Friday, 30 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 September 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      अतिवृष्टीच्या निकषांत न बसणाऱ्या नऊ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मराठवाड्यातल्या नांदेड वगळता सर्व जिल्ह्यांचा समावेश

·      स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर आता वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त दोन सिलेंडर्स मिळणार

·      अविवाहित महिलांना देखील गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

·      भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ

·      राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नांदेडला अभिजित राऊत तर उस्मानाबादला सचिन ओंबासे नवे जिल्हाधिकारी

·      केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद आणि बीडमधील कार्यालयांना टाळं

आणि

·      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून खरी शिवसेना वाचवल्याचा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा दावा

 

सविस्तर बातम्या

अतिवृष्टीच्या निकषांत न बसणाऱ्या राज्यातल्या नऊ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून जवळपास ७५५ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचा पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यावर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. निकषात बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं यापूर्वीच मदत घोषित केली आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे साडे चार हजार कोटी रुपयांच्या निधीचं शासनानं वाटप केलं आहे. या निर्णयाचा मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना, तसंच यवतमाळ आणि सोलापूर जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांना लाभ होईल. राज्य आपत्ती निवारण दलाच्या निकषाप्रमाणे जर मदतीचं वाटप केलं असतं, तर केवळ दीड हजार कोटी रुपयांची मदत वाटप झाली असती. मात्र निकषाच्या पलीकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव लाभ मिळणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर एका जोडणीवर आता एका वर्षात एकूण १५ सिलेंडर्स तर एका महिन्यात दोन सिलेंडर्स देण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या संदर्भात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांना, वर्षभरात अमर्यादित सिलेंडर्स मिळत होते. अनुदानित घरगुती गॅस जोडणी धारकांना वर्षभरात फक्त १२ सिलेंडर्स मिळणार असून, त्याहून अधिक सिलेंडर्सची गरज भासल्यास जास्तीचे सिलेंडर्स विनाअनुदानित दरानं घेता येईल. सिलेंडर संदर्भातल्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून, याची तातडीनं अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी करण्यासंदर्भातील अनेक तक्रारी येत असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.

****

अविवाहित महिलांना देखील गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सुरक्षित आणि कायदेशीरररित्या गर्भपात करण्यासाठी सर्व महिला पात्र असून, त्यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कुठलाही भेदभाव करणं असंवैधानिक असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं. अविवाहित महिलेनं परस्पर संमतीने ठेवलेल्या शरीरसंबंधांनंतर गर्भधारणा झाली असल्यास तिला गर्भधारणेच्या २० ते २४ व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी मिळेल, असं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं सांगितलं. बलात्कारानंतर वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्याच्या तरतुदीअंतर्गत वैवाहिक संबंधांतून झालेल्या बलात्काराचाही समावेश करता येईल. मात्र त्यासाठी बलात्कार झाल्याचं सिद्ध व्हावं लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. समाजातल्या संकुचित पितृ सत्ताक रूढींच्या आधारे कोणत्याही कायद्याचा फायदा उचलू नये, यामुळे कायद्याचा उद्देश संपून जाईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

चारचाकी वाहनामध्ये सहा `एअरबॅग` अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची पुढील वर्षी एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमातल्या एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. जागतिक पुरवठा साखळीच्या संकटानंतर वाहन उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २०२२ - २३ या आर्थिक वर्षात, भारतीय टपाल खात्याच्या तिसऱ्या तिमाहीसाठी, बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. किसान विकास पत्रावरील व्याज दरामध्ये सहा पूर्णांक नऊ टक्क्यांवरुन सात टक्के वाढ करण्यात आली असून, त्याचा कालावधी १२३ महिने इतका करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजदर सात पूर्णांक सहा टक्के तर, मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर सहा पूर्णांक सात टक्के करण्यात आला आहे. पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या मुदत ठेवीवर पाच पूर्णांक सात टक्के तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीवर पाच पूर्णांक आठ टक्के इतका व्याजदर देण्यात येणार आहे. मात्र एक वर्षांच्या मुदत ठेव योजनावरील व्याजदरात, तसंच पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि राष्ट्रीय बचत पत्रांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

****

गावांमध्ये कायम स्वच्छता आणि ग्रामस्थांचं आरोग्य सुधारण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घ्यावा, असं आवाहन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. स्वच्छता के लिए एकजुट भारत मोहिमेअंतर्गत, ऑनलाईन सरपंच संवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते. गावातल्या कचराकुंड्या आणि असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती उपक्रम, श्रमदान यासारखे उपक्रम घ्यावेत, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्राची निर्मिती, प्लॅस्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन, एकल प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल सभा घ्याव्यात, पाणवठ्याजवळचा परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण, इत्यादी विविध उपक्रम सरपंचानी आयोजित करावेत, असं आवाहन पाटील यांनी केलं.

****

राज्य सरकारनं काल ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विकास मीना यांची, तर जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून सचिन ओंबासे, नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी अभिजित राऊत, तर नांदेड महानगरपालिका आयुक्तपदी डॉ. भगवंतराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. लातूर महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल आणि किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी किर्ती पुजार यांची देखील बदली झाली आहे.

****

औरंगाबाद, जालना, आणि बीड जिल्ह्यात भगरीच्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, राज्यात भगर विक्री करणाऱ्या सर्व उत्पादक आणि विक्रेत्यांकडील प्रति जिल्हा दहा नमुने तपासणी करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत. अन्न, औषध तसंच सौदर्य प्रसाधनांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

****

२०१४ साली एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना - कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं असेल तर त्यात तथ्य असणं स्वाभाविक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असंही त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. भारतीय जनता पक्षामध्ये पंकजा मुंडे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २० हजार ९५४ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३३८ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल ६०४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६९ हजार ३४० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या तीन हजार २७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ४९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २१, औरंगाबाद ११, लातूर दहा, जालना चार, नांदेड दोन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

****

केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया- पीएफआय या संघटनेच्या औरंगाबाद शहरातल्या जिन्सी भागातल्या कार्यालयाला पोलिसांनी काल टाळं ठोकलं. पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांच्या स्वाक्षरीनं ही टाळेबंदी करण्यात आली. या संदर्भात कार्यालयाला नोटीस देण्यात आली असून, केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय स्थानिक पोलिसही पीएफआयविरुद्ध कारवाई करत आहेत. कार्यालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा -एनआयए आणि दहशतवादी विरोधी पथकानं औरंगाबादच्या अनेक भागात छापे टाकून पीएफआयच्या १३ सदस्यांना अटक केली आहे.

बीड इथल्या पीआयएफच्या जिल्हा कार्यालयाला देखील टाळं ठोकण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावानं पालक गमावलेली बालकं शासनाच्या अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या बालकांचे चारशे पंचवीस अर्ज प्राप्त झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून खरी शिवसेना वाचवल्याचं, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. जालना इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात ते काल बोलत होते. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे देशाचं लक्ष लागल असून, मुख्यमंत्र्यांची अपेक्षापूर्ती होईल, असा विश्वास सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.

****

बीड जिल्ह्यात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी यासारख्या विषयांवर गीतरचना करुन लोकशाहीसंबंधी जागृती करता येईल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विषयांशी संबंधित लोकगीत गाऊन त्याची दोन ते पाच मिनिटांची ध्वनि चित्रफीत ३१ ऑक्टोबर पर्यंत पाठवावी. विजेत्यांना रोख बक्षिसं, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. प्रवेश अर्ज तसंच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या संकेत स्थळावर संपर्क करण्याचं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

किन्नरांचा आदर करून त्यांनाही आपल्या प्रवाहात सामावून घेतलं पाहिजे, असं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी म्हटलं आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीनं निर्मिती करण्यात आलेल्या, “मिशन गौरी, या किन्नरांच्या विकास प्रवाहावर आधारित लघुपटाच्या सामुहिक अवलोकनानंतर, ते काल बोलत होते. या विद्यापिठाअंतर्गत उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा किंन्नरांना उपलब्ध करून देऊ असं आश्वासनही भोसले यांनी यावेळी दिलं.

****

बीड जिल्ह्यात सेवा पंधरवडा अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीनं तृतीयपंथीयांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांनी तृतीयपंथीयांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्रासाठीची कार्यपद्धती सांगितली. तसंच त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं. यावेळी ऑनलाईन आवेदन केलेल्या चार तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं.

****

जालना जिल्हा परिषदेतच्या सभागृहात काल जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा घेण्यात आली. सर्व ग्रामपंचायतींनी येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत गावात प्लॉस्टिक वापरावर बंदीचा ठराव घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता विद्या कानडे यांनी यावेळी केलं. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत गावात स्वच्छता, प्लॉस्टिक वापरावर बंदी यासह कचरा संकलन, वृक्ष लागवड आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी सोळा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितलं. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला उद्यापासून सुरुवात होत आहे. ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटनेनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी कालपासून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केलं आहे. बिनशर्त शासकीय सेवेत सामावून घ्यावं, अशी यातली प्रमुख मागणी आहे.

****

No comments: