Monday, 7 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाच्या सीमा द्विवेदी यांनी या चर्चेत सहभागी होत, भारतानं कोविड महामारीच्या काळात लसीचे करोडो डोस यशस्वीपणे दिल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, किसान रेल आदी सरकारच्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला. लोकांच्या कल्याणासाठी सरकारनं उचलेल्या अनेक उपाययोजनांवर खोटे आरोप लावण्यावरुन त्यांनी विरोधकांवर टीका केली.

काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी राष्ट्रपतींचं अभिभाषण निराशाजनक असल्याचं म्हटलं. हे भाषण वास्तवापासून दूर आहे आणि देशासमोरच्या आव्हानांचा यात उल्लेख नाही, असं ते म्हणाले. तेलगु देसम पक्षाचे के रविकुमार यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाची चर्चा १२ तासाहून जास्त वेळ सुरू होती.

दरम्यान, राज्यसभेत आज संविधान आदेश सुधारणा विधेयक २०२२ सादर करण्यात आलं. आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी हे विधेयक मांडलं.

तत्पूर्वी राज्यसभेत गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी शोक प्रस्तावाचं वाचन केलं. त्यानंतर लता दीदींच्या स्मृतींना अभिवादन म्हणून राज्यसभेचं कामकाज एका तासासाठी तहकूब करण्यात आलं होतं.

लोकसभेतही दुपारी चार वाजता अध्यक्ष ओम बिर्ला शोकसंदेश वाचून एक तासासाठी लोकसभेचं कामकाज तहकूब करतील.

****

केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी काल आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथं भेट देऊन अर्थसंकल्पाबाबत जनजागृती केली. केंद्रानं सादर केलेला अर्थसंकल्प सर्व घटकांना फायदेशीर ठरणार आहे. कोविडमुळे जीवितहानीबरोबरच आर्थिक नुकसान झालं मात्र लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी आणि इतर सर्व क्षेत्रांना प्राधान्य देणारा आहे असं कराड म्हणाले. पर्वतमाला या अनोख्या प्रकल्पाअंतर्गत राज्यांमधल्या डोंगराळ भागांना जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोपवे तयार केले जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं. औद्योगिक विकासामुळे रोजगारांच्या संधी वाढतील असंही ते म्हणाले. आत्मनिर्भर भारत ही योजना व्यवसायांसाठी विशेषत: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वरदान असून यामुळे कोरोना काळात खूप मदत झाली, असं कराड म्हणाले.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १६९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख ७० हजार ५३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १६९ कोटी ६३ लाख ८० हजार ७५५ मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत एक कोटी ४८ लाख ९० हजार ६७७ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

दरम्यान, देशात काल नव्या ८३ हजार ८७६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ८९५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक लाख ९९ हजार ५४ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ११ लाख आठ हजार ९३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

भारतीय औषध महानियंत्रकांनी एकच मात्रा पुरेशी असलेल्या स्पुटनिक या कोविड प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. ही देशातली ९ वी कोविड प्रतिबंधक लस आहे, तसंच यामुळे या रोगाविरुद्धच्या देशाच्या सामूहिक लढ्याला आणखी बळकटी मिळेल, असं मांडवीय यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

****

सार्वजनिक ग्रंथालयातल्या कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचं वार्षिक अधिवेशन आणि स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पूर्णा इथं एका कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. यावेळी पालम इथले ग्रंथपाल जीवन लोखंडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****

प्रवाशांच्या सुविधेसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं आणखी दोन रेल्वे गाड्यांमध्ये काही डबे अनारक्षित करण्याच्या निर्णय घेतला आहे. मनमाड-सिकंदराबाद या गाडीत दोन, तर आदिलाबाद तिरुपती या गाडीत आठ डबे अनारक्षित करण्यात आल्याचं दक्षिण मध्ये रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

पुण्यातल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात काल झालेल्या टाटा ओपन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या जोडीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात त्यांनी लुक सेविले आणि जॉन पेट्रिक स्मिथ या जोडीचा पराभव केला. विजेत्या जोडीला १२ लाख रुपये आणि अडीचशे गुण प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत याआधी २०१९ मध्ये या जोडीनं विजेतेपद पटकावलं होतं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...