Friday, 21 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

प्रजासत्ताक दिनापूर्वीच्या एका ऐतिहासिक घडामोडीत, इंडिया गेट इथली ‘अमर जवान ज्योत’ आज राष्ट्रीय युद्ध स्मारकातल्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात येणार आहे. एकात्मिक संरक्षण दल प्रमुख या ज्योती विलीन करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमर जवान ज्योत विझवण्यात येत नसून, तिला राष्ट्रीय युद्ध स्मारकातल्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात येत आहे, त्यामुळे याबद्दल गैरसमज बाळगू नये, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं.

****

गुणवत्तेची व्याख्या स्पर्धा परीक्षेतल्या कामगिरीपुरती सीमित ठेवता येणार नाही, असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं, ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेतल्या इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणाला वैध ठरवणारं सविस्तर निकालपत्र काल प्रस्तुत केलं. स्पर्धा परीक्षांमधले उत्तम गुण म्हणजे गुणवत्ता, अशी संकुचित व्याख्या करता येणार नाही़, शिवाय काही समाजघटकांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक लाभाचं प्रतिबिंब अशा परीक्षांमधून उमटत नाही़, त्यामुळे गुणवत्तेकडे सामाजिक संदर्भातून पाहायला हवं, आरक्षण हे गुणवत्तेशी विसंगत नसून, गुणवत्तेच्या व्यापकतेसाठी सुसंगत ठरतं, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

‘नीट’ प्रवेश प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आठ लाखांची उत्पन्न मर्यादा ठेवण्याचा केंद्राचा निर्णयही, सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला़ आहे. या प्रवेश प्रक्रियेस आधीच विलंब झाला़ असल्यामुळे, या टप्प्यावर न्यायालयीन हस्तक्षेप केल्यास ही प्रक्रिया आणखी लांबणीवर जाईल, कोरोनाकाळात डॉक्टरांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रवेश प्रक्रियेसाठीच्या निकषांना स्थगिती देत नसल्याचंही न्यायालयाने नमूद केलं आहे. त्यामुळे उत्पन्न मर्यादेचा निकषही तूर्त कायम राहणार आहे.

****

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची मुदत २७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना पंतप्रधानांशी चर्चा करण्याची संधी मिळते. ताण न घेता हलक्या फुलक्या वातावरणात परीक्षा देण्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

****

मुंबई पश्चिम सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट रॅकेट उद्धस्त केलं आहे. याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईअंतर्गत धातूच्या भंगार सामानाच्या पावत्यांद्वारे करण्यात येणारी १० कोटींची करचोरी पकडण्यात आली. याप्रकरणी नेसील मेटल डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या वर्सोव्यातल्या कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. बनावट इनपुट टॅक्स क्रेडीटचे जाळे नष्ट करण्याच्या हेतूनं केंद्रीय वस्तु आणि सेवा कर आयुक्तालयानं मोहीम हाती घेतली आहे.

****

पर्यावरण आणि निसर्गाप्रति जबाबदारी बाळगून पर्यटन करण्यासंबंधी जागृतीचा भाग म्हणून, राज्य पर्यटन महामंडळातर्फे ‘जबाबदार पर्यटन’, ही संकल्पना कालपासून राबवण्यात येत आहे. पर्यटनाला चालना देताना नैसर्गिक साधन संपत्तीला इजा पोहोचू नये, या दृष्टीनं पर्यटकांना मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीनं सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पर्यटनस्थळांवर ‘ओला - सुका कचरा वर्गीकरण’, ‘प्लास्टिक मनाई’, ‘स्थानिकांना प्राधान्य आणि प्रशिक्षण’ असे उपक्रम या अंतर्गत महामंडळातर्फे राबवण्यात येणार आहेत.

****

परभणी जिल्ह्यातले सर्वच गर्भपात केंद्रं आणि सोनोग्राफी सेंटरची तपासणी मोहिम हाती घेऊन दोषी केंद्रावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी परभणी जिल्हा रुग्ण हक्क संघर्ष समितीनं काल केली. उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्याकडे या मागणीचं निवेदन त्यांनी सादर केलं. जिल्हा प्रशासन त्वरीत तपासणी मोहिम राबवणार तसंच जिल्हा रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी पाऊलं उचलली जातील, असं अश्वासन उपजिल्हाधिकारी वडदकर यांनी यावेळी दिलं.

****

परभणी इथं बेकायदेशीरपणे सावकारी व्यवहार करणाऱ्या अमोल अंबुरे याच्याविरुद्ध सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबुरे याच्या नेमीकृपा मल्टिसर्व्हीसेस या दुकानावर सहाय्यक निबंधकाच्या पथकाने १३ जानेवारीला छापा टाकून झडती घेतली होती. त्यात आक्षेपार्ह दस्तऐवज, कागदपत्रे, अभिलेखे जप्त करण्यात आले. यात अंबुरे हा अवैध सावकारी व्यवहार करत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान सुरू असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज पर्ल इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरूवात होईल. पर्ल इथंच झालेल्या पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिका संघानं मालिकेत एक- शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...