Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 February 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी
६.१०
****
देशाच्या
अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं,
आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी
कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच
चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
**
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या बालकांसाठी असलेल्या पीएम केयर्स योजनेला
२८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
**
एसटी संपामुळे महामंडळाचं झालेलं नुकसान कामगारांकडून वसूल केलं जाणार नाही - एसटी
महामंडळाची स्पष्टोक्ती
**
राज्यसभेच्या सदस्या डॉ.फौजिया खान यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर
आणि
**‘विज्ञान
सर्वत्र पूज्यते’, या उपक्रमाअंतर्गत विज्ञान महोत्सवाला औरंगाबाद इथं प्रारंभ
****
केंद्रीय
महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने बालकांसाठी असलेल्या पीएम केयर्स योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत
मुदतवाढ दिली आहे. या योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२१ ला संपली होती. ११ मार्च २०२० पासून
२८ फेब्रुवारीपर्यंत ज्या बालकांनी कोविड-19 मुळे त्यांचे दोन्ही पालक अथवा हयात असलेला
पालक गमावला असेल अशा सर्व बालकांना या योजनेतून मदत करण्यात येते. पालकाच्या मृत्यूदिनी
ज्या बालकांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते अशी बालकं या योजनेचा लाभ घेण्यास पात्र
आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागाच्या सर्व पात्र बालकांची पडताळणी तसेच
नोंदणी करण्याच्या सूचना सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना देण्यात आल्या
असल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे.
****
इतर
मागासवर्ग - ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात येत्या २५
तारखेला सुनावणी होणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला इम्पिरिकल डेटा
गोळा करण्यासंदर्भात अंतरिम अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.
त्यानुसार आयोगाने तयार केलेला अहवाल सरकारच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आला.
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याची भूमिका
राज्य सरकारने घेतली आहे.
****
एसटी
संपामुळे महामंडळाचं झालेलं नुकसान कामगारांकडून वसूल केलं जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. एसटी
महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला
आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या संपामुळे महामंडळाला मोठं नुकसान
सोसावं लागत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी कामगारांच्या वेतनात कपातीचा प्रस्ताव
महामंडळाच्या विचारधीन असल्याचं वृत्त आज माध्यमांनी प्रसिद्ध केलं, मात्र महामंडळाने
असा कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा तसा प्रस्तावही विचारधीन नसल्याचं, चन्ने यांनी
स्पष्ट केलं. कामगारांनी कर्तव्यावर रुजू होण्याचं आवाहनही चन्ने यांनी केलं.
दरम्यान,
एसटी विलिनीकरणासंबंधी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन त्रिसदस्यीय समितीचा
अहवाल आज मुंबई उच्च न्यायालयात सादर झाला. पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
****
आरोग्य
सेवेत व्यत्यय न आणता त्यात सातत्याने वाढ करण्यात आली असून त्यातूनच राज्यात आरोग्य
सुविधांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते
आज अलिबाग इथं नियोजित वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचं भूमीपूजन ठाकरे
यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दोन वर्षात
रुग्णालयांचे नूतनीकरण, नवीन रुग्णालयांची उभारणी आणि श्रेणी वाढीची सर्वाधिक कामं
राज्यात झाली असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.
****
“सोयाबिन
डिजिटल शेती शाळा” या पुस्तकाचं लोकार्पण कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज करण्यात
आलं. पाणी फाऊंडेशन, राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्या
संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजन करण्यात
आलं होतं. सोयाबिन डिजीटल शेती शाळा या पुस्तकात शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे
देण्यात आली असून त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास कृषिमंत्री दादाजी
भुसे यांनी व्यक्त केला. हे पुस्तक ऑनलाइन स्वरुपातही उपलब्ध असणार आहे.
****
राज्यसभेच्या
सदस्या डॉ.फौजिया खान यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. खान यांनी अभ्यासपूर्ण
विवेचन करून, विविध मुद्यांवर सदनाचं लक्ष वेधून घेतलं. सभापती एम व्यंकय्या नायडू
यांनीही त्यांची याबद्दल प्रशंसा केली होती. येत्या २६ तारखेला दिल्लीत या पुरस्काराचं
वितरण केलं जाणार आहे.
****
मुंबईचे
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेला तपास नऊ मार्चपर्यंत स्थगित
करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. यासंदर्भात आज झालेल्या
सुनावणी दरम्यान न्यायालयानं, परमबीर सिंह यांच्या संदर्भातला तपास सीबीआयकडे हस्तांतरित
करण्यावर नऊ मार्च रोजी अंतिम निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.
****
आकांक्षित
जिल्ह्यांच्या निर्देशांकानुसार महिला आणि मुली मधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्याचे
निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं राबवलेल्या
उपक्रमाबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
ॲनेमिया मुक्त भारत या केंद्र
सरकारच्या उपक्रमांतर्गत महिला आणि मुलींमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व
प्राथमिक आरोग्य केंद्र - उपकेंद्र स्तरावर गावागावात किशोरवयीन मुली, महिला, स्तनदा
माता आणि गर्भवतींची हिमोग्लोबिन तपासणी तसंच लोहयुक्त गोळ्यांचं वाटप आणि मार्गदर्शन
शिबीरं भरवली जात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि २११ उपकेंद्र
स्तरावर गावा - गावात विशेष आरोग्य टेस्टींग, ट्रीट ॲण्ड टेलिंग - T3 शिबीरं घेण्यात
आली. यामध्ये २३ हजार ५०९ महिला आणि किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात
आली. त्यापैकी ६४३ महिला आणि मुलीमध्ये सामान्य तर ११ जणीमध्ये तीव्र रक्तक्षय आढळून
आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी दिली. या अभियानामुळे जिल्ह्यातील
रक्तक्षयाचं प्रमाण कमी करण्यात मदत होत आहे.
-- देविदास पाठक आकाशवाणी
वार्ताहर उस्मानाबाद
****
राज्यातल्या सर्व जिल्ह्यात
येत्या रविवारी, २७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे,
अशी माहिती आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी यांसंदर्भात झालेल्या बैठकीत
दिली. यावर्षीच्या मोहिमेत एक कोटी पंधरा लाख मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे नियोजन
करण्यात आलं असल्याचं त्यानी सांगितलं.
****
नांदेड
जिल्ह्यात भोकर किनवट मार्गावर काल झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या आठ झाली आहे.
भोकर हिमायतनगर महामार्गावर काल सांयकाळी हा अपघात झाला. धर्माबाद तालुक्यात जरिकोट
इथं विवाहानंतरचे पारंपारिक विधी आटोपून हे वऱ्हाड यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातल्या
सखरा गावी जात होतं. समोरून आलेल्या टेम्पोची या वाहनाशी धडक होऊन हा अपघात झाला. जखमींना
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं, त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या तिघांचा
आज मृत्यू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
‘विज्ञान सर्वत्र पूज्यते', या उपक्रमाअंतर्गत आजपासून
देशभरात ७५ ठिकाणी विज्ञान महोत्सवाला प्रारंभ झाला. औरंगाबाद शहरात विवेकानंद महाविद्यालयात
विज्ञान भारती संस्थेचे संघटन प्रमुख जयंत सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते विज्ञान महोत्सवाचं
उद्घाटन झालं. स्वातंत्र्य आंदोलनाचा विज्ञानाशी संबंध काय होता, या गोष्टीकडे अधिक
विचारपूर्वक पाहिलं तर जगाला ज्ञान देणारा देश अशी भारताची प्रतिमा होती, ती पुन्हा
निर्माण करावयाची असल्याचं सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केलं.
स्वातंत्र्यपूर्व
काळात विज्ञानाच्या आधारे ब्रिटीशांनी भारताची ४५ ट्रिलीयन डॉलर एवढी लूट केल्याचं
त्यांनी सांगितलं. या महोत्सवात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतिहास, आधुनिक विज्ञान
आणि तंत्रज्ञानातले प्रमुख टप्पे, स्वदेशी पारंपारिक शोध आणि नवोन्मेष, तसंच परिवर्तनशील
भारत, या चार मुख्य विषयांवर, पूर्ण आठवडाभर अनेक स्पर्धा होणार आहेत. राष्ट्रीय विज्ञान
दिनी, २८ फेब्रुवारीला या सप्ताहाचा समारोप होणार आहे.
****
No comments:
Post a Comment