Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 September 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५
सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन आक्टोबरला गांधी जयंती आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचं अभियान गतीमान
करण्याचं आवाहन केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात
देशवासियांना संबोधित
करतांना आज ते बोलत होते. खादी, स्थानिक
हातमाग, हस्तकलेसह स्थानिक उत्पादनांच्या खरेदीवर जनतेनं भर दिला पाहिजे, असं सांगत त्यांनी
यावेळी जनतेनं देशी उत्पादनांची विक्रमी खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे.
सणासुदीच्या काळात पॅकिंग आणि पॅकेजिंग साठी प्लास्टिक पिशव्यांच्या केल्या जाणाऱ्या वापराबाबत पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली
आहे. सणासुदीच्या या काळात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते, त्यात पॉलिथीनचा केला जाणारा वापर हा आमच्या सणांच्या मूळ
भावनेच्या विपर्यस्त आहे. जनतेनं प्लॉस्टिक वगळता अन्य साहित्यापासून बनवलेल्या पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधान
मोदी यांनी यावेळी केलं. देशात कापडी,
सुती, काथ्या आणि केळीच्या तंतूपासून तयार करण्यात येणाऱ्या पारंपारीक पिशव्यांचा वापर वाढत
असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
दिव्यांगांसाठी विकसित करण्यात आलेल्या ब्रेल लिपी या
भारतीय सांकेतिक भाषेबद्दल आणखीन जागरुकता वाढवली पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. अमृत महोत्सवी वर्षातला महत्वाचा दिवस येत्या २८ तारखेला
आहे. या दिवशी शहीद भगतसिंग यांची जयंती असून त्यांना आदरांजली म्हणून चंदीगढ
विमानतळाचं शहीद भगतसिंग विमानतळ असं नामकरण करण्यात येणार आहे असं पंतप्रधानांनी
सांगितलं. भारतातील उच्च रक्तदाब नियंत्रण उपक्रमाअंतर्गत
रक्तदाब पीडीत रुग्णांवर सरकारी सेवा केंद्रांमध्ये उपचार केले जातात आणि या
उपक्रमामुळे ५० टक्के रक्तदाब पिडीत लोकांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. भारताच्या या
उपक्रमाची संयुक्त राष्ट्रसंघानेही दखल घेतली असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या ५ जुलै रोजी देशभरात सुरु झालेल्या सुरक्षित सागर या मोहिमेची सांग़ता
गेल्या १७ तारखेला, सागरी किनारा स्वच्छता दिनी झाली. ७५ दिवस
चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत देशभरातल्या अनेक ठिकाणी अनेक संस्था, लोकप्रतिनिधी तसंच विद्यार्थ्यांनी लोकसहभागातून दिलेल्या योगदानाबद्दल
पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन केलं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी धरणाचे दोन दरवाजे काल उघडण्यात आले. जिंतूर
तालुक्यातल्या या येलदरी धरणात काल सायंकाळपर्यंत ८०९ पूर्णांक ७७० दशलक्ष घनमीटर
जिवंत जलसाठा झाला आहे. सध्या येलदरी धरणातून १ हजार ८०० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद
या वेगानं विसर्ग सुरु आहे.
****
महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळ यावर्षीही २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत आहे. यानिमित्त २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत पर्यटनाशी निगडीत
विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत ‘पर्यटन सप्ताह’ साजरा करण्यात येइल.
****
हैदराबाद
मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद इथल्या देवगिरी किल्ल्यावर आज सकाळी
सात वाजता हेरिटेज वॉक आणि स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. लोकसंवाद फाउंडेशन
हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवत
आहे. याच शृंखलेतील हा उपक्रम आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाच्या सैन्याला
चकवा देऊन किल्ल्यावर कसा तिरंगा फडकवला, त्याचा
रोमांचक इतिहास यावेळी जाणून घेण्याची संधी या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना मिळाली.
*****
भारतानं
डिजिटल आरोग्य उपक्रमात एक मोठा पल्ला गाठला आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन या
महत्वाकांक्षी योजनेत एक कोटींहून अधिक आरोग्य रेकॉर्ड्स ना
डिजिटली जोडण्यात आलं आहे. कालच्या एकाच दिवसात २७ लाखांहून अधिक रेकॉर्ड्सची
डिजिटल नोंद झाली. आयुष्मान भारत डिजिटल मिशन, डिजिटल आरोग्य
सेवा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर
मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. देशभरात आतापर्यंत २४ कोटी ३६ लाख आयुष्मान भारत
आरोग्य खाती उघडण्यात आली असल्याचं ही त्यांनी यासंदर्भातल्या आपल्या ट्वीट
संदेशात सांगितलं आहे.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १५
लाख ६३ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१७ कोटी ५४ लाखांहून अधिक
मात्रा देण्यात आल्या आहेत.
देशात
काल नव्या पाच हजार कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली, तर पाच हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४३ हजारांहून अधिक रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
दरम्यान, आतापर्यंत १०२ कोटी ४५ लाखांहून अधिक नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीची
पहिली, ९४ कोटी ७६ लाखांहून अधिक नागरिकांनी कोविड
प्रतिबंधात्मक लसीची दुसरी, तर २१ कोटी ७५ लाखांहून अधिक
नागरिकांनी लसीची तिसरी वर्धक मात्रा घेतली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं दिली आहे.
No comments:
Post a Comment