Friday, 30 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  30 September    2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० सप्टेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक प्रदान.

·      स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ;शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेची घोषणा.

·      औरंगाबाद इथल्या ऑरिक सिटीत आतापर्यंत सात हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक.

·      यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना जाहीर.

आणि

·      तृतीयपंथियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची गरज कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्याकडून व्यक्त.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत, ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मराठी चित्रपट ‘फनरल’ तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून ‘सुमी’ चित्रपटाला पारितोषिक प्रदान करण्यात आला. ‘मी वसंतराव’ चित्रपटातल्या गायनासाठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात आलं.

****

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या दिल्लीत शहरी स्वच्छता महोत्सवात स्वच्छ राज्यं आणि शहरांचा सन्मान करण्यात येणार आहे. विविध श्रेणींमधील १६० हून अधिक पुरस्कार यावेळी प्रदान केले जाणार आहेत

****

स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे ही लोकचळवळ होण्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा असून इच्छाशक्ती द्वारेच ही कामं साध्य होऊ शकतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, येणाऱ्या काळात स्वच्छ आकांक्षी स्वच्छतागृहे परिवर्तन घडवून आणतील, असा विश्वास व्यक्त केला. स्वच्छता मोहितेत खासगी संस्थांच्या सहभागावरही भर द्यावा लागेल. दोन वर्षांत शहरे कचरामुक्त करून शहरांचा पूर्णपणे कायापालट करायचा आहे. त्यादृष्टीने चांगल्या स्टार्टअप्सना यामध्ये नक्कीच संधी दिली जाईल असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

 

या अभियानांतर्गत शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेची घोषणाही यावेळी करण्यात आली. ०२ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या ९० दिवसांच्या कालावधीत शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन शहरांना अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी तसंच पाच कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या कचरामुक्ती अभियानांतर्गत राज्यातली सर्व शहरं कचरामुक्त करणं अभिप्रेत आहे. त्यानुसार घरोघरी १०० टक्के विलगीकृत कचरा संकलीत करणं, सर्व प्रकारच्या कचऱ्यावर १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया करणं, वैयक्तिक शौचालयांसह, आकांक्षी सार्वजनिक शौचालयांची उभारणी, आदी उद्दीष्ट निर्धारित करण्यात आली आहेत. येत्या ९० दिवसात मुंबईचा कायापालट करण्याचं अभियानही हाती घेण्यात आलं आहे.

 

या अभियानाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी राज्य शासनाने १२ हजार ४०९ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून या अभियानातंर्गत शौचालयं उभारणी, वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन, मल जल निस्सारण प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्क्यांनी वाढ केली आहे, रेपो दर आता पाच पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे. बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण देशांतर्गत उत्पन्नातली वाढ १३ पूर्णांक पाच टक्के राहिली आहे. ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सर्वाधिक वाढ असल्याचं दास यांनी सांगितलं. महागाईवरील नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर सहा टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी यावेळी व्यक्त केला.

****

निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी देशाचे दुसरे सरसेनाध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. सरसेनाध्यक्ष चौहान यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन युद्धातल्या हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली.

****

सहावी भारतीय मोबाईल काँग्रेस उद्यापासून नवी दिल्लीत सुरु होत आहे, या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी फाईव्ह-जी सेवेचा शुभारंभ करणार आहेत. फाईव्ह जी तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त होणार आहेत. 5G तंत्रज्ञान ऊर्जा सक्षमता, स्पेक्ट्रम सक्षमता आणि नेटवर्क सक्षमताही वाढवेल. ४ आक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं वर्धा इथं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा समारोप, ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ, तसंच ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ केला जाणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह “हॅलो ऐवजी वंदे मातरम्” या अभियानाचे संकल्पक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मॅगसेसे पुरस्कार विजेते तसंच जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंग यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

****

औरंगाबाद इथल्या अत्याधुनिक औद्योगिक वसाहत ऑरिक सिटीत आतापर्यंत सात हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक झाली असून आठ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ऑरिकचे मुख्य व्यवस्थापक सुरेश काकानी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ऑरिक सिटीत आयटी आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात उद्योजकांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ऑरिक सिटीत आतापर्यंत १७४ भूखंडांचं वितरण झालं असून ५० उद्योगांचं काम प्रगतीपथावर असून लवकरचं हे उद्योग सुरु होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार राजकीय तसंच अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना जाहीर झाला आहे. अनंत भालेराव स्मृती प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता पानट ही माहिती दिली. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि ५१ हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या १३ नोव्हेंबरला औरंगाबाद इथं हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

****

तृतीयपंथियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं पाहिजे, असं आवाहन नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केलं आहे. नांदेड इथल्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या मिशन गौरी या किन्नरांच्या विकास प्रवाहावर आधारित लघुपटाच्या सामुहिक अवलोकनानंतर कुलगुरू बोलत होते. किन्नरांना उच्च शिक्षणासाठी विद्यापीठाअंतर्गत ज्या सुविधा लागतील त्या, उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही कुलगुरू डॉ भोसले यांनी दिलं. किन्नरांप्रती असलेला संवेदनेचा धागा या लघुपटामार्फत अत्यंत कुशलतेने हाताळल्या बद्दल कुलगुरूंनी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांचं विशेष कौतुक केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कुठेही लहान मुले पळवून नेणारी टोळी आलेली नाही किंवा सक्रिय नाही असं जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. वास्तविक अशी कोणतीही घटना किंवा तसा प्रयत्न सुध्दा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घडलेला नाही. चौकशीअंती या फक्त अफवा असल्याचं निष्पन्न झालं, असं कलवानिया यांनी सांगितलं. सामाजिक माध्यमांवरुन पसरवल्या जाणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपाला आज २९ वर्ष झाली. या भूकंपामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना किल्लारी इथं आदरांजली अर्पण करण्यात आली. आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., अन्य अधिकारी तसंच ग्रामस्थांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करत, दोन मिनिटे मौन पाळून अभिवादन केलं. पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.

****

स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशाने आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य दृष्टीने शक्तिशाली होताना प्राणिमात्रांच्या कल्याणाचा देखील विचार केला पाहिजे असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई शहर आणि परिसरातील प्राण्यांसाठी सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णवाहिका आज रुजू झाल्या, राज्यपालांनी या रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवला.

****

No comments: