Tuesday, 27 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.09.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 September 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ सप्टेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

·      शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

·      मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचं पुनर्गठन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

·      वादग्रस्त संस्था पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर देशभरात २०० ठिकाणी छापे; १७० जणांना अटक

·      २०२० या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर

आणि

·      लंपी आजारासाठी खासगी दवाखान्यातील उपचारांचा राज्य सरकार परतावा देणार

****

शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायालयाच्या घटनापीठासमोर आज ही सुनावणी झाली. शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे अर्ज करत, धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आयोगाची कार्यवाही स्थगित करण्याची मागणी ठाकरे गटानं केली होती, ही मागणी न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

दरम्यान, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिकांवरची सुनावणी आज पूर्ण झाली. सरन्यायाधीश उदय ललित यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं गेले सात दिवस ही सुनावणी घेतली. मात्र या याचिकांवरचा निकाल न्यायालयानं राखीव ठेवला आहे.

****

राज्यातल्या मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचं पुनर्गठन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पोलीस शिपाई संवर्गातली २०२१ मधली सगळी रिक्त पदं भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट देण्याचा, तसंच एकूण वीस हजार पदं भरण्यालाही राज्यमंत्रिमंडळाने मान्यता दिली.

इतर मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतरच्या शिक्षणासाठी बहात्तर वसतीगृहं सुरू करणं, तसंच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातल्या गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठीची शिष्यवृती दरवर्षी पन्नास विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढवणं, राज्यात फोर्टिफाईड तांदुळाचं दोन टप्प्यात वितरण, वन विभागाचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा वणवा, तस्कर-शिकाऱ्यांच्या हल्ला अथवा वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास किंवा कायमचं अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणं, राज्यातल्या शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयातल्या पूर्णवेळ ग्रंथपाल आणि शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग, तर दुय्यम न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करणं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तांत्रिक समितीकडे सादर करण्यात आला असून, या प्रकल्पासाठी लवकरच मान्यता दिली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज निळवंडे, कुकडी सिंचन आणि गोदावरी कालवा प्रकल्पांच्या कामाबाबत मंत्रालयात बैठक झाली, त्यानंतर ते बोलत होते.

****

देशभरातल्या सगळ्या ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट्स अर्थात पीसीसी साठी अर्ज करण्याची सुविधा उद्यापासून मिळणार आहे. यामुळे पीसीसी साठीची तारीख लवकर मिळू शकेल. या निर्णयामुळे, परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांची पीसीसीसाठीची प्रक्रिया सोपी होणार आहे.

****

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं १० ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली आहे. राऊत यांच्या वकिलांनी जामीन अर्जाबाबत आज आपली भूमिका मांडली. सक्तवसुली संचालनालय ईडीच्या वतीनं येत्या १० ऑक्टोबरला युक्तिवाद केला जाणार आहे. त्यानंतरच न्यायालय राऊत यांच्या जामीन अर्जावर निर्णय देईल.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं आज पुन्हा एकदा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या वादग्रस्त संस्थेवर कारवाई केली. महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये सुमारे २०० ठिकाणी एनआयएनं छापे मारुन १७० जणांना अटक केली आहे. राज्यात औरंगाबादमधून १३, मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातून सात, तर सोलापुरातून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावातून पीएफआयच्या मोहम्मद इरफान दौलत नदवी आणि रशीद शहदैन शहीद इकबाल यांना, तर ठाणे इथून चार जणांना अटक करण्यात आली आहे. पीएफआयवर पहिल्या कारवाईत अटक केलेल्या सदस्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीवरुन ही कारवाई केल्याची माहिती एनआयएनं दिली आहे.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद' ची घोषणाबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी 'पीएफआय'च्या सहा कार्यकर्त्यांना आज ताब्यात घेतलं. या संघटनेवर, सामाजिक तेढ निर्माण करणं आणि देशविघातक कारवायांसाठी कट रचणं असे आरोप ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, पीएफआयच्या संभाव्य कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

****

२०२० या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज ही घोषणा केली. येत्या शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार पारेख यांना प्रदान केला जाणार आहे. आशा पारेख यांनी १९५२ साली बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. त्यांचे, कटी पतंग, घराना, बहारों के सपने, मेरा गांव मेरा देश यासह अनेक चित्रपट गाजले. आशा पारेख यांना पद्मश्री पुरस्काराबरोबरच अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या जीवनगौरव पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे.

****

लम्पी आजाराच्या औषधोपचाराचा आणि लसीकरणाचा सगळा खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी लम्पी चर्मरोगाच्या उपचारासाठी खासगी दवाखान्यातून औषधं खरेदी केली आहेत, अशा पशुपालकांनी त्याबाबतची माहिती पुराव्यासह सादर केल्यास, आलेला खर्च त्यांना परत देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात तीस जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून राज्य शासनानं तत्परतेनं त्याला आळा घालण्याच्या उपाय योजना सुरू केल्या आहेत,

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातल्या १०२ गावात ६९८ जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख १७ हजार १३१ गायवर्गीय जनावरांचं लसीकरण करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.

****

No comments: