Thursday, 20 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      इतर मागासवर्गीयासंदर्भात उपलब्ध माहिती, राज्य मागासवर्ग आयोगाला देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

·      नगरपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं २४, राष्ट्रवादी काँग्रेस २५, काँग्रेस १८ तर शिवसेनेचं १४ नगरपंचायतींवर वर्चस्व

·      १२ आमदार निलंबन प्रकरणी आठवडाभरात लेखी स्वरुपात माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे दोन्ही पक्षांना निर्देश

·      राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे २१४ नवे रुग्ण, परभणीतील दोन तर औरंगाबादमधील एका रुग्णाचा समावेश

·      कोविड संसर्गाचे राज्यात नवे ४३ हजार ६९७ रुग्ण, मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर तीन हजार ७७८ बाधित 

·      भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा

आणि

·      पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ३१ धावांनी पराभव

****

इतर मागासवर्गीय - ओबीसींसंदर्भात उपलब्ध माहिती राज्य मागासवर्ग आयोगाला देण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. ओबीसींच्या संदर्भात सरकारकडे सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया राबवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारनं केली होती. त्यावर न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. या माहितीच्या अचूकतेची पडताळणी आणि गरजेनुसार सरकारला शिफारस देण्याचं काम आयोगानं करावं, राज्य सरकारनं माहिती जमा केल्यानंतर गरजेनुसार आयोगानं दोन आठवड्यात अंतरिम अहवाल सादर करावा, त्या अहवालाच्या आधारे कायद्यानुसार सरकारनं निर्णय घ्यावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे. याप्रकरणी आठ फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे.

****

राज्यातल्या १०६ नगरपंचायतींमध्ये दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीतल्या ९७ नगरपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. नगरपंचायतींच्या एकूण एक हजार ६३८ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला ३८४, राष्ट्रवादी काँग्रेसला ३४४, काँग्रेसला ३१६ तर शिवसेनेला २८४ जागा मिळाल्या. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं ११, बहुजन समाज पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रत्येकी तीन, नोंदणीकृत पक्षांनी ८२, अपक्ष उमेदवारांनी २०६, तर अन्य उमेदवारांनी तीन जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजपनं जवळपास २४, राष्ट्रवादी काँग्रेसनं २५, काँग्रेसनं १८ तर शिवसेनेनं १४ नगरपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. काही नगरपंचायतींमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. भंडारा जिल्हा परिषद काँग्रेसच्या, तर गोंदिया जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेली आहे.

मराठवाड्यात या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संमिश्र यश मिळालं आहे. विभागातल्या एकूण २३ नगरपंचायतींमध्ये भाजपनं ९३, राष्ट्रवादी काँग्रेसनं ८५, काँग्रेसनं ८०, शिवसेनेनं ७४, तर इतर आणि अपक्ष उमेदवारांनी ४५ जागा जिंकल्या.

जालना जिल्ह्यात मंठा नगरपंचायतीवर शिवसेना, बदनापूर नगरपंचायततीवर भाजप, घनसावंगी आणि तीर्थपुरी नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व राखलं आहे. तर जाफ्राबाद नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला संमिश्र कौल मिळाला आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर नगरपंचायतीवर सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस पक्षानं सत्ता कायम राखली आहे. नायगाव नगरपंचायतीत १७ पैकी १७ जागांवर काँग्रेस विजयी झाली, तर माहूर नगरपंचायतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी नगर पंचायतीवर भारतीय जनता पक्ष, तर लोहारा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नगर पंचायतीमध्ये शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली आहे. तर सेनगाव नगरपंचायतीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.

लातूर जिल्ह्यात देवणी आणि जळकोट नगरपंचायतीत महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. चाकूर नगर पंचायतीमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. शिरूर अनंतपाळची सत्ता टिकवण्यात भाजपला यश आलं आहे. यापूर्वी या चार नगर पंचायतींवर भाजपची सत्ता होती.

बीड जिल्ह्यात आष्टी, पाटोदा आणि शिरुर कासार नगरपंचायतीत भाजपनं विजय मिळवला आहे. वडवणी नगरपंचायतीत एकूण १७ जागांपैकी भाजपनं आठ, राष्ट्रवादी काँग्रेसनं सहा, तर तीन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या. केज नगरपंचायतीत एकूण १७ जागांपैकी भाजप पुरस्कृत आघाडीनं आठ, राष्ट्रवादी काँग्रेसनं पाच, काँग्रेसनं तीन, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एका जागेवर विजय मिळवला.

परभणीच्या पालम नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बहुमत मिळवलं आहे.

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव नगरपंचायतीत १७ पैकी ११ जागांवर शिवेसनेचा विजय झाला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.

****

नगरपंचायत निवडणूकीचे निकाल काँग्रेससाठी समाधानकारक असल्याचं, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यात या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुधारली असल्याचं सांगत पटोले यांनी, राज्यातल्या जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला असून, भारतीय जनता पक्षाला नाकारलं असल्याचं नमूद केलं. काँग्रेस पक्षानं स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता, तो योग्यचं असल्याचं जनतेनं या निकालातून दाखवून दिलं,' असंही पटोले म्हणाले.

****

दरम्यान, या निवडणुकीत भाजपानं २४, तर सहयोगी पक्षांनी मिळून सर्वाधिक ३० नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवली असून, ४१५ पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपा हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचं, विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांच्या निलंबन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांना आठवड्याभरात लेखी स्वरुपात माहिती देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांसोबत गैरवर्तन केल्यानं या आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. प्रदीर्घ निलंबन हे हकालपट्टीपेक्षा वाईट असून, आमदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारं असल्याचं, आमदारांचे वकील महेश जेठमलानी, तसंच मुकूल रोहतगी यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले २१४ नवे रुग्ण आढळले. यापैकी १७२ रुग्ण पुणे जिल्ह्यातले असून, मुंबई ३१, कल्याण - डोबिंवली चार, परभणी दोन, तर औरंगाबाद, नाशिक, वसई -विरार, जळगाव आणि इतर राज्यतल्या एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता दोन हजार ७४ झाली असून, यापैकी एक हजार ९१ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४३ हजार ६९७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७३ लाख २५ हजार ८२५ झाली आहे. काल ४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ९३४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९३ शतांश टक्के झाला आहे. काल ४६ हजार ५९१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६९ लाख १५ हजार ४०७ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख ६४ हजार ७०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल तीन हजार ७७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन तर नांदेड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ९७ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ७६७, तर ग्रामीण भागातले ३३० रुग्ण आहेत. लातूर जिल्ह्यात ७८२, नांदेड ७५८, उस्मामाबाद ३३४, जालना २८२, परभणी २३५, बीड २०५, तर हिंगोली जिल्ह्यात ८५ रुग्णांची नोंद झाली. 

****

औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटनाच्या विकासासंदर्भातील आराखडा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. काल दिल्लीत डॉ कराड यांनी पर्यटनाच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या आराखड्यामध्ये अजिंठा, अहिल्यादेवी कुंड आणि घृष्णेश्वर मंदिरात साउंड आणि लाईट शो, दौलताबाद किल्ला आणि शहरालगतच्या हनुमान टेकडीवर रोपवे व्यवस्था सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

****

वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यासंदर्भात येणारे मेसेज फसवे असल्याचा खुलासा, वीज महावितरण कंपनीकडून करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क मुळीच साधू नये, किंवा अशा मेसेजला उत्तर देऊ नये, अशी सूचना महावितरणने केली आहे.

****

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. चालू वर्षातला टेनिस स्पर्धांचा हंगाम आपला शेवटचा हंगाम असेल, असं सानियाने म्हटलं आहे. ३५ वर्षीय सानियाने आतापर्यंत सहा ग्रॅण्डस्लॅम जिंकले असून, जागतिक टेनिस संघटनेच्या दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानही मिळवलेलं आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत महिला दुहेरीच्या प्राथमिक फेरीतच सानिया आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांना काल पराभवाचा सामना करावा लागला. स्लोवेनियाच्या महिला जोडीनं सानिया किचेनोक जोडीचा सहा - चार, सात - सहा असा पराभव केला.

****

दक्षिण आफ्रिका संघानं काल पार्ल इथं झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत, यजमान संघानं अवघ्या चार गड्यांच्या मोबदल्यात २९६ धावा करून, भारतीय संघासमोर २९७ धावांचं आव्हान ठेवलं. मात्र भारतीय संघ निर्धारित षटकांत आठ बाद २६५ धावाच करू शकला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे.

****

औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुलात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, प्रवेशव्दारापासून ते संकुलातील प्रत्येक ठिकाणी अत्याधुनिक सुविधा उभारण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. क्रीडा संकुलात अनेक खेळाडू सराव करतात तसंच सामान्य नागरिक मॉर्निंग वॉकसाठी नियमित येत असतात. या अनुषंगानं काल क्रीडा संकुलाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी बोलत होते.

****

दक्षिण मध्य रेल्वे ने काही आरक्षित गाड्यांमध्ये काही डब्बे अनारक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तिरुपती आदिलाबाद तिरुपती रेल्वेत पाच डबे, नांदेड बंगळुरू नांदेड रेल्वेत तीन, तिरुपती श्रीसाईनगर शिर्डी तिरुपती सहा, आदिलाबाद मुंबई दोन, नांदेड मुंबई चार, सिकंदराबाद मनमाड दोन, काचिगुडा नारखेर आठ, तिरुपती अमरावती चात, धर्माबाद मनमाड रेल्वेत आठ डबे अनारक्षित करण्यात आले आहेत. काही गाड्यांचे डबे आजपासून, तर उर्वरित गाड्यांचे डबे पुढच्या आठवड्यात अनारक्षित केले जाणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं.

****

नांदेड महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं मागील दोन दिवसात शहरातील शेतकरी चौक ते छत्रपती चौक या भागात १ हजार ८०० भाजीपाला विक्रेत्यांना त्यांच्या दुकानात जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. नांदेड वाघाळा महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ सुरेशसिंग बिसेन यांनी काल ही माहिती दिली.

****

२५ जानेवारी २०२२ रोजी बारावा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे या दिनानिमित्त नांदेड जिल्हा निवडणुक विभागामार्फत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमार्फत ‘संकल्प माझा -लोकशाही बळकटीचा हा संकल्प पत्र उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने संकल्प पत्राचा नमूना दिलेला असून, त्यानुसार स्वहस्ताक्षरात हे पत्र कागदावर लिहुन ते शाळेत जमा करायचं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 26 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...