Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०१ मे २०२२ सकाळी ७.१० मि.
****
· राज्यातलं परस्पर सौहार्द, बंधुभाव आणि एकोप्याचं वातावरण कलुषित करणारे सगळे प्रयत्न जनता हाणून पाडेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना
विश्वास
· महाराष्ट्र दिनानिमित्त
आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
· महागाई आणि बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्नांवरुन लक्ष
विचलीत करण्यासाठी जात आणि धर्माच्या नावानं राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आरोप
· विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी
शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची
साडे ५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
· शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के
राखीव जागांवरील प्रवेशासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ
· मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदी माजी
खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांची फेरनिवड
आणि
· राज्यात १५५ तर मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात एक कोरोना
विषाणू बाधित रुग्ण
****
राज्यातलं परस्पर सौहार्द, बंधुभाव आणि एकोप्याचं वातावरण कलुषित होऊ
देणारे सगळे प्रयत्न जनता हाणून पाडेल, असा विश्वास
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिनाच्या
पूर्वसंध्येला राज्यातल्या जनतेला शुभेच्छा देताना, मुख्यमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात नैसर्गिक आपत्ती तसंच
विषाणूच्या आक्रमणातही प्रशासनाने धीरानं आणि हिमतीनं काम केल्याचं नमूद केलं.
आरोग्य, सुशासन, पर्यावरण, नागरी विकास, आदी क्षेत्रात महाराष्ट्राने उचललेल्या
ठोस पावलांचं देश तसंच जागतिक पातळीवरही कौतुक झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजवण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्वांनी
एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं
आहे.
****
राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या
स्थापनेस आज १ मे रोजी ६० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं राज्यातल्या जिल्हा
परिषद अंतर्गत हीरक महोत्सव समारंभ साजरा करण्यात यावा, अशा सूचना राज्य शासनानं दिल्या आहेत.
त्यानुसार आज नांदेड जिल्हा परिषदेत सकाळी साडेआठ वाजता हीरक महोत्सव कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य
कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा परिषदअंतर्गत
विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ
करण्यात येणार आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संयुक्त
महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी महाराष्ट्रवीरांच्या त्यागाचं स्मरण करुन अजित
पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कोविडविरोधात एकजुटीने लढणाऱ्या सर्व
कोरोनायोद्ध्यांच्या सेवाकार्याची नोंद इतिहासात नक्कीच होईल, असं सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे
आभार मानले.
दरम्यान, विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, नैतिक मूल्यांचं शिक्षण देऊन, चारित्र्य संपन्न
होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या पापरी जिल्हा परिषद शाळेत स्वच्छ शाळा,
सुंदर शाळा उपक्रमाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री काल बोलत होते.
शिक्षक हे उद्याची पिढी घडवत असल्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळू नये याची त्यांनी
दक्षता घ्यावी, गुणवत्तेबाबत सातत्य ठेवावं असंही ते
म्हणाले.
****
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन
दिनानिमित्त आज १ मे रोजी सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं आहे. औरंगाबाद इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर राज्याचे उद्योग
मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता मुख्य
शासकीय ध्वजारोहण होणार आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ
यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील हिरवळीवर सकाळी सव्वा नऊ वाजता
ध्वजारोहण होणार आहे. उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात
पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे
****
कोविड महामारी, महापूर, चक्रीवादळं अशा विविध आपत्तींना तोंड देत
राज्य शासनानं राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती
देणाऱ्या 'दोन वर्षे जनसेवेची: महाविकास आघाडीची' या मोहिमेअंतर्गत आज १ मे रोजी राज्यात विभागीयस्तरावर सचित्र प्रदर्शनाचं
आयोजन करण्यात आलं आहे. आज संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते या
प्रदर्शनाचं उद्घाटन होईल.
औरंगाबाद इथं जिल्हा परिषद कार्यालयासमोर सिमंत मंगल
कार्यालयात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई
यांच्या हस्ते सकाळी साडे दहा वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन होइल. हे प्रदर्शन
नागरिकांसाठी आजपासून पाच मे पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी
खुले राहणार आहे.
****
देशात भेडसावणाऱ्या
महागाई आणि बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्नांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी जात
आणि धर्माच्या नावानं राज्यातलं वातावरण बिघडवून देशाच्या प्रगतीत अडसर निर्माण
करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी
म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय विभागानं मुंबई
इथं आयोजित केलेल्या कृतज्ञता गौरव सोहळ्यात काल ते बोलत होते. सध्या प्रसार
माध्यमांमधून सामान्य माणसांच्या
प्रश्नाला बगल दिली जात असून कोणाची सभा आहे, हनुमान
चालिसाचं काय आणि भोंग्यांबाबत कोण काय बोलणार याचीच चर्चा दिवसभर सुरु असते. या
चर्चेनं महागाई आणि बेरोजगारीसारखे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत अशी टीका ही पवार यांनी यावेळी केली.
****
विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा- फेमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी चिनी
स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वर काल
सक्तवसुली संचालनालय-ईडीनं कारवाई करुन साडे ५ हजार कोटी
रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. शाओमी इंडियानं
रॉयल्टीच्या माध्यमातून बेकायदेशीर रित्या पैसे मिळवत फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचं
स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ही कंपनीनं आपल्या चीनमधील
मूळ कंपनीला फायदा पोहोचवल्याचं तसंच परदेशात पैसे पाठवताना कंपनीनं बॅंकांना खोटी
माहिती दिल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
****
देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे
यांनी काल पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे , देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या पदावर नियुक्ती
होणारे पहिले लष्करी अधिकारी आहेत.
मावळते लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांना काल सकाळी
नवी दिल्ली इथं लष्करानं गार्ड ऑफ ऑनरनं सन्मानित केलं. लष्कर प्रमुख म्हणून जनरल
मनोज नरवणे यांनी दिलेल्या योगदानामुळे देशाचं लष्करी सामर्थ्य आणि सामरिक तयारी
मजबूत झाल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं
आहे.
****
शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के
राखीव जागांवरील प्रवेशासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश
प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत ५७ हजार ९९ प्रवेश निश्चित झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या
दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या खासगी शाळांमधील प्रवेशाची ही
प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर
यांनी दिली आहे.
****
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदी माजी
खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांची काल फेरनिवड झाली आहे. काल औरंगाबाद इथे
झालेल्या परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर
डॉक्टर काब्दे यांनी परीषदेची कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये उपाध्यक्षपदी डॉक्टर
सोमनाथ रोडे, सचिवपदी प्राचार्य जीवन देसाई, तर कोषाध्यक्षपदी द. मा. रेड्डी आणि सहसचिवपदी डॉक्टर मोहन फुले यांची निवड केली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १५५ रुग्ण
आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७७ हजार ७३२
झाली आहे. काल एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं
दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८४३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे.
काल १३५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २८ हजार
८९१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर
९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९९८ रुग्णांवर उपचार सुरू
आहेत.
****
मराठवाड्यात काल नांदेड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू
बाधित रुग्ण आढळला. औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा
रुग्ण आढळला नाही.
****
वाढत्या उन्हाची तीव्रता आणि कोरोना काळानंतर उद्योग
जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी २४ हजार
मेगावॅट वर पोहोचली आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे वीजनिर्मितीत घट झालेली आहे. या
पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या
रोहित्रांची क्षमता आणि त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम २१ एप्रिलपासून
राज्यभर राबवण्यात आली. या मोहिमेत वीजतारांवरील ५१ हजार ५९७ अवैध जोडण्या खंडीत
करण्यात आल्या.
****
केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा जनतेनं लाभ
घ्यावा असं आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जालन्यातल्या रामनगर इथं आयोजित आरोग्य
मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर काल ते बोलत होते. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५
लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,
प्रधानमंत्री मातृत्व योजना यासारख्या अनेक योजनांचा नागरिकांना लाभ
होत असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं. जिल्ह्यात
बदनापूर, परतूर आणि राजूर इथंही काल
आरोग्य मेळावा घेण्यात आला. आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या मेळाव्यांचं
उद्घाटन करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात शिल्लक राहिलेल्या ऊसासाठी इतर
राज्यातून हार्वेस्टर यंत्राची व्यवस्था करण्यात यावी, जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई देण्यात यावी,
या मागण्यां करिता अंबाजोगाई इथं आमदार नमिता मुंदडा यांनी काल धरणं
आंदोलन केलं. या आंदोलनात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
बीड जिल्हा रुग्णालयात आज महाराष्ट्र दिना पासून
केमोथेरपी उपचार केंद्र सुरू होत आहे. दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेला हा प्रकल्प
कोविड प्रादुर्भावामुळे सुरू करता आला नव्हता.
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी विशेष प्रयत्नातून सुरू होत
असलेल्या या उपचार केंद्रात कर्करुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर तसंच परिचारिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
****
जालना शहरात ढवळेश्वर परिसरातल्या राजुरेश्वर
क्लिनिकमध्ये अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याच्या माहितीवरून
आरोग्यविभागसह पोलीस पथकानं काल छापा टाकला. या ठिकाणी एका महिलेची गर्भलिंग निदान
चाचणी करण्यात येत असल्याचं समोर आलं. मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू
होता. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या फिर्यादीवरून क्लिनिक चालवणारा बोगस डॉक्टर
संदीप गवारे याच्यासह अन्य चार साथीदारांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. या कारवाईत पथकानं क्लिनिकमधून गर्भपाताच्या गोळ्या, सोनोग्रॉफी यंत्र, रोख रक्कम आणि अन्य साहित्यही
जप्त केलं असून, क्लिनिकला टाळं ठोकलं आहे.
****
No comments:
Post a Comment