३ आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या ४५ जागांसाठी काल ७३ टक्के मतदान झालं.
मराठवाड्यात
जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यात मतदान प्रक्रिया
शांततेत पार पडली.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सोयगाव नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी ८४ पूर्णांक ६५ टक्के मतदान
झालं.
जालना
जिल्ह्यातल्या बदनापूर, जाफराबाद, मंठा, घनसावंगी आणि तीर्थपुरी या नगरपंचायतींच्या
प्रत्येकी चार जागांसाठी, ८३ पूर्णांक ४८ शतांश टक्के मतदान झालं.
बीड
जिल्ह्यातल्या केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, तसंच आष्टी या पाच नगर पंचायतीतल्या
वीस जागांसाठी, सरासरी ८० ते ८५ टक्के मतदानाची नोंद झाली.
नांदेड
जिल्ह्याच्या अर्धापूर नगर पंचायतीसाठी ८१ पूर्णांक ६५ शतांश, माहूर नगर पंचायतीसाठी
७८ पूर्णांक १८ शतांश, तर नायगाव नगर पंचायतीसाठी, ७८ पूर्णांक ४४ शतांश टक्के मतदान
झालं.
हिंगोली
जिल्ह्यात सेनगाव तसंच औंढा नगर पंचायतींसाठी सरासरी ८८ टक्के मतदान झालं. या सर्व
ठिकाणी आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरूवात होणार आहे.
गडचिरोली
जिल्ह्यातल्या अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा आणि कुरखेडा या पाच नगर पंचायतींमधल्या
११ जागांसाठी काल सरासरी ८५ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान नोंदवलं गेल. मतमोजणी उद्या
२० जानेवारीला होणार आहे.
****
भारतीय
नौदलाच्या आयएनएस रणवीर या युद्धनौकेवर स्फोट झाल्यानं तीन सैनिकांचा मृत्यू झाला,
तर ११ जण जखमी झाले. मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डवर काल संध्याकाळी साडे चार वाजेच्या
सुमारास ही घटना घडली. जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोट अंतर्गत
भागात झाला असून, विनाशिकेवरील शस्त्रास्त्र भंडार सुरक्षित असल्याचं, नौदलाच्या अधिकार्यांनी
सांगितलं. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आयएनएस रणवीर नोव्हेंबर २०२१ पासून पूर्व नौदल कमांडकडून
क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती.
****
राज्यभरात
गाजलेल्या बाल हत्याकांडातल्या दोषी गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत
झालं आहे. या भगिनींच्या दया याचिकेवर सरकारनं लवकर निर्णय न घेतल्यानं त्यांची शिक्षा
जन्मठेपेत रुपांतरित केल्यांचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. १३ मुलांचं अपहरण
आणि त्यातल्या नऊ जणांची हत्या केल्याच्या आरोपावरुन त्यांना २१ वर्षांपूर्वी २००१
मध्ये उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली होती. सर्वोच्च न्यायालयातही हा निर्णय
कायम झाल्यामुळे, सुमारे सात वर्षांपूर्वी या दोघींनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल
केला होता. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतरही त्यांच्या फाशीच्या शिक्षेची
अंमलबजावणी झाली नाही. यामुळे न्यायालयानं या दोघींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची
शिक्षा सुनावली.
****
शेतकरी
कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या पार्थिव देहावर काल कोल्हापुरात
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी कोविडचे नियम असल्यानं
कांही निवडक लोक यावेळी उपस्थित होते. दरम्यान, काल औरंगाबाद इथं एन.डी. पाटील यांना
डाव्या लोकशाही आघाडीतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
****
स्मार्ट
सिटी मिशनअंतर्गत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज' या उपक्रमात
औरंगाबादनं देशभरातून अकरावा क्रमांक पटकावला आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं
काल या पुरस्कारांची घोषणा केली. ११३ शहरं या उपक्रमात सहभागी झाले होते, यापैकी महाराष्ट्रातून
औरंगाबादसह नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांनी पुरस्कार पटकावला. या शहरांना
५० लाख रुपये बक्षीसही मिळणार आहे.
****
कोविड
लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी
तालुक्यातील उगम ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून कोविड लसीकरणाविषयी जागृती करण्यात
येत आहे.
****
औरंगाबाद
शहरात शासकीय दूध डेअरीच्या जागेवर आता २०० ऐवजी ४०० खाटांचं महिला आणि नवजात शिशु
बाल रुग्णालय उभारण्यात येणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी काल या रुग्णालय बांधकामाची
पाहणी केल्यानंतर माहिती दिली. या साठी १११ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला असल्याचं
त्यांनी सांगितलं. येत्या दोन वर्षात या रुग्णालयाचं काम पूर्ण होणार असून, औरंगाबाद
जिल्ह्याव्यतिरिक्त मराठवाड्याच्या जनतेला या रुग्णालयाचा लाभ होणार असल्याचं खासदार
जलील म्हणाले.
****
बीड
इथले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्याविरुद्ध केज पोलीस
ठाण्यात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धस यांनी
राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त केज तालुक्यातल्या नांदुरघाट इथं
ठेवलेल्या कीर्तनाला एक हजारांपेक्षा जास्त लोक जमले होते. यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक
शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
****
जालना
जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना २०२१ नुसार जिल्ह्यातल्या एक लाख ८८ हजार ८२९ शेतकऱ्यांना,
१०८ कोटी ८६ लाख रुपयांची पीकविमा नुकसान भरपाई देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.
विजय राठोड यांनी ही माहिती दिली. पीकविमा काढलेल्या ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसचूना
७२ तासांच्या आत दिलेली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी सरासरी उत्पन्नाच्या आधारे विमा नुकसान
भरपाई निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही तक्रार करण्याची आवश्यकता
नाही, असं जिल्हाधिकारी राठोड यांनी सांगितलं आहे.
****
भारत
आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज पार्ल
इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय
संघाचं कर्णधारपद के एल राहुल याच्याकडे आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात उगम ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव छाया पडघन यांना पुण्यातल्या युवा फाउंडेशनचा,
'युवा जोश पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आलं. कळमनुरी तालुक्यात उमरा इथं ग्रामीण
भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसंच जनजागृतीसाठी छाया पडघन या गेल्या अनेक वर्षांपासून
कार्यरत आहेत.
****
बीड
जिल्ह्यात मागील आठवड्यातल्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारी पिकांसह रब्बीच्या
पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या शेतकऱ्यांनी
घाबरून न जाता कीटकनाशक फवारणी करावी असं आवाहन तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर
यांनी केलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यातल्या पुर्णाच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या आदेशावरून, काल कान्हेगाव
इथं पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करणारे पाच तराफे जाळून नष्ट करण्यात
आले.
****
No comments:
Post a Comment