Tuesday, 27 September 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.09.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर आज सुनावणी होत आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सुनावणी होईल.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या वेब कास्ट डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश एस सी इंडिया या मंचावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणाऱ्या सुनावण्यांचं आजपासून थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बंगळुरू इथं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या क्रायोजेनिक इंजिन उत्पादन केंद्राचं उद्घाटन करणार आहेत. या इंजिनांचा वापर इस्रो आपल्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी करते. दक्षिण विभागीय विषाणूशास्त्र संस्थेची पायाभरणी, आणि सेंट जोसेफ विद्यापीठाचं उद्घाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जपानची राजधानी टोकियो इथं पोहोचले. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट घेऊन भारत-जपान द्वीपक्षीय संबंधांबद्दल आणि विविध क्षेत्रातल्या परस्पर सहकार्याबद्दल त्यांनी चर्चा केली. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरच्या शासकीय अंत्यसंस्कारात आज पंतप्रधान सहभागी होणार आहेत.

****

भारताच्या आघाडीच्या मुंबई शेअर बाजाराला यापुढे आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक सुवर्ण व्यवहार सुरु करण्यासाठी, भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीनं अंतिमतः मान्यता दिली आहे. या प्रस्तावाला गेल्या फेब्रुवारी महिन्यात तत्वतः मान्यता देण्यात आली होती.

****

सीयूईटी-पीजी अर्थात सामायिक विद्यापीठ पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचे निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केले. परीक्षार्थी आपला निकाल सीयूईटी डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉ इन या संकेतस्थळावर पाहू शकतात.

****

महाराष्ट्र शिक्षक विशेषाधिकार संघटना - मुप्टाच्या वतीनं काल औरंगाबाद इथं निदर्शनं करण्यात आली. शिक्षकांना मुख्यालयी राहणं बंधनकारक करणं, तसंच घरभाडे बाबत पुरावे मागणी आणि पुरावे नसेल तर घरभाडे कपातीचे आदेश जिल्हा परिषदेने काढले आहेत. या सर्वांच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला.

//********//

 

 

No comments: