Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 29 September 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला तीन महिने मुदतवाढ देण्याचा केंद्रीय
मंत्रिमंडळाचा निर्णय
· मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाला
परवानगी
· केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ
· लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी नियुक्ती
· भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचं उद्घाटन
· महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं पुढच्या वर्षात होणाऱ्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक
जाहीर
· वीज मीटरचे छायाचित्र न काढता सरासरी देयकं देण्याचे प्रकार बंद करण्याच्या
राज्य सरकारच्या सूचना
आणि
· पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून
विजय
सविस्तर बातम्या
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय
मंत्रिमंडळानं घेतला आहे. कोरोना साथरोगानंतर प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असलेल्या
समाजातल्या कमकुवत घटकांना या योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्यात येतं. ऑक्टोबर ते डिसेंबर
या कालावधीसाठी ही योजना राबवली जाणार असून, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत
येणार्या लाभार्थ्याला प्रती व्यक्ती दरमहा पाच किलो खाद्यान्न उपलब्ध करुन देण्यात
येणार आहे. यासाठी ४४ हजार ७६२ कोटी रुपये खर्च केला जाईल. देशभरातल्या सुमारे ८० कोटी
जनतेसाठी लाभदायक असलेली या योजनेवर एप्रिल २०२० पासून आतापर्यंत सुमारे तीन लाख ४५
हजार कोटी रुपये खर्च झाला आहे.
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह अहमदाबाद आणि नवी दिल्ली रेल्वे
स्थानकाच्या पुनर्विकासाला, केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे. यासाठी सुमारे
दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढच्या दोन ते तीन वर्षांत या रेल्वे स्थानकांचा
पुनर्विकास होणं अपेक्षित असल्याचं, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. देशभरातल्या
१९९ रेल्वे स्थानकांची विकास कामं सुरू आहेत, यामुळे रोजगाराच्या ३५ हजार ७४४ संधी
उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने
मान्यता दिली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ होईल, यासाठी
सरकारी तिजोरीवर १२ हजार ८५२ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
****
निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नवे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ तिन्ही सेनादलाचे अध्यक्ष
म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिवंगत बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नऊ महिन्यांनी
सरकारने नव्या सीडीएसची नियुक्ती केली आहे. चौहान हे भारताच्या लष्करी व्यवहार विभागाचे
सचिव म्हणूनही काम पाहतील असं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
****
राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर पुढची सुनावणी
एक नोव्हेंबरला होणार आहे. शिंदे गटातल्या आमदारांची अपात्रता आणि अन्य वादाच्या मुद्यावर
घटनापीठासमोर सुनावणी प्रलंबित आहे.
****
महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार, असा विश्वास
राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त
केला आहे. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठात, 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाचा
शुभारंभ, आणि महिला आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. कुटुंबाची
सर्व जबाबदारी सांभाळत असताना महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं, त्यांच्या
आरोग्याच्या काळजीतून हे अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या
साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी
दिली.
****
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त काल आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य हस्ते उद्घाटन झालं.
हे महाविद्यालय मुंबईत प्रभादेवी इथल्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रविंद्र
नाट्य मंदिर इथं तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री
सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांना २०२० या
वर्षीचा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना २०२१ या वर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर
पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुढच्या वर्षात होणाऱ्या परीक्षांचं संभाव्य
वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्र अराजपत्रित
गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
एप्रिलमध्ये आणि मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये होईल. नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा
जूनमध्ये तर मुख्य परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
****
वीज मीटरचे फोटो न काढता सरासरी देयके देण्याचे प्रकार बंद करण्याच्या सूचना,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ते काल याबाबतच्या आढावा बैठकीत
बोलत होते. शेतकऱ्यांना दोन लाख सौर कृषीपंप, मार्च २०२२ पर्यंतच्या सर्व शेतीपंप जोडण्यांचा
अनुशेष पूर्ण करणं आणि कृषिफिडर सौर उर्जेवर आणणं, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या
बैठकीत घेण्यात आले. महापारेषणच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्मिती
करण्यात येतील. या सर्व प्रकल्पांचा भविष्यातील संपूर्ण रोडमॅप निश्चित करण्यासंदर्भातही
उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.
****
मराठवाड्यात काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. औरंगाबाद शहर आणि परिसरात दुपारच्या
सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. लातूर इथंही काल विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.
हिंगोली, नांदेड जिल्ह्यातही काल पाऊस नडला.
येत्या दोन दिवसात, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर
विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. तुरळक
ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
***
अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना परतफेडीसाठी
सरसकट तीन महिने मुदतवाढ देण्याची मागणी, मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश
चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी काल मुंबईत सहकार मंत्री अतुल सावे यांची
भेट घेऊन निवेदन सादर केलं. नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना, महात्मा जोतिराव
फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी करण्यात
आली. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये परतफेडीची अट शिथिल करण्याची मागणी चव्हाण यांनी
केली. सावे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्हा उद्योग केंद्र, राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि केंद्र शासनाचा
सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद इथं जिल्हास्तरीय
एक जिल्हा एक उत्पादन व्यवसाय वृद्धी कार्यशाळा, निर्यात प्रोत्साहन मेळावा घेण्यात
आला. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर...
Byte …
द्राक्ष निर्यातीत उस्मानाबादचा राज्यात तिसरा क्रमांक
आला आहे. आणखी प्रयत्न झाले, तर नाशिकच्या खालोखाल उस्मानाबादची द्राक्ष निर्यात होऊ
शकतात. केशर आंब्याच्या उत्पादनावर आणि दर्जावर लक्ष केंद्रीत केल्यास त्याचीही निर्यात
वाढू शकते, असा विश्वास या कार्यशाळेत वर्तवण्यात आला. जिल्ह्यातल्या खव्यालाही राज्यात
भरपूर मागणी आहे. खवा उत्पादक शेतकऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी याकडे लक्ष देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. शेतीमाल
प्रक्रिया उद्योग उभारणी, लोकल ते ग्लोबल बाजारपेठ, विषमुक्त शेती, शेतीमालाचा दर्जा
उंचावणं, आणि शेत माल नोंदणी आदी विषयावरही यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केलं..
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४९२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २० हजार ५०१ झाली आहे. काल या संसर्गानं तीन रुग्णांचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक
लाख ४८ हजार ३३६ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल ५६२
रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६८ हजार ७३६ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
तीन हजार ४२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
१५, लातूर आठ, औरंगाबाद सहा, जालना चार, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश
आहे.
****
६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचं,
दीक्षाभूमी स्मारक समितीनं म्हटलं आहे. नागपूर इथल्या दीक्षाभूमीवर काल एक आढावा बैठक
घेत जिल्हा प्रशासनानं पाहणी केली. सर्व अनुयायांनी यावर्षी उत्साहानं सहभागी व्हावं,
असं आवाहन दीक्षाभूमी स्मारक समितीनं केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर, गंगापूर आणि कन्नड तालुक्यातल्या १५० जणांना भगर
आणि भगरीच्या पिठातून विषबाधा झाली आहे. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीणच्या वैजापूर पोलिसांनी
आठ किराणा दुकानदारांच्या विरोधात कारवाई करत गुन्हे दाखल केले. सर्व दुकानदारांनी
आपल्या दुकानात असलेले भगर आणि पीठ अपचनकारक असल्याचं माहित असतांना सुद्धा ग्राहकांना
विकले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
तिरुवनंतरपुरम इथं काल झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं
दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या
संघानं दिलेलं १०७ धावांचं लक्ष्य १७व्या षटकात दोन गडी गमावत पूर्ण केलं. के एल राहुल
आणि सूर्यकुमार यादवनं नाबाद अर्धशतक झळकावलं. तीन गडी बाद करणारा अर्शदीप सिंह प्लेयर
ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला दुसरा सामना रविवारी गुवाहाटी इथं खेळला
जाणार आहे.
****
गुजरात इथं सुरू असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र महिला
रग्बी संघानं काल झालेल्या सलामीच्या सामन्यात दिल्लीचा १९-१० ने पराभव केला. या सामन्यात
कोल्हापूरच्या कल्याणीने दोन ट्राय, पायलने एक ट्राय, कर्णधार भारुचा हिनं दोन कन्व्हेन्स
ट्राय मिळवत संघाला विजय मिळवून दिला.
पुरुष संघाचा सलामीचा सामना बरोबरीत राहिला. गोविंद गुप्ताच्या कुशल नेतृत्वात
महाराष्ट्र संघाने सर्विसेस संघाला १४-१४ असं बरोबरीत रोखलं. पुढच्या सामन्यात पुरुष
रग्बी संघाने गुजरात संघावर ७३-शून्य असा सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवला.
****
१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा यावर्षी भारतात होत असून,
नवी मुंबई शहराला यजमान शहराचा बहुमान मिळाला आहे. नवी मुंबईतल्या नेरुळ इथं डॉ. डी.वाय.पाटील
क्रीडा संकुलावर १२ ते ३० ऑक्टोबर दरम्यान हे सामने होणार आहेत. अंतिम सामना ३० ऑक्टोबर
रोजी याच मैदानावर होणार आहे. या जागतिक स्पर्धेमध्ये १६ देशांचे संघ सहभागी होणार
आहेत.
****
औरंगाबादच्या म्हैसमाळ इथं हवामानाचा अचूक वेध घेणारं सी बँड डॉपलर रडार लवकरच
बसवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या सी बँड डॉपलर रडारमुळे हवामानाचा अचूक वेध घेता येणार असून, याचा संपूर्ण मराठवाड्याला
फायदा होणार आहे. केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांच्या पाठपुराव्यामुळे
या कामाला गती मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारीनी यावेळी दिली.
****
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला
एक ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
काल औरंगाबाद इथं यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
एक ऑक्टोबर ते ३० डिसेंबर पर्यंत मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रीया होणार असल्याची
माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
No comments:
Post a Comment