Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३०
सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
भारतीय रिझर्व्ह
बँकेने रेपो दरात अर्धा टक्क्यांनी वाढ केली असून, आता रेपो दर पाच पूर्णांक नऊ दशांश
टक्के झाला आहे. बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत
दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण देशांतर्गत
उत्पन्नातली वाढ ही अपेक्षेपेक्षा कमी राहिली असून, ही वाढ १३ पूर्णांक पाच टक्के आहे.
ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सर्वाधिक वाढ असल्याचं दास यांनी सांगितलं.
कोरोना महामारी,
रशिया-युक्रेन युद्धाचा, जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर परिणाम जाणवत आहे. महागाईवरील
नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय हा पाच
विरुद्ध एक अशा बहुमताने घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. देशातल्या ग्रामीण भागात
मागणी वाढली असून, गुंतवणुकीतही सुधारणा दिसून येत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत
महागाईचा दर सहा टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी यावेळी व्यक्त केला.
****
निवृत्त
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी देशाचे दुसरे सरसेनाध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला.
सरसेनाध्यक्ष चौहान यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन युद्धातल्या
हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत, ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या अतुलनीय
योगदानाबद्दल अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळी
प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मराठी चित्रपट
‘फ्यूनरल’ ला गौरवण्यात येणार आहे, तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून ‘सुमि’ चित्रपटाला
पारितोषिक देण्यात येईल. ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट
पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात येणार आहे.
****
केंद्रीय
गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयनं आंतरराष्ट्रीय अमंली पदार्थाच्या तस्करीचं जाळं नेस्तनाबुत
करण्यासाठी गरुड ही विशेष मोहिम सुरु केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय, इंटरपोल आणि
अंमली पदार्थ विरोधी दलाच्या समन्वयानं ही मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून
विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शोध मोहिम, धाडी आणि अटकसत्र राबवणार
आहे. यामध्ये आतापर्यंत १७५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याक़़डून मोठ्या प्रमाणात
अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
****
पावसाळा
संपत असताना यंदा राज्यातल्या धरणांमधल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे
साडे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा कोकण विभागात सर्वाधिक ९३ पूर्णांक २२ टक्के
पाणीसाठा असून, औरंगाबाद विभागात सर्वात कमी ८७ टक्के पाणीसाठा आहे. राज्यातली लहान
मोठी ३४ धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.
****
कांदा निर्यातीबाबत
केंद्र शासनाच्या धोरणामुळे उत्पादकांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप करत काल नाशिक
जिल्ह्यातल्या मालेगाव इथं शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलं.
किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत खरेदी केलेला कांदा सरकारने बाजारात आणू नये, कांदा
निर्यात बंदीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने भरपाई द्यावी, जीवनावश्यक वस्तुंच्या
सुचीतून कांद्याला कायमस्वरुपी वगळण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
औरंगाबाद
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी जिल्ह्यातल्या
विकास कामांचा काल आढावा घेतला. विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे
अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. क्रीडा प्रेमी आणि खेळाडू यांच्या
मागणीनुसार विभागीय संकुलामधल्या सर्व सुविधा दोन ऑक्टोबरपासून रविवारी सुद्धा उपलब्ध
करुन देण्याचे आदेशही भुमरे यांनी दिले.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात ज्या शिधापत्रिकाधारकांची आधार क्रमांक जोडणी झालेली नाही, त्यांच्यासाठी
जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानामार्फत दोन ऑक्टोबर रोजी विशेष शिबीरांचं आयोजन करण्यात
आलं आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी ही माहिती दिली. आधार क्रमांक
जोडणी झाली नसल्यास त्यांनी १५ ऑक्टोबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा नियमानुसार
कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही भोसले यांनी दिला.
****
अहमदाबाद
इथं सुरु असलेल्या ६३व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत नेमबाजीत महाराष्ट्राच्या रुद्रांश
पाटीलने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलं. यासोबतच राज्याचं
सुवर्ण पदकाचं खातं देखील उघडलं आहे. महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष रग्बी संघाने
अंतिम फेरीत धडक मारली आहे. राज्याच्या महिला खोखो संघाने यजमान गुजरात संघाचा एक डाव
आणि सहा गुणांनी पराभव केला.
****
No comments:
Post a Comment