Wednesday, 19 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात विविध जिल्ह्यांमधल्या ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे. काही ठिकाणचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ नगरपंचायती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं १७ पैकी दहा जागांवर विजय मिळवला.

****

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल - एनडीआरएफचा आज स्थापना दिवस. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आव्हानात्मक परिस्थितीत मदत कार्यात एनडीआरएफची पथकं नेहमी पुढे राहत असून, त्यांचं शौर्य आणि दक्षता प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

ओमायक्रॉन विषाणूचा धोका असला तरी देशातली आर्थिक उलाढाल मजबूत स्थितीत असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. बँकेनं काल आपलं मासिक बुलेटिन जारी केलं. ग्राहक आणि व्यावसायिकांचा विश्वास मिळाला आणि बँकेच्या कर्जासाठी असलेली मागणी वाढल्याचं यात म्हटलं आहे.

****

देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी सहकार्य करावं, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल दक्षिण विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘पीएम-गती शक्ती’ परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं ते म्हणाले.

****

विधानसभेतल्या भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, विधीमंडळाच्या सत्रापेक्षा जास्त कालावधीसाठी आमदारांचं निलंबन करणं हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं मत व्यक्त केलं. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी निलंबन करायला काहीतरी ठोस कारण पाहिजे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं विद्यार्थ्यांनी शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी काल पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी, विद्यार्थ्यांनी लिहिलेलं पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचं आश्वासन देत, त्यांची समजूत काढली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...