Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 07 February 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व
श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक
लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक
आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर
अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी
राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
** राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला पंतप्रधानांचं
लोकसभेत उत्तर
** भारतरत्न लता मंगेशकर यांना संसदेच्या दोन्ही सदनात श्रद्धांजली अर्पण
** नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पहिला कार्यक्षम सांसद पुरस्कार केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर
आणि
** बीड जिल्ह्यात वाळूच्या उपशासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा
मृत्यू
****
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावाच्या धन्यवाद प्रस्तावावर संसदेत आजही चर्चा
झाली. राज्यसभेत माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारने केलेल्या विकास कामांचा
आढावा घेत, विकास कामांचा वेग वाढल्याचं नमूद केलं. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास
आठवले यांनी अनुसूचित जाती जमातींसाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांकडे लक्ष वेधलं.
भाजपचे विनय सहस्त्रबुद्धे यांनी सरकारच्या कल्याणकारी योजनांबद्दल कोत्या मानसिकतेसाठी
विरोधकांवर टीका केली. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी
क्षेत्रासाठी केलेली तरतूद तोकडी असल्याचं सांगितलं. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी
राष्ट्रपतींचं भाषण वास्तवापासून दूर असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या
फौजिया खान यांनी, सैनिकांना किमान सुविधा मिळत नसल्याकडे लक्ष वेधलं. संरक्षण साहित्याच्या
खरेदीला चार वर्ष विलंब झाल्याचंही खान यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या
धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देत आहेत. छोट्या शेतकऱ्यांना
सक्षम करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. कोविड काळात काँग्रेसनं
नागरिकांमध्ये संभ्रम पसरवल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला.
****
भारतरत्न लता मंगेशकर यांना आज, संसदेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राज्यसभेत सभापती एम व्यंकया नायडू यांनी सभागृहाच्या माजी सदस्या लता मंगेशकर यांच्या
मृत्यूबद्दल शोकप्रस्ताव सादर केला. सर्व सदस्यांनी त्यांना एक मिनीट उभं राहून श्रद्धांजली
अर्पण केली. त्यानंतर सदनाचं कामकाज तासाभरासाठी तहकूब करण्यात आलं.
लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोकप्रस्ताव मांडला. सदनानं उभं राहूनं
लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर लोकसभेचं कामकाज तासाभरासाठी स्थगित
करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दु:ख
व्यक्त केलं. ३६ भाषांमधून गायन, हे भारताच्या एकतेला वृद्धिंगत करणारं मोठं उदाहरण
असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लता मंगेशकर
यांच्या नावे इंदूरमध्ये संगीत अकादमी स्थापन करणार असल्याची घोषणा केली. या अकादमीत
लताजींच्या सगळ्या गाण्यांचं संग्रहालय असेल, असंही त्यांनी जाहीर केलं. इंदूर हे लता
मंगेशकरांचं जन्मस्थळ आहे, या शहरात लतादिदींचा पुतळाही उभारणार असल्याचं, चौहान यांनी
सांगितलं.
भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं स्मारक बांधण्यात यावं अशी
मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. कदम यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना
आज पत्र लिहिलं आहे.
****
केंद्र सरकारनं देऊ केलेल्या झेड श्रेणी सुरक्षेचा एम आय एम चे अध्यक्ष
असदुद्दीन ओवेसी यांनी स्वीकार करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी
केलं आहे. ओवेसी यांच्या ताफ्यावर ३ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश मधल्या हापुड इथं
हल्ला झाला होता, त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री आज राज्यसभेत बोलत होते.
या हल्ल्यासाठी २ आरोपींना विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली असून साक्षीदारांची
फॉरेंसिक तपासणी सुरु असल्याचं शाह यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं ओवेसी यांना बुलेट
प्रुफ चारचाकी सह संपूर्ण देशभरात झेड दर्जाच्या सुरक्षेचा प्रस्ताव दिला असल्याचं
ते यावेळी म्हणाले.
****
शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्लाप्रकरणी न्यायालयीन
कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे पुढील उपचारासाठी कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर इथल्या छत्रपती प्रमिला राजे जिल्हा रुग्णालयात
दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला
आहे.
****
नाशिकच्या दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं
देण्यात येणारा पहिला कार्यक्षम सांसद पुरस्कार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन
गडकरी यांना जाहीर करण्यात आला आहे. संस्थेनं आज या संदर्भात माहिती दिली. या वाचनालयाच्या
वतीने कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जातो. समाजवादी नेते आणि माजी आमदार माधवराव लिमये
यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची यंदापासून व्याप्ती वाढवण्यात
आली असून वर्षाआड हे पुरस्कार विधी मंडळ आणि सांसद सदस्य यांना देण्यात येणार आहे.
यंदाचा हा पहिला पुरस्कार नितीन गडकरी यांना देण्यात येणार आहे. पन्नास हजार रुपये,
स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या १० तारखेला दिल्लीत हा पुरस्कार
गडकरी यांना प्रदान करण्यात येईल.
****
पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात कार्यरत प्राध्यापक डॉ शांतीश्री
धुलीपुडी पंडित यांची दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ - 'जेएनयू' च्या कुलगुरू
पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. संतीश्री जेएनयु
च्या पहिल्या महिला कुलगुरू ठरतील. मावळते कुलगुरू ममिडला जगदेश कुमार यांनी अधिकृत
प्रसिद्धी पत्राद्वारे ही घोषणा केली. डॉ शांतीश्री धुलीपुडी पंडित सध्या सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ इथं राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात कार्यरत आहेत.
****
बीड जिल्ह्यात वाळूच्या उपशासाठी खोदलेल्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यात
बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाला. गेवराई तालुक्यातील शहजानपूर चकला इथं घडलेली
ही घटना काल रात्री निदर्शनास आली. बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम
सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर अशी या मुलांची नावं असून ते नऊ ते बारा वर्षे वयोगटातले
आहेत.
****
कोल्हापूर वनविभागाच्या विशेष गुन्हे अन्वेषण विभागानं नाशिक शहरातील
पंचवटी इथं एका पुजा साहित्य विक्रीच्या दुकानात छापा घातला. या दुकानातून वन्यजीवांचे
काही अवशेष जप्त करत दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. कैलास बबन कुलथे या आरोपीचं
नाव आहे. वन विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात
केलेल्या कारवाईत अशाच प्रकारे पूजा साहित्य विक्रीच्या दुकानावर छापे टाकून कारवाई
केली होती.
****
प्रधानमंत्री
आवास योजने अंतर्गत जाचक अटी रद्द करुन परभणीच्या महापालिका प्रशासनानं तातडीनं पात्र
नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यावा या मागणीसाठी मनपा सदस्य सुशील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली
नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयावर आज मोर्चा काढला. नांदेड, परळी, वसमत आणि जिंतूर
इथल्या स्थानिक प्रशासनानं नोटरीधारक तसंच घरपट्टी आणि पीटीआर नक्कल असलेल्या लाभार्थ्यांना
या योजनेचा लाभ दिला आहे, असं मोर्चेकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं. महापालिका प्रशासनाने
या गोष्टीचा गांभीर्याने विचार न केल्यास प्रखर आंदोलन उभारलं जाईल, असा इशारा शिवसेनेचे
आमदार राहूल पाटील यांनी यावेळी दिला.
****
सी आय एस सी ई अर्थात भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनं इयत्ता
१० वी आणि १२ वीच्या २०२१- २२ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या प्रथम सत्रपरीक्षांचे
निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल cisce.org या संकेत स्थळावर पाहू शकतील
किंवा ०९२४८०८२८८३ या दूरध्वनी क्रमांकावर एसएमएस पाठवूनही निकाल बघता येईल.
****
प्रवाशांच्या सुविधे साठी दक्षिण मध्य रेल्वे ने या पूर्वीच काही आरक्षित
गाड्यांमध्ये डब्बे अनारक्षित केले आहेत. त्यात आणखी दोन रेल्वे गाड्यांचा समावेश करण्याच्या
निर्णय रेल्वे नं घेतला आहे. त्यानुसार मनमाड हून सिकंदराबाद कडे जाणाऱ्या अजंता एक्सप्रेसमधले
२ तर आणि मनमाड हून धर्माबाद कडे जाणाऱ्या एक्सप्रेसमधले ८ डबे अनारक्षित केले जाणार
आहेत.
****
चंद्रपूर
शहरालगतच्या पद्मापूर कोळसा खाण परिसरात काल एका वाघाने कामगारावर हल्ला केला. सुदैवाने
आसपास असलेले कामगार मदतीसाठी धावून आल्यानं, सदर कामगार बचावल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. सरकारी कंपनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडची पद्मापूर कोळसा खाण ताडोबा-अंधारी
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या अगदी शेजारी आहे. वाघांना भ्रमणमार्ग मिळत नसल्याने
ते कोळसा खाण परिसरात भटकंती करत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment