Saturday, 2 April 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 April 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 April 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

** महाराष्ट्र राज्य हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन

** कोरोना निर्बंध हटल्यामुळं गुढीपाडवा उत्साहात साजरा

** ऊस शेतीबाबत विचार करणं गरजेचं- शरद पवार

आणि

** दौलताबाद नजिक मालगाडीचे डबे रुळावरुन घसरल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळित

****

वस्तू आणि सेवा कर विभाग हा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या एकूण उत्पन्नात सर्वाधिक योगदान देणारं महाराष्ट्र राज्य हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईत वडाळा इथं वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ठाकरे बोलंत होते. कर संकलनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची बाब अभिमानास्पद आहे, असंही ठाकरे म्हणाले.  राज्य कर विभाग, वस्तू सेवा कर विभागानं, करसंकलनातून दिलेल्या आर्थिक पाठबळामुळेच राज्यात कोरोना विषाणू संसर्गाविरुद्धची लढाई यशस्वी होऊ शकली असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. मुंबईतल्या मराठी भाषा भवनाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांनी आज केलं. मराठी भाषेत खूप ताकद आहे आणि कार्यालयीन कामकाजासाठी या प्रादेशिक भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मराठी भाषेत अवघड शब्दांचा वापर टाळल्यास ती सामान्य माणसांना समजेल, असंही ते म्हणाले. मुंबईत दोन नव्या मेट्रो मार्गांचं लोकार्पणही आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचे निर्बंध हटवण्यात आल्यामुळं आज राज्यभर गुढीपाडवा, मराठी नव वर्ष स्वागत मोठ्या उत्साहात आणि आनंदात मिरवणुका काढून झालं. मुंबई, पुण्यात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. पुणे इथं आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातली पहिली पर्यायी इंधन परिषद झाली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या परिषदेचं उदघाटन झालं. कोरोना विषाणू संसर्गामुळं दोन वर्षे बंद असलेलं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन आज गुढीपाडव्यापासून निर्बंध उठवण्यात आल्यानं सुरू करण्यात आलं आहे. आज दर्शनासाठी आलेल्या भाविकांचं मंदिरात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. तर पदस्पर्श दर्शन मिळाल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केलं. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्क परिधान करावा, असं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे.

****

गुढीपाडव्या निमित्त औरंगाबाद इथं नागरिकांनी सकाळीच घरावर गुढी उभारुन पुजा केली. शिवसेनेच्या वतीनं शहरातल्या गुलमंडी इथं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. शहरातल्या विविध भागात मिरवणुका काढण्यात आल्या. हिंदू शक काल गणना सुरु करणारे सम्राट शालिवाहन राजाच्या प्रतिमेची पैठण इथं मिरवणूक काढण्यात आली. तसंच सातवाहन कालीन तीर्थस्तंभावर गुढी उभारण्यात आली. शालीवाहन राजवटीचे अभ्यासक बाळासाहेब पाटील यांच्या वस्तू संग्रहालयाची इमारत उभारण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यातल्या जनतेला गुढीपाडव्या निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आज नांदेड इथं आपल्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून पुजा केली. 

****

ऊस शेती बाबत विचार करणं गरजेचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथं आज आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी आज मार्गदर्शन केलं, त्यावेळी पवार बोलत होते. ऊसाच्या शेतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशा अतिरिक्त ऊसाचं गळीत आता कसं करायचं, असा प्रश्न निर्माण होत आहे. ही स्थिती चिंताजनक असून उसापासून फक्त साखर करून चालणार नाही, तर उपपदार्थ करावे लागतील असंही पवार यावेळी म्हणाले. देशात धर्माच्या नावानं लोकांमध्ये आंतर निर्माण केलं जात आहे. या धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई उभी करावी लागेल, असं पवार म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे नेते,

माजी आमदार शिवाजी नाईक यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

****

दौलताबादजवळ आज सकाळी रेल्वे रुळावरुन मालगाडीचे आठ डबे घसरल्यानं या मार्गावरची वाहतूक विस्कळित झाली होती. रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार ही वाहतूक दुपारच्या सुमारास सुरळीत झाली. रेल्वे प्रशासनानं सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर अपघात निवारण यंत्रणेच्या मदतीनं वाहतूक पुर्ववत केली. पुर्णा आणि मनमाडहून यासाठी यंत्रणा मागवण्यात आली होती.  या दुर्घटनेमुळं रद्द करण्यात आलेल्या जालना - मुंबई जनशताब्दी तसंच निझामाबाद - पुणे या सकाळच्या गाड्या दुपारी विशेष गाड्या म्हणून सोडण्यात आल्या. अन्य काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करावा लागला तर काही गाड्या अशंत: रद्द कराव्या लागल्या. नरसापूर जलद रेल्वेनं आलेल्या प्रवाशांना शिर्डीला जाण्यासाठी बसनं सोडण्यात आलं. तसंच रेल्वे गाडयांमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या येलकी इथल्या सशस्त्र सीमा दलाच्या तळावर आज पहिला दीक्षांत समारंभ झाला. सशस्त्र सीमा दलाचे उपमहानिरीक्षक सेरिंग दोर्जे यावेळी प्रमुख पाहुणे होते. २४५ नवप्रशिक्षित सैनिकांचा शपथविधी यावेळी झाला. हे सर्व सैनिक देशसेवेसाठी सज्ज असल्याचं दोर्जे यावेळी म्हणाले. सैनिकांनी देशाची मान उंचावेल, असं कर्तृत्त्व करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

लहू प्रहार संघटनेतर्फे आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या ६८ शिफारशींची अंमलबजावणी झाली नसल्यानं हे आंदोलन केल्याचं संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार यांनी म्हटलं आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत, अनुसूचीत जाती आरक्षण वर्गीकरण मागणी कडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****

आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ‘अभ्यास’ हा नवा साप्ताहिक कार्यक्रम आजपासून सुरु होत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि उमेदवारांशी संवाद साधणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम हिंदी भाषेत आयोजित केला जाणार असून दर शनिवारी रात्री साडे नऊ ते दहा या वेळेत त्याचं प्रसारण होईल. पहिल्या भागात आधुनिक इतिहास या विषयावर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात विश्लेषण, वास्तवस्थिती, परीक्षा वेळापत्रक आणि आठवड्याचा प्रश्न असे टप्पे असून त्या दरम्यान सांगीतिक विश्राम असेल. स्पर्धा परीक्षांसाठीच्या ‘अभ्यास’ या कार्यक्रमाचा पहिला भाग आज रात्री साडे नऊ वाजता १०० पूर्णांक १ मेगाहर्टझ् या एफ एम गोल्ड वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. तुम्ही हा कार्यक्रम @air news alerts या ट्वीटर हँडलवर किंवा air news official या युट्यूब वाहिनीवर आणि News on Air या अॅपवर ऐकू शकता.

****

भारताचा पुरुष हॉकी संघ आज आणि उद्या भुवनेश्र्वरच्या कलिंग हॉकी क्रीडासंकुलामध्ये `एफआईएच`  साखळी स्पर्धेमध्ये इंग्लंडविरुद्ध सामने खेळणार आहे. आजचा सामना संध्याकाळी साडे सात वाजता होणार आहे. उद्या होणारा दुसरा सामनाही संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होणार आहे. भारतीय संघानं या स्पर्धेत आतापर्यंत आठ पैकी पाचमध्ये विजय मिळवला तर तीनमध्ये पराभव स्वीकारला असून संघ गुण तक्त्यामध्ये द्वितीय स्थानावर आहे. इंग्लंड संघानं आतापर्यंतच्या चार सामन्यांपैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे तर दोन सामने गमावले आहेत.  

****

आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघानं यंदाच्या बुद्धीबळ ऑलंपीयाडचं यजमानपद अधिकृतपणे भारताकडे सोपवलं आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमांतून या संदर्भातली माहिती दिली. येत्या जुलै महिन्यात हे बुद्धीबळ ऑलंपीयाड होणार आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाचे अध्यक्ष अर्काडी वोर्कोवीच आणि भारतीय बुद्धीबळ महासंघाच्या अधिकाऱ्यांशी ठाकुर यांनी या संदर्भात चर्चा केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...