Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 September 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४
सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती
द्रोपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात २०२०-२१ चे राष्ट्रीय सेवा योजना
पुरस्कार प्रदान केले. दोन विद्यापीठे, दहा राष्ट्रीय सेवा योजना केंद्र, तिथले अधिकारी
आणि ३० स्वयंसेवकांना यावेळी पुरस्कार देण्यात आले.
****
पॉप्युलर
फ्रंट ऑफ इंडिया -पीएफआय या संस्थेवर केरळ सरकारने देखील कारवाई करण्याची मागणी केली
होती, या संस्थेने देशांतर्गत अस्वस्थता निर्माण करण्याचं षडयंत्र रचलं, असं उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रीय
तपास संस्था आणि दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे पीएफआय विरुद्ध पुरावे असून तपासाअंती
अनेक गोष्टी बाहेर येतील, असं ते म्हणाले.
****
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख ७६ हजार
८४० नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१७ कोटी ४१ लाख चार हजार
७९१ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या चार हजार ९१२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर पाच हजार
७१९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४४ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ९३ वावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी खासदार
हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या केंद्रासाठी शंभर कोटी रुपये देखील मंजूर
झाले आहेत. कंपनी कायद्याच्या कलम आठ नुसार 'ना नफा ना तोटा' या तत्वावर एक स्वायत्त
संस्था म्हणून हे केंद्र स्थापन करण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे.
****
औरंगाबाद
इथं आज सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित सत्यशोधक समाज शत्तकोत्तर सुवर्ण
महोत्सवी अधिवेशनाचं उद्घाटन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या
हस्ते झालं. महात्मा फुले यांचा विचार किती व्यापक आहे आणि आजही तो कसा लागू पडतो, या विषयी डॉ.पाटणकर
यांनी माहिती दिली. या एक दिवसीय या अधिवेशनात आज दिवसभर विविध विषयांवर परिसंवाद होणार
आहेत.
****
नाशिक जिल्ह्यात
जनावरांच्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून, आत्तापर्यंत पाच तालुक्यातल्या २३
गावांमध्ये ८२ जनावरांना लम्पिची लागण झाली आहे. इगतपुरी तालुक्यातल्या बोरटंबे इथं
या आजारामुळे एक जनावर दगावल्यानं, पशुसंवर्धन विभागाने बाधित गावांमध्ये तसंच लगतच्या
गावांमध्ये तातडीने लसीकरण सुरू केलं आहे.
****
देवीच्या
साडे तीन शक्ती पीठांपैकी अर्धे पीठ मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या श्री
सप्तश्रृंगी देवीवर अभिषेक करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी भाविकांच्या देणगीतून
घडवण्यात आलेल्या २५ किलो चांदीच्या मूर्तीवर आता अभिषेक करण्यात येणार आहे. देवी मंदिर
ट्रस्टच्या वतीनं हा निर्णय जाहीर करण्यात आला.
दरम्यान,
या मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी सुरू आहे. गडावर उद्यापासून पाच ऑक्टोबर पर्यंत
खासगी वाहनांना प्रवेशास मनाई करण्यात आल्याचे आदेश, उपनिवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे
यांनी जारी केले.
****
औरंगाबाद
शहरात सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दरानं तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत
वीजजोडणी घेण्याचं आवाहन, महावितरण कार्यालयानं केलं आहे. उत्सवातील देखावे, मंडप,
रोषणाई आणि वीज सुरक्षेतील त्रुटींमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना
कराव्यात, तसंच महावितरणकडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज देयकाप्रमाणेच वीजपुरवठा
केला जाईल असंही महावितरण कडून सांगण्यात आलं आहे.
****
प्रवाशांची
अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वेनं हुजूर साहिब नांदेड ते पुरी दरम्यान
विशेष गाडीची एक फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी नांदेड इथून २६ सप्टेंबरला
दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि दुसर्या दिवशी सायंकाळी साडे पाच वाजता पुरी
इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २७ सप्टेंबरला रात्री पावणे अकरा वाजता पुरी
इथून सुटेल आणि नांदेडला दुसर्या दिवशी रात्री एक वाजता पोहोचेल.
****
भारताच्या
हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि १९९८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या
संघाचे सदस्य दिलीप तिर्की यांची काल हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात
आली. इतिहासात प्रथमच एक माजी खेळाडू आणि एक ऑलिम्पिकपटू राष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी
विराजमान झाले आहेत. तिर्की यांनी १९९६, २००० आणि २००४ मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत
भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
****
No comments:
Post a Comment