Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 September 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ सप्टेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
· २०२०-२१ या वर्षासाठीचे राष्ट्रीय
सेवा योजना पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.
· लातूर तसंच औरंगाबाद इथली
अतिविशेषोपचार रुग्णालयं तत्काळ कार्यान्वित करण्यासाठी कामांना गती देण्याचे वैद्यकीय
शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश.
· शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी
महाविकास आघाडीचं औरंगाबाद इथं आंदोलन.
आणि
· कमी कालावधीत जास्त उत्पादन
देणाऱ्या वाणाचा प्रसार आवश्यक - कृषी मंत्री अब्दुल सत्तार.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०२०-२१ या वर्षासाठीचे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार
प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात दोन विद्यापीठं, राष्ट्रीय
सेवा योजनेचे दहा गट, त्यांचे कार्यक्रम अधिकारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३० स्वयंसेवकांचा
हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये मुंबईतले कार्यक्रम अधिकारी सुशील शिंदे
यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आलं. सुशील
शिंदे हे मुंबईच्या ठाकूर विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आहेत.
प्रतिक कदम हा नंदुरबार इथल्या गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी असून
दिवेश गिन्नारे हा नागपूर इथल्या पशू वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. केंद्रीय
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री
निशिथ प्रामाणिक, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
****
लातूर,
औरंगाबाद सह नागपूर आणि यवतमाळ इथं उभारण्यात आलेली अतिविशेषोपचार रुग्णालयं तत्काळ
कार्यान्वित करण्यासाठी कामांना गती द्यावी आणि त्या संदर्भातील अहवाल कालमर्यादेत
सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. ते आज
मंत्रालयात याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्य शासनाने सन २०३० पर्यंत सर्वांना
परवडणाऱ्या उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं असून, यानुसार
प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचं राज्य शासनाने निश्चित
केलं आहे, सर्वसामान्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून
देण्याला प्राधान्य देण्यात येत असून यासाठी आगामी काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची
मदत घेणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली.
****
राज्यात
अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला असून आत्महत्यांचं प्रमाणही वाढत
असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीनं आज औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर
धरणे आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेस
जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या
नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही असा
आरोप यावेळी दानवे यांनी केला. सरकारनं राष्ट्रीय आपत्ती दल - NDRF च्या निकषानुसार
मदतीची घोषणा केली. परंतू ही घोषणा होऊन एक महिना उलटला तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या
खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.
सद्य:परिस्थितीत
मराठवाडयात पंचनाम्याच्या आधारावर अतिवृष्टीमुळे सात लाख ३८ हजार ७५० हेक्टर शेतीचं
नुकसान झालं आहे. तसंच सततच्या पावसामुळे चार लाख ३९ हजार ६२० हेक्टर शेती नुकसानग्रस्त
झालेली आहे. या सर्व स्थितीत आपण त्वरीत शेतकऱ्यांना मदत त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात
यावी, बियाण्यांसाठी सहज पतपुरवठा करावा, यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
****
कमी
कालावधीत येणाऱ्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाचा शेतकऱ्यांमध्ये अधिक प्रसार होणं
आवश्यक असून, कमी कालावधीची पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास, उत्पन्न
वाढेल असं कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी म्हटलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाड
कृषी विद्यापीठ परिसरात शेतकऱ्यांना बियाणे वाटप कार्यक्रमात सत्तार बोलत होते. विद्यापीठाने
मागील दहा वर्षात कोणती वाणं तसंच तंत्रज्ञान विकसित केलं, याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत
पोहचवावी, जमीन, हवामान, पेरेणीची वेळ, वातावरण याची तंतोतंत माहिती दिल्यास, शेतकऱ्यांना
लाभ होईल असं सत्तार म्हणाले. यावेळी कुलगुरु डॉ.इंन्द्र मणि, विभागीय कृषि सहसंचालक
साहेबराव दिवेकर उपस्थित होते. दरम्यान, सत्तार यांनी शिवारातल्या सोयाबीन पीकाची पाहणी
केली.
****
सामाजिक
पुनर्घटनेसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली
होती. पण ते काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जातीविहीन व्हा. स्वातंत्र्य,
समता, बंधुभाव, न्याय यावर आधारित समाज पुनर्रचना करण्याचं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक
डॉ.जर्नादन वाघमारे यांनी केलं आहे. डॉ वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबाद
इथं सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं सत्यशोधक समाज शत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी
अधिवेशन घेण्यात आलं, यावेळी अध्यक्षीय भाषणात वाघमारे बोलत होते. समाज रचनेसाठी फुले,
शाहू, आंबेडकर यांच्या कार्याचा वारसा आणि त्याचा उपयोग कसा करावा हे ठरवणं गरजेचं
असल्याचं डॉ वाघमारे यावेळी म्हणाले. या अधिवेशनाचं उद्घाटन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष
डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते झालं. महात्मा फुले यांचा विचार व्यापक असून, आजही तो
कसा लागू पडतो, या विषयी डॉ.पाटणकर यांनी माहिती दिली. या एक दिवसीय अधिवेशनात विविध
विषयांवर परिसंवाद झाले.
****
देशव्यापी
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून १० लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१७ कोटी ५१
लाखाच्या वर गेली आहे. आज ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली.
आत्तापर्यंत २० कोटी १२ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
राज्यात आज सकाळपासून २५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत
लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ६९ लाखाच्या वर गेली आहे. त्यात
९० लाख १३ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
****
हैदराबाद
मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद इथल्या देवगिरी किल्ल्यावर उद्या सकाळी
सकाळी सात वाजता हेरिटेज वॉक आणि स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली आहे. लोकसंवाद
फाउंडेशन हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवत
आहे. याच शृंखलेतील हा उपक्रम आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी निजामाच्या सैन्याला चकवा
देऊन किल्ल्यावर कसा तिरंगा फडकवला, त्याचा रोमांचक इतिहास यावेळी जाणून घेण्याची संधी
सहभागी होणाऱ्यांना मिळणार आहे.
****
लातूर
जिल्ह्यात मानसिक आरोग्य आढावा मंडळाचा फायदा मानसिक रुग्णांना व्हावा यासाठी प्रयत्न
करावेत, असं आवाहन जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी केलं आहे. मानसिक आरोग्य कायदा
२०१७ अंतर्गत मानसिक रुग्णांचे हक्क अबाधित राहण्यासाठी शासनाने राज्यात एकूण आठ विभागामध्ये
मानसिक आरोग्य आढावा मंडळाची स्थापना केलेली आहे. लातूर विभागाच्या मानसिक आरोग्य आढावा
मंडळाची पहिली बैठक कोसमकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार हजली त्यावेळी त्या बोलत
होत्या.
****
नांदेड
शहरातल्या मतदारांचं निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणी करण्यासाठी उद्या २५ सप्टेंबर रोजी
महानगरपालिकेच्या वतीने शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरी भागातील मतदारांनी आपलं
आधार लिंक करून घ्यावं, असं आवाहन नांदेडचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केलं
आहे.
****
No comments:
Post a Comment