Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 September 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७
सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं पुन्हा एकदा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया
- पीएफआय या वादग्रस्त संस्थेवर कारवाई केली. महाराष्ट्रासह
आठ राज्यांमध्ये सुमारे २०० ठिकाणी एनआयएनं
छापे मारुन १७० जणांना अटक केली आहे. राज्यात औरंगाबादमधून १३
तर मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातून सात,
सोलापुरातून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक
माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावातून पीएफआयच्या
मोहम्मद इरफान दौलत नदवी आणि रशीद शहदैन शहीद इकबाल यांना,
तर ठाणे इथून चार जणांना अटक करण्यात आली आहे. पीएफआयवर पहिल्यांदा छापेमारी करण्यात आल्यानंतर या संघटनेच्या सदस्यांच्या
चौकशीतून समोर आलेल्या माहितीवरुन ही कारवाई केल्याची माहिती एनआयएनं दिली आहे.
अटक केलेल्या सगळ्यांना आज दुपारी न्यायालयात हजर
करण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या
सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर आज सुनावणी सुरु आहे. ठाकरे गटाचे
वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झाला असून, शिंदे गटाचे वकील नीरज कौल आपली बाजू
मांडत आहेत. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्धव ठाकरे
आणि एकनाथ शिंदे यांच्या गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर ही सुनावणी होत आहे.
दरम्यान,
सर्वोच्च न्यायालयाच्या वेब कास्ट डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश एस सी इंडिया या मंचावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणाऱ्या सुनावण्यांचं आजपासून
थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख आठ हजार २५३ नागरीकांचं
लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१७ कोटी ८२
लाख ४३ हजार ९६७ मात्रा देण्यात
आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार
२३० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर चार हजार २५५ रुग्ण बरे झाले.
देशात सध्या ४२ हजार ३५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जागतिक पर्यटन दिन आज साजरा होत आहे. युनायटेड नेशन
वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशननं यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाचं घोषवाक्य, रिथिंक टुरिझम अर्थात पर्यटनाचा पुनर्विचार, हे ठरवलं
आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयं,
पर्यटक निवासे, उपहारगृहं, माहिती केंद्रं तसंच कलाग्राम परिसरात या निमित्तानं पर्यटन
सप्ताह साजरा होणार आहे.
****
नाशिक आणि अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या, तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या विभागांमध्ये शिक्षक
मतदारसंघाच्या निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. त्यासाठी येत्या एक ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत पात्र शिक्षक
तसंच पदवीधरांनी अर्ज सादर करावेत, असं आवाहन राज्याचे मुख्य
निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपाडे यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातल्या १०२
गावात ६९८ जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख १७ हजार १३१ गाय वर्गीय जनावरांचं लसीकरण करण्यात
आल्याचं, पशुसंवर्धन विभागानं सांगितलं. जिल्ह्यात आतापर्यंत
२८ जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. तीन लाख १७ हजार १३१ जनावरांना लस देण्यात आली असून, दररोज ४८ हजार जनावरांना लस देण्यात येत आहे. उर्वरित दोन लाख २१ हजार
४४१ जनावरांना लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं
दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात गुरु धानोरा ते मुर्शिदाबाद रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा रस्ता दुरुस्त
करुन तात्काळ रहदारीस मोकळा करण्यात यावा, या मागणीसाठी,
मुर्शिदाबाद इथल्या ग्रामस्थांनी काल गंगापूर तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं जरजरी जरबक्ष उर्स दोन ऑक्टोबरपासून
सुरु होत आहे. त्याअनुषंगानं, जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल प्रशासन आणि दर्गाह समितीच्या
पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. उर्स निमित्तानं येणाऱ्या भाविकांसाठी
सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात
उर्स साजरा करावा, असं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.
****
भारत
आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाहिला सामना
उद्या तिरुवनंतपुरम इथं खेळला जाणार आहे. टी ट्वेंटी सामन्यांच्या
मालिकेनंतर दोन्ही संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळली जाणार
आहे.
****
हवामान -
येत्या दोन दिवसात, कोकण, मध्य महाराष्ट्र
आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली
आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा
कडकडाट होण्याची शक्यता आहे.
//********//
No comments:
Post a Comment