Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 August
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१४ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
· स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांना संबोधित करणार
· ‘हर घर तिरंगा अभियान उत्साह आणि जल्लोषात सुरू, देशभर राष्ट्रप्रेमाची लाट
· औरंगाबादमध्ये शंभर फूट स्मारक ध्वजाचं
लोकार्पण
· एकाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही- मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे
· मंत्रीपद न मिळाल्यानं आपण
नाराज नाही- माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा खुलासा
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ४० रुग्ण, मराठवाड्यात
६८ बाधित
· अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांचं जात
प्रमाणपत्र वैध
· आणि
· जालन्याच्या उर्मी संस्थेचे प्रतिभावंत कवी आणि कलावंतांना देण्यात येणारे
राज्य पुरस्कार घोषित
****
देशाचा शहात्तरावा स्वातंत्र्यदिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्य मिळून
उद्या ७५ वर्ष पूर्ण होतील. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू आज देशवासियांना संबोधित करतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून
सायंकाळी सात वाजेपासून राष्ट्रपतींच्या भाषणाचं थेट प्रसारण होणार आहे. रात्री
साडे नऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमधून अनुवाद प्रसारित केला जाईल.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या हर घर
तिरंगा उपक्रमाला कालपासून सुरुवात झाली. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झालेल्या या अभियानामुळे देशात राष्ट्रप्रेम आणि
देशभक्तीची मोठी लाट आली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. अमृत
महोत्सवानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
औरंगाबाद जिल्ह्यात या उपक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं दिसून
आलं. शहराच्या सर्वच भागात अनेक नागरिकांनी आपापल्या घरांवर, दुकानांवर तसंच आस्थापनांवर तिरंगा ध्वज उभारला आहे. हा
ध्वज घेण्यासाठी काल सकाळीही नागरिकांनी टपाल कार्यालयं, तसंच महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. महानगरपालिकेच्या
सांस्कृतिक विभागानं शहरातील पुरवठादारांच्या मार्फत एक लाख २१ हजार ध्वज खरेदी
करुन मोफत वाटप केल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे. उद्या
स्वातंत्र्यदिनापर्यंत हे ध्वज रात्रंदिवस फडकते ठेवता येणार आहेत.
औरंगाबाद इथल्या सुभेदारी विश्रामगृहासमोरच्या सिटी सेंटर इथं उभारण्यात
आलेल्या शंभर फूट स्मारक ध्वजाचं लोकार्पण, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
सामाजिक दायित्व निधीतून डीके फ्लॅग फाऊंडेशनच्या वतीनं हा शंभर फूट उंच
राष्ट्रध्वज उभारण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी
यावेळी दिली. शहरात उंच ध्वज स्तंभांवर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजांची संख्या आता तीन
झाली आहे.
****
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भोकरदन इथल्या
निवासस्थानी कुटुंबियांसमवेत तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर बोलताना दानवे यांनी, प्रत्येक नागरिकाने हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन
आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असं
आवाहन केलं. दानवे यांच्या हस्ते काल अनेक शाळा, महाविद्यालयांमध्येही ध्वजारोहण करण्यात आलं.
****
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने काल वाहन फेरी आणि एकता दौड
काढण्यात आली. या उपक्रमाला बीडवासियांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. हुतात्मा
स्मारकास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते या
दौडला सुरवात करण्यात आली. दौडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना जिल्हाधिकाऱ्यांच्या
हस्ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं.
परळी शहरात तब्बल दीडशे फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. आमदार
धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून, राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
****
नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फ्रीडम वॉल या स्पर्धेला शैक्षणिक
संस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कृषीतंत्र महाविद्यालयाच्या संरक्षक
भिंतीवर स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित १६ आकर्षक चित्रं स्पर्धकांनी काढली. या
स्पर्धेत प्रथम क्रमांक ललित कला अकादमी, नांदेड चित्रकला शिक्षक यांना प्रथम, किड्स किंग्डम यांना द्वितीय तर नागार्जुन पब्लिक स्कूल यांना तृतीय क्रमांक
मिळाला. ही भिंत ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची साक्षीदार बनली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त प्राचीन नळदुर्ग
किल्ल्यावर, तुळजापूरच्या तुळजाभवानी
मंदिराच्या महाद्वारावर आणि महसूल उपविभाग कळंब यांच्या निजामकालीन कार्यालयवर
भारतीय ध्वजाच्या रंगांत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हैदराबाद
मुक्तिसंग्रामाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला यावर्षी प्रारंभ होत आहे.
****
नांदेड जिल्ह्यात तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या किनवट तालुक्यातल्या कोलामपोड
या अतिदुर्गम आदिवासी कोलामवस्तीवर काल "घरोघरी तिरंगा" चा अभिनव
शुभारंभ करण्यात आला. चारी बाजूने डोंगर रांगेत असलेले आदिवासी पाडेही या उत्सवात
सहभागी झाले. अवघ्या १५ उंबरठयाच्या कोलामपोड इथल्या या उत्सवाला साक्षीदार
होण्यासाठी आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर, आदी
उपस्थित होते.
****
लातूर महानगरपालिकेनं शहरात
विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे. 'हर
घर तिरंगा' ही मोहीम प्रभावीपणे राबवली
जात आहे. या उपक्रमांच्या जनजागृतीसाठी काल मनपाच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात
आली.
****
१४ ऑगस्ट हा दिवस फाळणी दु:खद स्मृती दिन म्हणून पाळण्यात येत आहे.
यानिमित्ताने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सभागृहात चित्रप्रदर्शन
भरवण्यात येत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून जास्तीत जास्त नागरिकांनी
प्रदर्शन पाहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे.
अहमदनगर इथं, भारतीय
स्टेट बँक आणि केंद्र शासनाच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं. फाळणी दरम्यान
तत्कालीन नागरिकांना भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टांचं चित्र स्वरूपात दर्शन या
प्रदर्शनातून घडवण्यात आलं आहे. अनेक नागरिकांनी या प्रदर्शनला भेट दिली.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते या
प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. तर नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात
भरवलेल्या या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते
होणार आहे.
औरंगाबादमध्ये स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित चित्र प्रदर्शनाचं केंद्रीय अर्थ
राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. रेल्वे स्थानक
परिसरात उभारलेलं हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी
खुलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून केंद्र सरकारच्या वतीनं, कोविड प्रतिबंधक लसीची खबरदारीची मात्रा ७५ दिवस मोफत
देण्याचा निर्णय घेतला. गेल्या सुमारे महिनाभरापासून ही लस मात्रा मोफत मिळत आहे.
पात्र नागरिकांनी खबरदारीची मात्रा घेऊन कोविडपासून सुरक्षित होण्याचं आवाहन आमदार
राणा जगजीतसिंह पाटील यांनी केलं आहे.
“आदरणीय पंतप्रधान महोदयांनी पंच्याहत्तर दिवसांसाठी तिसरा जो बुस्टर डोस आहे व्हॅक्सीनचा,
तो देण्याची सोय केलेली आहे. आपल्या सर्वांना माझं आवाहन आहे की, आपण कृपया बुस्टर
डोस जो आहे, तो लवकरात लवकर घ्यावा आणि आपल्याला, आपल्या परिवाराला पोटेक्ट करावं,
संरक्षित करावं कोविडपासून.”
****
‘स्वराज - स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ ही लघुपट मालिका दूरदर्शनवर दर रविवारी रात्री ९ ते १० या
वेळेत प्रसारित होणार आहे. या मालिकेचा पहिला भाग आज प्रसारित होईल. डच, फ्रेंच, पोर्तुगीज
तसंच इंग्रज वसाहतवाद्यांच्या विरोधात उठाव केलेल्या ७५ ज्ञात - अज्ञात
स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर ही मालिका आधारित आहे. १५ व्या शतकापासून २० व्या
शतकाच्या मध्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, राणी
लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर सावरकर, मॅडम भिकाजी कामा, राणी आबक्का, बक्षी
जगबंधू, तिरोत सिंग, तिलका मांझी यांसारख्या स्वातंत्र्यावीरांचा गौरवशाली
इतिहास या माध्यमातून दाखवला जाणार आहे.
****
स्वातंत्र्योत्तर काळातला देशाचा प्रवास कथन करणारी एक मालिका नवी दिल्लीचा आकाशवाणी समाचार विभाग उद्यापासून प्रसारित करणार आहे. दररोज ९० सेकंद म्हणजे दीड मिनिटाच्या या
ध्वनिफितीत पहिल्या स्वातंत्र्यदिनापासूनचा भारताचा इतिहास सांगितला जाईल. समाज
माध्यमांवरूनही याच प्रसारण केलं जाईल.
****
एकाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही. मी कोणालाही दगा दिलेला नाही, माझं काम प्रामाणिकपणे केलं आहे. अन्याय झाला म्हणूनच आपण
उठाव केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाण्यातील डॉ. काशीनाथ
घाणेकर नाट्यगृहात मुख्यमंत्री शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर
यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी काल ते बोलत होते. आगामी महापालिकेच्या निवडणुकाही शिवसेना- भारतीय जनता पक्ष एकत्रित लढवणार असल्याचंही त्यांनी
स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री पद म्हणजे जनतेचा आशीर्वाद असून या संधीचं सोनं करून दाखवणार आहे.
सध्या कार्यकर्त्यानं
मुख्यमंत्री बनायचे नाही का असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. १०० वं अखिल भारतीय साहित्य संमेलन ठाण्यात होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी घोषित केलं.
****
मंत्रीपद न दिल्यानं
मी नाराज नाही असा खुलासा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. बीड
जिल्ह्यातल्या परळीत काल त्या बोलत होत्या. कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे, त्यामुळेच मी नाराज नाही, ज्या दिवशी माझी मंत्री पदासाठी पात्रता योग्य वाटेल तेव्हाच पक्ष मला
मंत्रीपद देईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी
मंत्रीमंडळात महिलांना नक्कीच संधी मिळेल अशी अपेक्षा असून जर तसं झालं नाही तर
महिला आमदारांना संधी द्यावी अशी सक्तीची मागणी करू असंही मुंडे यांनी यावेळी
सांगितलं
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ४० रुग्ण आढळले. त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ७० हजार २५८ झाली आहे. काल या संसर्गानं एका रुग्णाचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १६८ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ४८ रुग्ण बरे झाले.
राज्यात आतापर्यंत, ७९
लाख दहा हजार २४३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
११ हजार ८४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ६८
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या २८, औरंगाबाद १६, बीड ९ ,जालना ७, उस्मानाबाद ५, हिंगोली २ तर परभणी जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा समावेश आहे.
****
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांचं जात
प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक
यांच्यासह चार जणांनी जात पडताळणी समितीकडे वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली
होती. प्रशासकीय सेवेतील नोकरी मिळवताना वानखेडे यांनी आपली खोटी जात सांगितली, मात्र ते धर्मानं मुस्लीम असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. मात्र, समीर आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं कुठंही
सिद्ध होत नाही, तसे कोणतेही पुरावे
सापडलेले नाहीत. त्यामुळे या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचं जात प्रमाणपत्र
पडताळणी समितीनं म्हटलं आहे.
****
साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या जालना इथल्या उर्मी संस्थेच्यावतीने
प्रतिभावंत कवी, कलावंतांना देण्यात
येणाऱ्या राज्य पुरस्कारांची
घोषणा काल करण्यात आली. उर्मीचे संस्थापक प्रा. जयराम खेडेकर आणि सचिव डॉ.
चंद्रकांत गायकवाड यांनी जालना इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दिवंगत माजी
खासदार अंकुशराव टोपे यांच्या स्मृतिपीत्यर्थ दिला जाणारा २०२१ चा 'नागमणी' पुरस्कार
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महात्मा गांधी मिशन औरंगाबादचे
अंकुशराव कदम यांना, तर
साहित्य क्षेत्रात भाषांतराच्या माध्यमातून योगदान दिल्याबद्दल २०२२ चा नागमणी
पुरस्कार नांदेडचे डॉ. पृथ्वीराज तौर
यांना जाहीर झाला आहे. 'कोलंबस
पुरस्कार' कवितेच्या समग्र
योगदानासाठी कवी प्राध्यापक जयराम खेडेकर यांना जाहीर झाला आहे. आज या
पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे
****
औरंगाबाद इथं सुरु असलेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत अग्नीविरांच्या भरतीत काल एक
हजार ३०० युवकांनी सहभाग घेतला. या युवकांची शारिरीक तपासणी करण्यात येत असल्याची
माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. भरतीसाठी आलेल्या
ज्या युवकांना या भरतीत संधी नाही मिळणार नाही, त्यांना यापुढील पाच भरतीत सहभागी होता येणार असल्याचं, चव्हाण यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment